यिर्मयाह 9
9
1हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत
आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता!
तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत
माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.
2बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे
या यात्रेकरूंकरिता एखादे आश्रयस्थान असते.
जेणेकरून मी माझ्या लोकांचा त्याग करून
त्यांच्यापासून दूर गेलो असतो;
कारण ते सर्वजण व्यभिचारी आहेत,
विश्वासघातकी लोकांचा एक जमाव.
3“ते आपल्या जिभांना खोट्या शब्दांचा प्रहार
करण्यासाठी धनुष्यांप्रमाणे तयार करतात;
ते सत्याने या भूमीत
विजय#9:3 किंवा ते सत्याचे योद्धे नाहीत मिळवित नाहीत.
ते एका पापापासून दुसऱ्या पापाकडे धाव घेतात
ते माझ्या अस्तित्वाची दखल घेत नाहीत,”
असे याहवेह जाहीर करतात.
4“तुमच्या मित्रांपासून सावध राहा;
तुमच्या भाऊबंदावर भरवसा करू नका.
कारण त्यांच्यातील प्रत्येकजण फसविणारा#9:4 किंवा फसविणारा याकोब आहे,
व प्रत्येक मित्र निंदा करणारा आहे.
5मित्र मित्रास फसवितो,
आणि कोणीही सत्य बोलत नाही.
त्यांनी त्यांच्या जिभेला खोटे बोलणे शिकविले आहे;
अगदी दमून जाईपर्यंत ते पाप करीत राहतात.
6तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे;
त्यांच्या या कपटामुळे ते माझे अस्तित्व नाकारतात,”
असे याहवेह म्हणतात.
7म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
“पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन,
याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार
याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय?
8त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत;
ते असत्य वचने बोलतात.
त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात,
परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात.
9अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?”
अशी याहवेह घोषणा करतात.
“या अशा राष्ट्रावर
मी स्वतः सूड उगवू नये काय?”
10मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन
आणि तसेच रानातल्या निर्जन कुरणाबद्दल विलाप करेन.
कारण सर्वकाही ओसाड पडलेले व प्रवास करण्यायोग्य नाहीत,
गाईगुरांचे हंबरणे ऐकू येत नाही.
पक्षीसुद्धा उडून गेले आहेत.
आणि जनावरेही गेली आहेत.
11“मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन,
आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील.
यहूदीयातील नगरे उजाड करेन
तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.”
12हे सर्व समजण्याइतपत शहाणा कोण आहे? याहवेहने हे त्याला समजावून सांगितले व तो त्याचे स्पष्टीकरण करेल तो कुठे आहे? हा देश एवढा ओसाड व वाळवंटासारखा का झाला की यातून प्रवास करण्यासही कोणी धजत नाही?
13याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही. 14याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.” 15म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन. 16जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.”
17सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
“विचार करा! आक्रंदन करणार्या स्त्रियांना बोलवा;
त्यामधून कुशल अशा स्त्रियांना पाठवा.
18त्यांना त्वरित येऊ द्या
आणि आमच्यासाठी आक्रोश करतील
व आमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील
आणि डोळ्याच्या पापण्या धारा काढतील.
19सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे:
‘आमचा किती सत्यानाश झाला आहे!
आमच्यावर घोर लज्जा आली आहे!
आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे
कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ”
20आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका!
त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा.
तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा;
एकमेकींना आकांत करण्यास शिकवा.
21कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला
आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे;
त्याने रस्त्यांवरून बालकांना
आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे.
22त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात:
“ ‘मृतदेह उघड्या जागांवर
विष्ठेप्रमाणे पसरली जातील;
कापणार्यांच्या मागे पेंढ्या पडाव्यात तशी ती दिसतील,
आणि कोणी मनुष्य त्यांना मूठमाती देणार नाही.’ ”
23याहवेहने असे म्हणतात:
“शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये.
बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये
आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये.
24जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी
मी याहवेह, जो कृपा करणारा
पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे,
असे त्यांनी मला खरोखर समजावे,
ह्यात मला संतोष आहे,
असे याहवेहने म्हणतात.”
25याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे— 26म्हणजे इजिप्ती, एदोमी, अम्मोनी, मोआबी, अरबी, आणि होय, तुम्ही यहूदीयातील लोकांना आणि ते सर्व जे वाळवंटातील दूरच्या प्रदेशात राहतात#9:26 किंवा जे कपाळावरील केस कापतात. या सर्व राष्ट्रांची सुंता झाली नाही, परंतु इस्राएलच्या हट्टी अंतःकरणाची सुंता झालेली नाही.”
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 9: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.