इय्योब 40
40
1याहवेहने इय्योबास पुढे म्हटले,
2“जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का?
जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!”
3तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला:
4“मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार?
मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.
5मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही;
दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”
6मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले:
7“पुरुषासारखी आपली कंबर कस;
मी तुला प्रश्न विचारतो,
आणि तू मला त्याचे उत्तर देशील.
8“माझ्या न्याया विषयी तू संशय धरशील काय?
स्वतःचे समर्थन करावे म्हणून तू मला दोष लावशील काय?
9तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय,
तुझा आवाज त्यांच्यासारखा गडगडाट करू शकतो काय?
10मग गौरव आणि वैभव यांनी स्वतःला सुशोभित कर,
आणि सन्मान व ऐश्वर्य ही परिधान कर.
11तू आपल्या क्रोधाचा त्वेष मोकळा सोडून दे,
आणि प्रत्येक गर्विष्ठाकडे पाहा व त्यांना खाली वाकव,
12जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर.
दुष्ट जिथे उभे राहतात, तिथेच त्यांना पायाखाली तुडव.
13त्या सर्वांना मातीत एकत्रच गाडून टाक;
कबरेमध्ये त्यांची तोंडे कफनवस्त्रांनी झाकून टाक.
14मग मी स्वतः हे मान्य करेन
की तुझाच उजवा हात तुला वाचवू शकतो.
15“बेहेमोथ#40:15 बेहेमोथ किंवा पाणगेंड्यासारखा प्रचंड प्राणी कडे पाहा,
तुझ्याबरोबर मी त्यालाही घडविले.
तो बैलाप्रमाणे गवत खातो.
16त्याच्या कमरेत किती शक्ती आहे,
आणि त्याच्या पोटाचे स्नायू किती बळकट आहेत!
17गंधसरूप्रमाणे त्याचे शेपूट झोकांडत असते.
त्याच्या मांड्यांच्या हाडांचे स्नायू एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत.
18त्याची हाडे कास्याच्या नळ्यासमान आहेत;
त्याचे अवयव पोलादी गजासारखे आहेत.
19परमेश्वराच्या कृत्यांमध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे,
तरीही त्याचा उत्पन्नकर्ता त्याच्याजवळ तलवार घेऊनच जातो.
20डोंगर आपले उत्तम उत्पादन त्याला पुरवितात;
आणि सर्व वनपशू त्याच्याभोवती खेळतात.
21कमलिनीखाली तो पडून राहतो,
लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत तो लपून असतो.
22कमलिनी आपल्या छायेत त्याला झाकतात;
ओढ्याच्या सभोवतीची उंच वाळुंजे त्याला वेढून घेतात.
23उफळत्या नदीचे प्रवाह त्याला हानी करत नाही;
यार्देनेचा ओघ त्याच्या तोंडावर वेगाने आला तरी तो सुरक्षित असतो.
24उघड्या डोळ्यांनी कोणी त्याला धरेल काय,
किंवा त्याला जाळ्यात अडकवून त्याचे नाक टोचतील काय?
सध्या निवडलेले:
इय्योब 40: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.