YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 35

35
रेखाबी लोक
1योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम, हा यहूदीयाचा राजा असताना, यिर्मयाहला याहवेहकडून आलेले वचन हेच आहे: 2“रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.”
3त्याप्रमाणे याजन्याह, यिर्मयाहचा पुत्र, याजन्याहचा नातू, हबसिन्याहचा पुत्र, तो, त्याचे भाऊ व सर्व पुत्र—म्हणजे पूर्ण रेखाबी कुटुंब यांना मी भेटण्यास गेलो. 4सर्वांना मी याहवेहच्या मंदिरात आणले व इग्दल्याह, परमेश्वराच्या मनुष्याचा पुत्र, हानानाचे पुत्र जी खोली वापरीत असत, त्या खोलीत त्यांना नेले. ही खोली राजवाड्याचे अधिकारी वापरीत असलेल्या खोलीच्या बाजूस आणि मंदिराचा द्वारपाल शल्लूमचा पुत्र मासेयाह, याच्या खोलीच्या बरोबर वर होती. 5मग त्या रेखाबीसमोर मी द्राक्षारसाचे कटोरे व काही पेले ठेवले आणि, “द्राक्षारस प्या,” असे त्यांना म्हणालो.
6परंतु त्यांनी द्राक्षारस घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आम्ही पीत नाही, कारण आमचा पूर्वज, रेखाबचा पुत्र योनादाब#35:6 किंवा यहोनादाब याने आम्हाला अशी आज्ञा केली की, आम्ही किंवा आमच्या वंशजापैकी कोणीही कधीही द्राक्षारस पिऊ नये. 7त्या शिवाय आम्ही कधीही घरे बांधू नयेत, बीज पेरणी करू नये, द्राक्षमळे लावू नयेत; यापैकी कशाचीही मालकी पत्करू नये, तर आम्ही आजीवन तंबूंमध्येच राहावे. तर ज्या भूमीवर आम्ही विमुक्त म्हणून वसती करू, तिथे दीर्घकाळ राहू. 8आम्ही आमचा पिता रेखाबचा पुत्र यहोनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा पाळल्या आहेत. आम्ही, आमच्या पत्नींनी, पुत्रांनी वा कन्यांनी कधीही द्राक्षारस प्याला नाही. 9किंवा राहण्यासाठी घरे बांधली, वा द्राक्षमळे, शेते अथवा पिके घेतली नाहीत. 10आम्ही तंबूत राहिलो व आमचा पिता योनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा तंतोतंत पाळल्या आहेत. 11परंतु जेव्हा बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरने या देशावर हल्ला केला, आम्ही म्हटले, ‘चला, बाबिलोनचे व अराम्यांपासून आपला बचाव करण्यासाठी आपण यरुशलेमला पलायन करू या.’ म्हणून आम्ही यरुशलेम येथेच राहत आलो आहोत.”
12नंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले: 13“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: जा आणि यहूदीयाच्या लोकांना व जे यरुशलेममध्ये राहतात त्यांना सांग, ‘रेखाबवंशातील घराण्याकडून तुम्ही काही धडा शिकून माझी वचने का पाळली नाहीत?’ याहवेह असे जाहीर करतात. 14‘रेखाबचा पुत्र यहोनादाब याने त्याच्या वंशजांना आज्ञा दिली होती की द्राक्षारस पिऊ नये, आणि ही आज्ञा त्यांनी पाळली. त्यांच्या पूर्वजांची आज्ञा पाळण्याकरिता, आजतागायत ते द्राक्षारस पीत नाहीत. मी तुमच्याशी पुन्हापुन्हा बोललो, पण माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत. 15पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही. 16रेखाबचा पुत्र यहोनादाबच्या वंशजांनी आपल्या पित्याच्या आज्ञा संपूर्णपणे पाळल्या आहेत, पण या लोकांनी माझ्या आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे.’
17“म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘ऐका! मी यहूदीयावर व यरुशलेमवर जी अरिष्टे आणण्याची घोषणा केली होती ती अरिष्टे आणेन. मी त्यांच्याशी बोललो, पण ते ऐकत नाहीत; मी हाक मारतो, तेव्हा ते उत्तर देत नाहीत.’ ”
18मग यिर्मयाह रेखाबी लोकांच्या कुटुंबाकडे वळून त्यांना म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘तुम्ही तुमचे पूर्वज यहोनादाबचे प्रत्येक बाबतीत आज्ञापालन केले व त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या.’ 19म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘रेखाबचा पुत्र योनादाबच्या वंशामध्ये माझी सेवा करणाऱ्यांचा कधीही अभाव होणार नाही.’ ” 

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 35: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन