YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 41

41
1“लिव्याथानाला माशाचा गळ घालून तू पकडू शकशील काय
किंवा त्याच्या जिभेला दोर बांधू शकशील काय?
2त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय
किंवा त्याच्या जाभाडामध्ये आकडा खुपसशील काय?
3दयेसाठी तो तुझ्याकडे विनवणी करीत राहील काय?
तो तुझ्याशी सौम्य शब्दांनी बोलेल काय?
4जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे
म्हणून तो तुझ्याशी करार करेल का?
5एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय
किंवा तुझ्या घरातील तरुण स्त्रियांसाठी साखळीला बांधून ठेवू शकशील?
6विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय?
व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय?
7त्याच्या गुप्त चामड्यात बरची रोवशील काय
किंवा मत्स्यबाण त्याच्या डोक्यात खुपसता येईल काय?
8जर तू आपला हात त्याच्यावर ठेवला,
तर त्या संघर्षाचे तुला स्मरण होऊन तसे तू पुन्हा कधीही करणार नाही!
9त्याच्यावर वर्चस्व करण्याची कोणतीही आशा खोटी आहे;
तो केवळ नजरेसमोर असणेच अत्यंत तीव्रतेचे आहे.
10त्याला भडकवू शकेल इतके उग्र कोणीही नाही.
तर मग माझ्याविरुद्ध कोण उभा राहील?
11मला कोणाचे काही देणे लागते असा दावा कोणाकडे आहे?
आकाशाखाली आहे ते सर्वकाही माझेच आहे.
12“लिव्याथानाचे अवयव,
त्याची शक्ती आणि त्याच्या शरीराच्या आकर्षक आकाराविषयी बोलण्यास मी चुकणार नाही.
13त्याची बाह्य कातडी कोण उतरवू शकणार?
त्याच्या दुहेरी चिलखतामधून कोण भेद करू शकेल?
14जी भयानक दातांनी घेरलेली आहे,
अशी त्याची मुखद्वारे उघडण्याचे धाडस कोणाला आहे?
15त्याच्या पाठीवर ढालीच्या रांगा आहेत
ज्या घट्ट एकत्र मुद्रित केलेल्या आहेत;
16ती एकमेकांना इतकी जखडून आहेत
की त्यामधून हवा देखील पार होऊ शकत नाही.
17ती एकमेकांना घट्ट जोडलेली आहेत;
ती एकमेकांना लगटून असतात आणि ती वेगळी करता येत नाहीत.
18त्याच्या फुरफुरण्यातून प्रकाशाचे झोत येतात;
त्याचे डोळे प्रभात किरणांसारखे आहेत.
19त्याच्या मुखातून ज्वाला उफाळून येतात;
अग्नीच्या ठिणग्या बाहेर उसळतात.
20जळत्या लव्हाळ्यावर उकळत असलेल्या पात्रातून यावा
तसा त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत असतो.
21त्याच्या श्वासाने कोळसा पेट घेतो,
आणि त्याच्या मुखातून तापलेल्या ज्वाला पडतात.
22त्याच्या मानेत सामर्थ्य राहते;
त्याच्यापुढे भीती चालत असते.
23त्याच्या मांसाचे थर घट्टपणे जोडलेले आहेत;
ते दृढ आणि अढळ असतात.
24त्याची छाती खडकासारखी कडक आहे,
जात्याच्या तळीसारखी कणखर आहे.
25तो जेव्हा उभा राहतो, पराक्रमी भयभीत होतात;
त्याचा वार होण्याआधीच ते माघार घेतात.
26त्याच्यावर वार केलेल्या तलवारीचा,
अथवा भाला, बरची किंवा बाणाचा त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही.
27लोखंडाला तो वाळलेल्या गवतासारखे
आणि कास्याला कुजलेले लाकूड असे लेखतो.
28बाण त्याला पळवून लावू शकत नाही;
आणि गोफणधोंडे त्याला भुसकटासारखे आहेत.
29लाठी त्याला पेंढीच्या तुकड्यासारखीच वाटते;
भाल्याच्या खुळखुळण्याला तो हसत असतो.
30त्याच्या पोटावरील भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्‍यांसारखा आहे,
मळणीच्या घणाप्रमाणे आपल्या खुणा चिखलावर मागे सोडतो.
31तो खोल समुद्राला उकळत्या कढईप्रमाणे घुसळतो
आणि तेलाच्या पात्रासारखे सागरास ढवळतो.
32तो आपल्यामागे चमकणारा मार्ग सोडतो;
की एखाद्याला वाटेल की सागराला पांढरे केस आहेत.
33त्याच्यासारखे पृथ्वीवर काहीही नाही;
तो एक निर्भय प्राणी आहे.
34तो घमेंडखोरांना खाली बघायला लावतो;
जे सर्व गर्विष्ठ आहेत, त्यांचा तो राजा आहे.”

सध्या निवडलेले:

इय्योब 41: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन