इय्योब 22
22
एलीफाज
1मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले:
2“मानवाचा परमेश्वराला काही उपयोग आहे का?
अत्यंत सुज्ञ मनुष्याचा सुद्धा त्यांना काय लाभ?
3जरी तू नीतिमान असलास तरी त्यात सर्वसमर्थाला काय आनंद?
तू निर्दोष असलास, तरी त्यांना काय लाभ होणार?
4“तू भक्त आहेस म्हणून परमेश्वर तुझा निषेध
आणि तुझ्याविरुद्ध आरोप करीत आहेत का?
5तुझी दुष्टता पुष्कळ नाही का?
तुझे अपराध अनंत नाही का?
6तू निष्कारण आपल्या नातेवाईकांकडून गहाण घेतलेस;
आणि लोकांना वस्त्राशिवाय सोडले.
7थकलेल्यांना तू पाणी दिले नाही
आणि तू भुकेल्यांपासून अन्न राखून ठेवलेस,
8जरी तू प्रभावी व्यक्ती, एक जमीनदार होतास;
सन्माननीय मनुष्य असा त्या भूमीवर राहत होतास
9आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले
तसेच अनाथांना बलहीन केलेस.
10म्हणूनच आता पाश तुझ्या सभोवती आहे,
अकस्मात आलेली संकटे तुला का भयभीत करतात,
11इतका अंधकार का आहे की तुला दिसत नाही,
आणि जलांच्या पुराने तुला का झाकून टाकले आहे.
12“परमेश्वर उच्चतम स्वर्गामध्ये नाहीत काय?
आणि अतिउंच असलेल्या त्या तार्यांकडे बघ!
13पण तरीही तू म्हणतोस, ‘परमेश्वराला काय माहीत?
निबिड अंधकारातून ते न्याय करतील काय?
14ते जेव्हा घुमटकार नभोमंडळात चालतात
तेव्हा त्यांनी आम्हाला बघू नये म्हणून दाट ढगांनी त्यांच्यावर पडदा टाकला आहे.’
15पुरातन मार्ग जे दुष्टांनी पत्करले होते
त्यावर अजून किती काळ तू चालशील?
16ते तर त्यांच्या नेमीत वेळेच्या आधी उठविले गेले,
त्यांच्या जीवनाचा पाया पुराच्या जलात वाहून गेला.
17ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा!
सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’
18तरीही परमेश्वराने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली,
म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर राहतो.
19नीतिमान दुष्टांचा नाश झालेला पाहून हर्ष करतील;
निर्दोष लोक त्यांचा उपहास करतील,
20ते म्हणतील, ‘खचितच आमच्या शत्रूंचा नाश झाला आहे,
अग्नीने त्यांची संपत्ती भस्म केली आहे.’
21“परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर;
म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल.
22त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे
त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेव.
23जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्यातून दुष्टता काढून टाकशील:
तर तू पुनर्स्थापित होशील.
24जर तू आपले सोने धुळीत मिळवशील,
आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील,
25तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने,
आणि तुझे मौल्यवान रुपे होतील.
26मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्ये आनंद पावशील
व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील.
27तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील,
आणि तुझे नवस तू फेडशील.
28ज्याची तू इच्छा धरशील, ते घडून येईल,
आणि तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल.
29जेव्हा लोकांना नीच केले जाते तेव्हा तू म्हणशील, ‘त्यांना उचलून धर!’
जे पडलेले ते वाचविले जातील.
30आणि जे निर्दोष नाहीत त्यांना देखील ते वाचवतील,
आणि तुझ्या शुद्ध हातांकरवी ते पातक्यांना साहाय्य करतील.”
सध्या निवडलेले:
इय्योब 22: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.