यिर्मयाह 7
7
खोटी धार्मिकतेची व्यर्थता
1याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: 2“याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहा आणि तिथे हा संदेश जाहीर कर:
“ ‘यहूदीयातील सर्व लोक जे या प्रवेशद्वारातून याहवेहची उपासना करण्यासाठी आत येतात ते लोकहो, याहवेहचे हे वचन ऐका. 3इस्राएलचे सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुमच्या मार्गाची व वर्तणुकीची सुधारणा करा, मग मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन. 4तुमची फसवणूक करणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेऊन असे म्हणू नका, “हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे!” 5तुम्ही तुमचे मार्ग व वर्तणूक खरोखर बदलली तर व इतरांशी न्यायाने वागाल, 6जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही, 7तरच मी तुम्हाला या भूमीत, जी मी तुमच्या वाडवडिलांना कायमचे वतन म्हणून दिली, तिच्यात राहू देईन. 8परंतु पाहा, तुम्ही खोट्या आश्वासनावर भरवसा ठेवता जी निरर्थक आहेत.
9“ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा#7:9 किंवा खोट्या दैवताच्या नावांची शपथ घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून, 10आणि मग येथे येऊन, ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे, त्या मंदिरात माझ्यासमोर उभे राहता व म्हणता “आम्ही सुरक्षित आहोत;” हे सर्व दुष्कृत्य करण्यासाठी सुरक्षित आहात काय? 11हे मंदिर ज्याने माझे नाव धारण केले आहे, तुमच्यासाठी लुटारूंची गुहा झाली आहे काय? परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिले आहे! अशी याहवेह घोषणा करीत आहेत.
12“ ‘शिलोह नगरात जा, जिथे मी सर्वप्रथम माझ्या नावाचे निवासस्थान केले, आणि माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्टाईमुळे मी काय केले ते पाहा. 13याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही. 14म्हणून माझे नाव धारण केलेले मंदिर, ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवता, जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले होते, आता त्या मंदिराचे, मी शिलोहचे केले तसेच करेन. 15मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’
16“म्हणून या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, किंवा यांच्यासाठी माझ्याकडे विनंती किंवा विनवण्या करू नकोस. कारण मी तुझे ऐकणार नाही. 17यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का? 18मुलेबाळे लाकडे गोळा करतात, त्यांचे वडील अग्नी पेटवितात, आणि स्त्रिया, आकाशराणीस पोळ्या तयार करून अर्पण करतात. मला क्रोधित करण्यासाठी इतर दैवतांना पेयार्पणे करतात. 19याहवेह विचारतात, या त्यांच्या करणीने ते मला चिथावणी देतात का? नाही! यामुळे त्यांचेच मोठे नुकसान होत नाही का, त्यांचीच बेअब्रू होत नाही का?
20“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी माझा कोप आणि माझा क्रोध मी या जागेवर ओतेन—लोक, पशू, वृक्ष, आणि रोपे भस्मसात होतील—आणि तो अग्नी भडकेल व तो न शमणार नाही.
21“ ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: जा पुढाकार घ्या, तुमची होमार्पणे इतर अर्पणात टाका व ते मांस तुम्हीच खा! 22तुमच्या पूर्वजांना मी इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना केवळ होमार्पणे व यज्ञार्पणे याविषयीच आज्ञा दिली नव्हती, 23पण मी अशी आज्ञा दिली होती की: माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी सांगतो ते सर्व पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. 24पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली. 25तुमच्या पूर्वजांनी इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून आजपर्यंत, दिवसेंदिवस, पुन्हापुन्हा मी माझे संदेष्टे पाठवित राहिलो. 26परंतु त्यांनी माझे ऐकले नाही व माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते हेकेखोर होते व त्यांच्या पूर्वजांहून त्यांनी अधिक दुष्टाई केली.’
27“जेव्हा हे सर्व तू त्यांना सांगशील, ते तुझे ऐकणार नाहीत; तू त्यांना हाक मारशील, पण ते त्यांना प्रतिसाद देणार नाहीत. 28म्हणून त्यांना तू हे सांग, ‘आपल्या याहवेह परमेश्वराच्या आज्ञा झिडकारणारे व सुधारणा करण्यास तयार नसणारे असे हे राष्ट्र आहे. सत्यता नष्ट झाली आहे; त्यांच्या ओठातून ती नाहीशी झाली आहे.
29“ ‘आपले केस कापून टाक, ते फेकून दे; आणि वनस्पतिहीन पर्वतावर विलाप कर, कारण याहवेहने आपल्या क्रोधामुळे या पिढीला धिक्कारले आहे व त्यांचा त्याग केला आहे.
कत्तलीचे खोरे
30“ ‘याहवेह म्हणतात, यहूदीयाच्या लोकांनी माझ्या दृष्टीत पाप केले आहे. ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्ती ठेवून, ते मंदिर भ्रष्ट केले आहे. 31बेन-हिन्नोमच्या खोर्यात त्यांनी तोफेत नावाची एक उच्च वेदी बांधली आहे—तिथे त्यांच्या दैवतांना ते आपल्या मुलामुलींचे होमबली देतात—अशी आज्ञा मी त्यांना मुळीच दिली नव्हती, असे भयानक कृत्य माझ्या कधी मनातही आले नाही. 32म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही. 33नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही. 34तेव्हा मी हर्षगीते व आनंदाचे गायन आणि वर-वधू यांचे आनंदी बोल यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावरून संपविणार आहे, कारण संपूर्ण भूमी उजाड अशी होईल.
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 7: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.