यिर्मयाह 4
4
1याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,”
“मग माझ्याकडे परत ये.”
“जर तू आपल्या अमंगळ मूर्ती पूर्णपणे माझ्या दृष्टीसमोरून दूर करशील
आणि तू कधीही पथभ्रष्ट होणार नाही,
2आणि जर सत्यतेने, न्यायीपणाने आणि नीतिमार्गाने चालशील,
‘जिवंत याहवेहची शपथ वाहशील,’
तर मग राष्ट्रे याहवेहच्या द्वारे आशीर्वादित होतील.
आणि याहवेहच्या नामामध्ये त्यांचा गौरव करतील.”
3यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांना याहवेह असे म्हणतात:
“तुमची कठीण भूमीवर नांगरून घ्या,
काट्यांमध्ये बीजारोपण करू नका.
4अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो
याहवेहसाठी तुमची सुंता करा,
तुमच्या अंतःकरणाची सुंता करा,
नाहीतर माझा राग भडकेल व अग्नीसारखा भडकेल
कारण तुम्ही पापे केली आहेत—
तो क्रोधाग्नी कोणालाच विझविता येणार नाही.”
उत्तरेकडून येणारी आपत्ती
5“यहूदीयात याची घोषणा करा आणि यरुशलेमात जाहीर करा व सांगा:
‘संपूर्ण राष्ट्रांत रणशिंगे फुंका!’
मोठ्याने ओरडून सांगा:
‘सर्वजण एकत्र या!
तटबंदीच्या नगरात शरण घ्या!’
6सीयोनच्या दिशेने ध्वजेचा संकेत करा!
विलंब न करता सुरक्षित ठिकाणी पळ काढा!
कारण मी उत्तरेकडून महान संकट आणत आहे,
होय, एक भयानक विनाश.”
7सिंह आपल्या गुहेतून बाहेर पडला आहे;
राष्ट्रांचा विनाशक आलेला आहे.
त्याने आपले निवास सोडले आहे.
तुमच्या भूमीला उद्ध्वस्त करण्यासाठी.
तुमची नगरे उजाड होतील
आणि निर्जन होतील.
8म्हणून आपल्या अंगावर गोणपाट वेष चढवा,
शोक व आक्रोश करा.
कारण याहवेहचा महाभयंकर क्रोध
अजून आमच्यावरून शमलेला नाही.
9याहवेह असे म्हणतात, “त्या दिवशी असे घडेल,”
“राजा आणि अधिकारी भीतीने गर्भगळीत होतील,
याजकांना भयाने धडकी भरेल
आणि संदेष्टे भीतीने गांगरून जातील,”
10त्यावर मी म्हटले, “परंतु हे सार्वभौम याहवेह! तुम्ही यरुशलेमातील लोकांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे, असे म्हणून ‘तुम्हाला शांती लाभेल,’ पण आम्हाला जिवे मारण्यासाठी तलवार गळ्यावर उगारली आहे!”
11त्यावेळी या लोकांना व यरुशलेमला सांगितल्या जाईल, “वाळवंटातील उजाड टेकड्यांवरून दाहक वारा माझ्या लोकांकडे येईल, परंतु पाखडणे किंवा स्वच्छ करण्यासाठी नाही. 12तो झंझावाती वारा माझ्याकडून येईल. आता मी त्यांच्याविरुद्ध माझा न्याय जाहीर करेन.”
13पाहा! तो ढगांसारखा पुढे येत आहे,
चक्रीवादळाप्रमाणे त्याचे रथ आहेत,
त्यांच्या घोड्यांचा वेग गरुडांहून जास्त आहे.
हाय! हाय! आमचा नायनाट झाला आहे!
14यरुशलेम, तुमच्या अंतःकरणाची अशुद्धता स्वच्छ करा आणि तुमचे रक्षण होईल.
किती काळ तुम्ही तुमचे दुष्ट विचार अंतःकरणात ठेवणार?
15दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली,
एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे.
16“राष्ट्रांना सांगा,
यरुशलेमविषयी घोषणा करा:
‘शहराला वेढा घालण्यासाठी दूर देशाचे सैन्य येत आहे,
यहूदीयाच्या शहराविरुद्ध रणगर्जना करीत आहेत.
17त्यांनी तिला एखाद्या शेताच्या राखणदारांसारखे घेरले आहे,
कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केले आहे,’ ”
असे याहवेह म्हणतात.
18“तुमच्या वागणुकीमुळे व वाईट कृत्यामुळे
हा प्रसंग तुम्ही स्वतःवर ओढवून घेतला आहे.
तुमची ही शिक्षा आहे!
किती कडू आहे हे!
कसे अंतःकरण छेदून टाकले आहे!”
19अहो, माझ्या यातना, माझ्या यातना!
मला अत्यंत वेदना होत आहेत.
अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना!
माझे ह्रदय माझ्यातच धडधडते,
मी शांत राहू शकत नाही.
कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे;
मी युद्धाची ललकारी ऐकली आहे.
20एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते;
सर्व राष्ट्र उद्ध्वस्त झाले आहे.
माझा तंबूचा एका क्षणात नाश झाला आहे,
क्षणार्धात माझे निवासस्थान जमीनदोस्त झाले आहे.
21किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे
आणि केव्हापर्यंत रणशिंगाचा आवाज ऐकत राहणार?
22“माझे लोक मूर्ख आहेत;
ते मला ओळखत नाही.
ते असमंजस मुलांसारखे आहेत.
त्यांना समज अजिबात नाही.
दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे;
त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”
23मी पृथ्वीकडे पाहिले,
आणि ती निराकार आणि रिकामी होती;
आणि आकाशाकडे दृष्टी केली
आणि तेथील प्रकाश नाहीसा झाला होता.
24मी पर्वतांकडे पाहिले,
ते कंपायमान झालेले होते;
सर्व डोंगर डळमळत होते.
25मी पाहिले आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता;
आकाशातील सर्व पक्षी उडून गेलेले होते.
26सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती;
आणि येथील सर्व नगरे उद्ध्वस्त होती
याहवेहच्या समोर, त्यांच्या भयंकर क्रोधाग्नीपुढे.
27याहवेह असे म्हणतात:
“संपूर्ण भूमी उजाड होईल,
तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही.
28यास्तव पृथ्वी शोक करेल
आणि आकाशात काळोख होईल,
कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही,
मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.”
29घोडेस्वार आणि धनुष्यधारी यांची वाणी ऐकताच
आवाजाने सर्व नगरे घाबरून पळतात.
काही लोक झुडूपात लपून बसतात;
आणि डोंगरा-पर्वतांवर चढतात.
सर्व नगरे उजाड पडली आहेत;
कोणीही त्यात राहत नाही.
30हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे?
कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस
आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस?
आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस?
या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही.
तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात;
तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.
31एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला,
जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश—
सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे,
ती आपले हात पसरून म्हणत आहे,
“हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे;
माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.”
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.