YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 3

3
1“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला
आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले,
तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय?
असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय?
परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस—
तू माझ्याकडे आता परत येणार का?”
असे याहवेह म्हणतात.
2“उजाड टेकडीकडे आपली दृष्टी कर व पाहा.
असे कोणते स्थान आहे जिथे तुझ्यासह कुकर्म केले गेले नाही?
रस्त्याच्या कडेला तू आपल्या प्रियकरांची वाट बघतेस,
एखाद्या अरबीचे#3:2 किंवा भटक्या जीवन जगणाऱ्या व्यक्तीसारखी बसून राहतेस.
आपल्या कुकर्माने व जारकर्माने
तू सर्व भूमी दूषित केली आहेस.
3यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे.
वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही,
तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस,
पण तू शरमिंदी होण्यास नकार देते.
4तू मला आताच म्हणालीस ना,
‘माझ्या पित्या, माझ्या तारुण्यातील मित्रा,
5तू नेहमीसाठी रागावला आहेस का?
हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’
याप्रकारे तू बोलतेस,
परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.”
अविश्वासू इस्राएल
6योशीयाह राजाच्या शासनकाळात, याहवेहने मला म्हटले, “तुम्ही पहिले का अविश्वासू इस्राएलने काय केले आहे? एखाद्या दुराचारी स्त्रीप्रमाणे प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली व्यभिचार करते. 7मला वाटले हे सर्वकाही झाल्यानंतर ती माझ्याकडे परत येईल, परंतु ती माझ्याकडे परत आलीच नाही आणि हा बंडखोरपणा तिच्या विश्वासघातकी बहिणीने, यहूदीया हिने पाहिला. 8मी अविश्वासू इस्राएलला तिच्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले आणि तिच्या सर्व व्यभिचारामुळे तिला पाठवले. तरीही मी पाहिले की तिची अविश्वासू बहीण यहूदाहला मुळीच भय वाटले नाही. तीही बाहेर गेली व तिने व्यभिचार केला. 9कारण इस्राएलच्या दृष्टीत हा व्यभिचार अल्पमात्र होता, तिने सर्व भूमीला भ्रष्ट केले आहे आणि लाकडांच्या व दगडांच्या मूर्तींशी व्यभिचार केला आहे. 10हे सगळे घडून सुद्धा तिची अविश्वासू बहीण, यहूदीया, तिच्या संपूर्ण हृदयाने माझ्याकडे परतली नाही, परंतु तिच्यात खोटेपणाच दिसला,” असे याहवेह म्हणतात.
11याहवेहने मला म्हटले, “विश्वासघातकी यहूदीयापेक्षा विश्वासहीन इस्राएल अधिक नीतिमान आहे. 12उत्तर दिशाकडे जाऊन, संदेशाची घोषणा करा:
“ ‘हे अविश्वासू इस्राएल परत ये,
मी तुझ्यावर कायमचाच राग धरणार नाही,
कारण मी विश्वासू आहे,’ याहवेह म्हणतात
‘मी नेहमीच क्रोध करणार नाही,
13केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा—
तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे,
इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली
प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली,
माझे आज्ञापालन केले नाही,’ ”
असे याहवेह म्हणतात.
14“विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन. 15नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल. 16हे त्या दिवसामध्ये होईल, जेव्हा तुम्ही देशात बहुगुणित व्हाल,” याहवेह अशी घोषणा करतात, “तेव्हा लोक असे म्हणणार नाहीत, ‘याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या मनात येणार नाही.’ ते कधीही त्यांच्या लक्षात येणार नाही, त्यांना आठवणसुद्धा राहणार नाही; ते त्याच्याविषयी पुन्हा विचार करणार नाहीत, दुसरा कोश पुन्हा निर्माण होणार नाही. 17त्यावेळी ते यरुशलेमला याहवेहचे सिंहासन असे म्हणतील, आणि याहवेहच्या नावाला आदर देण्यासाठी सर्व राष्ट्रे तिथे तिच्याकडे येतील. ते त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाने चालणार नाहीत. 18त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील.
19“मी स्वतःला म्हटले,
“ ‘तुम्हाला माझ्या मुलाबाळांप्रमाणे वागवितांना मला किती आनंद होईल
आणि मी तुम्हाला सुखद भूमी देईन,
कोणत्याही देशापेक्षा अधिक सुंदर वतन.’
मला वाटले तू मला ‘पिता’ म्हणून हाक मारशील
आणि माझे अनुसरण करण्यापासून मागे फिरणार नाही.
20परंतु आपल्या पतीला सोडून जाणार्‍या विश्वासघातकी स्त्रीसारखे
तू इस्राएलाच्या घराण्या माझा विश्वासघात केला,”
असे याहवेह म्हणतात.
21उजाड पर्वतांवरून रडण्याचा आवाज ऐकू येत आहे,
तो इस्राएलाच्या लोकांच्या विलाप करण्याचा व धावा करण्याचा आवाज,
कारण ते मार्गभ्रष्ट झाले आहेत
आणि त्यांच्या याहवेह परमेश्वराला विसरले आहेत.
22“विश्वासहीन लोकांनो परत या;
मी तुमच्यामागे घसरणीस बरे करेन.”
“होय, आम्ही तुमच्याकडे येऊ,
कारण तुम्हीच आमचे परमेश्वर याहवेह आहात.
23निश्चितच डोंगरावरील गोंधळ
व पर्वतावरील फसवणूक;
निश्चितच आमचे परमेश्वर याहवेह
हेच इस्राएलचे तारण आहेत.
24आमच्या तारुण्यापासून लाजिरवाण्या दैवतांनी
आमच्या पूर्वजांच्या कष्टाची फळे—
त्यांच्या जनावरांचे थवे व कळप,
त्यांचे पुत्र आणि कन्या गिळंकृत केले आहेत.
25आम्ही लज्जास्पद अवस्थेत लोळू
आमची विटंबना आम्हाला झाकून टाको.
आम्ही आमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे,
आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी;
तारुण्यापासून आजपर्यंत
आमच्या याहवेह परमेश्वराची आज्ञा आम्ही पाळली नाही.”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन