मीखाह 1
1
1यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.
2सर्व लोकहो, तुम्ही सर्वजण, ऐका,
पृथ्वी आणि जे सर्व त्यामध्ये राहतात, लक्ष द्या,
सार्वभौम याहवेह परमेश्वर, त्यांच्या पवित्र मंदिरातून,
तुमच्याविरुद्ध साक्ष देतील.
शोमरोन आणि यरुशलेमविरुद्ध न्याय
3पाहा! याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत.
ते खाली उतरतात आणि पृथ्वीच्या उंच जागा तुडवितात.
4त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात
जसे अग्नीपुढे मेण,
जसे पाणी उतारावरून खाली येते,
तशा दऱ्या दुभंगतात.
5हे सर्व याकोबाच्या अपराधामुळे
आणि इस्राएली लोकांच्या पापाचे परिणाम आहे.
याकोबाचा अपराध काय आहे?
ते शोमरोन आहे की नाही?
यहूदीयाचे उच्च स्थान कोणते आहे?
ते यरुशलेम नाही की नाही?
6“म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा,
द्राक्षमळे लावण्याची जागा करेन.
मी तिचे दगड खोऱ्यात टाकेन
आणि तिचा पाया उघडा करेन.
7तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील;
तिच्या मंदिरातील सर्व भेटवस्तू अग्नीत भस्म होतील;
मी तिच्या सर्व प्रतिमा नष्ट करेन.
कारण तिने आपल्या भेटवस्तू वेश्याव्यवसाय करून मिळवल्या आहेत,
आणि त्या पुन्हा वेश्यावृत्तीची मजुरी म्हणून वापरली जाईल.”
शोक व आक्रंदन
8म्हणून मी शोक व आक्रंदन करेन;
मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन.
कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन;
आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन.
9कारण शोमरोनची पीडा असाध्य आहे;
ती यहूदीयामध्ये पसरली आहे.
ती माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत पोहोचली आहे,
ती यरुशलेमपर्यंतही पोहोचली आहे.
10गथ#1:10 गथ म्हणजे सांगणे मध्ये ही बातमी देऊ नका;
अजिबात रडू नका.
बेथ‑ले‑अफ्राह#1:10 म्हणजे धुळीचे घर मध्ये जाऊन
धुळीत लोळ.
11शाफीर#1:11 शाफीर अर्थात् आनंददायी मध्ये राहणारे तुम्ही
वस्त्रहीन आणि निर्लज्जपणे निघून जा.
जे झानन#1:11 झानन अर्थात् बाहेर या मध्ये राहतात
ते बाहेर जाणार नाहीत.
बेथ‑एसल विलाप करीत आहे;
ते तुम्हाला यापुढे संरक्षण देऊ शकत नाही.
12मारोथ#1:12 मारोथ अर्थात् कडू मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत,
आणि मदतीची वाट पाहत आहेत,
कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा
याहवेहने पाठविलेली आहे.
13लाखीशमध्ये राहणार्यांनो,
वेगवान घोडे रथाला जुंपा.
तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले,
कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले.
14त्यामुळे तू मोरेशेथ-गथला
निरोपाची भेट देशील.
अकजीब#1:14 अकजीब म्हणजे फसवणूक चे रहिवासी
इस्राएलच्या राजांना फसविणारी ठरतील.
15मारेशाहच्या रहिवाशांनो,
मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन.
इस्राएलचे प्रतिष्ठित लोक
अदुल्लामला पळून जातील.
16ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात
त्यांच्यासाठी शोक करताना आपले डोके मुंडण करा;
गिधाडासारखे तुमच्या डोक्याचे मुंडण करा,
कारण ते तुमच्यापासून गुलाम म्हणून जातील.
सध्या निवडलेले:
मीखाह 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.