YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 5

5
एकही प्रामाणिक नाही
1“यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर,
शोध घे व विचार कर,
तिच्या चौकात तपास कर.
असा एक जरी मनुष्य आढळला
जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे,
तरी मी या नगराला क्षमा करेन.
2‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात
पण ते ही खोटीच शपथ घेतात.”
3हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का?
तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही.
तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात.
आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली
व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.
4मी विचार केला, “हे फार गरीब आहेत;
ते निर्बुद्ध आहेत,
त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही
त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.
5मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन
व त्यांच्याशी बोलेन;
कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत.
त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.”
पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे.
आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.
6म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल,
वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल,
त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल,
आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील;
कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे
त्यांची घसरण फार मोठी आहे.
7“मी तुम्हाला का क्षमा करू?
तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे
आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत.
मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला,
तरी त्यांनी व्यभिचार केला
वेश्यागृहात गर्दी केली.
8हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत,
प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीची लालसा धरतो.
9हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय?
ही याहवेहची जाहीर वाणी आहे.
अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः
प्रतिकार करू नये काय?
10“त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा.
पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका.
वेलीच्या फांद्या तोडून टाका,
कारण हे लोक याहवेहचे नाहीत.
11इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी
माझा घोर विश्वासघात केला आहे,”
असे याहवेह म्हणतात.
12ते याहवेहबद्दल खोटे बोलतात;
ते म्हणतात, “ते काहीही करणार नाहीत!
आमच्यावर अरिष्ट कोसळणारच नाही;
आम्ही दुष्काळ आणि लढाई बघणारही नाही.
13संदेष्टे निव्वळ वारा आहेत
त्यांच्यामध्ये परमेश्वराचे वचन नाही.
म्हणून ते जे काही बोलतात ते सर्व त्यांच्यावरच कोसळू दे.”
14म्हणून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात:
“कारण या लोकांनी हे शब्द उच्चारले आहेत,
मी तुमच्या मुखात माझे शब्द भडकत्या अग्नीसारखे करेन
आणि जो या लोकांना सरपणाच्या लाकडांप्रमाणे जाळून भस्म करेल.”
15याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो,
मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या
बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन—
त्यांची भाषा तू जाणत नाही,
त्यांची वाणी तुला समजत नाही.
16त्यांचा भाता उघड्या कबरेप्रमाणे आहे;
त्यांचे सर्व योद्धे प्रतापी आहेत.
17ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील,
तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील,
गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील,
आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील.
त्यांच्या तलवारीने ते तुमची
जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील.
18“परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात. 19जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल.
20“याकोबाच्या वंशजांना
आणि यहूदीयाला हे जाहीर कर:
21ऐका, अहो मूर्खानो व बुद्धिहीन लोकांनो,
तुम्हाला डोळे आहेत तरी तुम्हाला दिसत नाही,
कान आहेत तरी तुम्हाला ऐकू येत नाही:
22तुम्ही माझे भय बाळगू नये काय?”
असे याहवेह विचारतात.
“माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय?
सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत,
एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही,
म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही;
त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही.
23परंतु माझ्या लोकांची अंतःकरणे हट्टी व बंडखोर आहेत;
माझ्याकडे पाठ फिरवून ते पथभ्रष्ट झाले आहेत.
24ते स्वतःस असे म्हणत नाहीत,
‘आपण आपल्या याहवेह परमेश्वराचे भय धरू,
जे आपल्याला प्रत्येक वर्षी वसंतॠतूत, हिवाळ्यात पाऊस देतात,
जे आपल्याला निश्चित वेळेवर पीक देतात.’
25तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात;
तुमच्या पातकांमुळे तुम्ही उत्तम गोष्टींना मुकले आहात.
26“माझ्या लोकांमध्ये दुष्ट लोक आहेत
शिकारी जसा आडोशाला दबा धरून पक्षांची वाट बघतो,
तसे ते माणसांना पकडण्यासाठी सापळे लावतात.
27पक्ष्यांनी खुराडे भरलेले असावे,
तशी त्यांची घरे कपटाने भरलेली आहेत,
म्हणून आता ते बलवान व श्रीमंत बनले आहेत.
28ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आहेत.
त्यांच्या दुष्कर्मांना मर्यादाच नाही;
ते न्याय करीत नाहीत.
अनाथांच्या न्यायाचा पाठपुरावा करीत नाहीत;
आणि गरिबांच्या रास्त हक्काचे समर्थन करत नाहीत.
29मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?”
असे याहवेह विचारतात.
“अशा राष्ट्राचा मी स्वतः
सूड घेऊ नये का?
30“या देशात एक महाभयंकर
व धक्कादायक गोष्ट घडली आहे:
31संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात,
याजक स्वतःचेच अधिकार चालवितात,
आणि माझ्या लोकांना ते आवडते.
पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन