यिर्मयाह 8
8
1“ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील. 2आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील. 3जिथे कुठेही मी या राष्ट्राला हद्दपार केले, या दुष्ट राष्ट्रातील सर्व वाचलेल्या लोकांना जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटेल, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.’
पाप व शिक्षा
4“त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात:
“ ‘जेव्हा लोक पडतात, तेव्हा ते पुन्हा उठत नाहीत काय?
जेव्हा कोणी रस्ता चुकला असेल, तर तो मागे फिरत नाही काय?
5मग हे लोक परत का वळले नाही?
यरुशलेम नेहमी बंडखोरी का करते?
ते कपटाला चिकटून राहिले आहेत;
ते वळण्यास कबूल होत नाहीत.
6मी त्यांचे लक्षपूर्वक ऐकले आहे,
परंतु ते योग्य ते बोलत नाहीत.
त्यांच्यातील कोणीही आपल्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करीत नाही,
असे म्हणत नाही की “हे मी काय केले?”
प्रत्येकजण आपल्या निवडलेल्या मार्गाचा पाठपुरावा करतो
जणू एखादा घोडा युद्धात धाव घेतो.
7आकाशातील करकोचाला
तिचे निवडलेले ऋतू माहीत आहे,
आणि तसेच कबुतर, बगळा व निळवी देखील
त्यांच्या स्थलांतराच्या वेळेकडे लक्ष ठेऊन असतात.
परंतु माझ्या लोकांना माहीतच नाही
याहवेहच्या काय अपेक्षा आहेत.
8“ ‘तुम्ही कसे म्हणू शकता, “आम्ही बुद्धिमान आहोत,
कारण आमच्याकडे याहवेहचे नियम आहेत,”
खरेतर लेखनिकाच्या खोट्या लेखणीने
याचा विपर्यास केला आहे?
9बुद्धिमान लज्जित केले जातील;
त्यांची त्रेधा उडेल आणि ते सापळ्यात अडकतील.
कारण त्यांनी याहवेहचे वचन झिडकारले आहे,
त्यांना कशाप्रकारचा शहाणपणा असेल?
10यास्तव मी त्यांच्या स्त्रिया इतर पुरुषांना देईन
आणि त्यांची शेतीवाडी नवीन मालकांना देईन.
त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत
सर्वजण लोभी आहेत;
संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच,
कपटी व्यवहार करतात.
11माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात
की जणू ते फारसे गंभीर नाही.
“शांती, शांती आहे,” असे ते म्हणतात,
परंतु शांती कुठेही नाही.
12त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का?
नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही;
लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही.
म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील;
त्यांना शिक्षा मिळेल तेव्हा त्यांचे पतन होईल,
असे याहवेह म्हणतात.
13“ ‘मी त्यांचे पीक काढून घेईन,
याहवेह घोषित करतात
द्राक्षलतेला द्राक्ष नसतील,
झाडांवर अंजीर फळ दिसणार नाही,
त्यांची पाने सुद्धा वाळून जातील.
मी त्यांना जे काही दिले आहे
त्यांच्यापासून परत घेतले जाईल.’ ”
14आम्ही इथे का बसलो आहोत?
एकत्र होऊ या!
आपण तटबंदीच्या शहरात पलायन करू
आणि तिथेच मरू!
कारण आमच्या याहवेह परमेश्वराने आमचा नाश होण्यासाठी आम्हाला टाकून दिले आहे
आणि त्यांनी आम्हाला विषारी पाणी पिण्यासाठी दिले आहे,
कारण आम्ही त्यांच्याविरुद्ध पाप केले आहे.
15आम्ही शांतीची आशा करीत होतो,
परंतु चांगले काही लाभलेच नाही,
आरोग्य मिळण्याच्या वेळेची आशा करीत होतो,
केवळ भयंकर दहशत मिळाली.
16दान इथून शत्रूच्या
घोड्यांचा फुरफुरण्याचा आवाज येतो;
घोड्यांच्या मोठ्या किंकाळण्यांनी
सर्व भूमीवर थरकाप उडाला आहे.
ते भूमी आणि त्यात जे काही आहे,
हे नगर आणि जे सर्व इथे राहतात,
ते सर्वनाश करण्यासाठी आले आहेत.
17“पाहा, मी तुमच्यामध्ये विषारी फुरसे सर्प पाठवेन,
असे सर्प ज्यांना तुम्ही मंत्रमुग्ध करू शकणार नाही.
आणि ते तुम्हाला दंश करतील,”
याहवेह असे घोषित करतात.
18तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात,
माझे अंतःकरण क्षीण झाले आहे.
19माझ्या लोकांचे आक्रोश ऐका
दूर देशातून ते ऐकू येत आहे:
“सीयोनेत याहवेह नाहीत काय?
तिचा राजा तिथे नाही काय?”
“त्यांनी कोरीव मूर्ती करून मला का संताप आणला,
त्यांनी व्यर्थ परकीय दैवत का पुजले?”
20“हंगाम संपला,
उन्हाळा सरला
आणि तरीही आमचे तारण झाले नाही.”
21माझे लोक चिरडले गेले, मी चिरडलो;
मी शोकाकुल झालो, भीतीने मला दहशत भरली आहे.
22गिलआदात काही औषध नाही का?
तिथे कोणी वैद्य नाही का?
मग माझ्या लोकांच्या जखमा
तिथे बऱ्या का होत नाहीत?
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.