YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 36

36
यहोयाकीम यिर्मयाहचे चर्मपत्र जाळतो
1योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी यिर्मयाहला याहवेहचे हे वचन आले: 2“तू एक गुंडाळी घेऊन त्याच्यावर इस्राएल, यहूदीया व इतर राष्ट्रे यांच्याविषयी योशीयाहच्या काळापासून आतापर्यंत मी जे सर्व संदेश देत आलो आहे, ते लिही. 3जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.”
4तेव्हा यिर्मयाहने नेरीयाहचा पुत्र बारूख, याला बोलावून त्याला याहवेहने सांगितलेली सर्व वचने बोलून दाखविली आणि बारूखने ते चर्मपत्रावर लिहिले. 5मग यिर्मयाह नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाला, “माझ्यावर इथे प्रतिबंध लावण्यात आला आहे; मला याहवेहच्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही. 6म्हणून उपवासाच्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जा आणि मी सांगून तू चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने वाचून दाखव. त्या दिवशी यहूदीया प्रांताच्या नगरांतून आलेल्या सर्व लोकांना वाचून दाखव. 7कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.”
8यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूखने ते सर्व केले; याहवेहच्या मंदिरात चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची वचने लोकांना वाचून दाखविली. 9योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती. 10शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.
11शाफानचा नातू, गमर्‍याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली, 12तेव्हा तो राजवाड्यातील चिटणीसाच्या दालनात खाली गेला, तिथे सर्व अधिकारी—एलीशामा चिटणीस, शमायाहचा पुत्र दलायाह, अकबोरचा पुत्र एलनाथान, शाफानचा पुत्र गमर्‍याह, हनन्याहचा पुत्र सिद्कीयाह व तसेच इतर सर्व वरिष्ठ अधिकारी मसलतीसाठी जमले होते. 13नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्‍यांना सांगितले. 14तेव्हा अधिकार्‍यांनी कूशीचा पणतू, शेलेम्याहचा नातू, नथन्याहचा पुत्र, यहूदी याच्या हाती नेरीयाहचा पुत्र बारूखला सांगून पाठविले, “तू लोकांना वाचून दाखविलेले चर्मपत्र घेऊन इकडे ये.” त्याप्रमाणे नेरीयाहचा पुत्र बारूख हातात चर्मपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला. 15ते त्याला म्हणाले, “कृपया, बसा, व आम्हाला वाचून दाखवा.”
म्हणून नेरीयाहचा पुत्र बारूखाने त्यांना वाचून दाखविले. 16जेव्हा त्यांनी ती सर्व वचने ऐकली, तेव्हा सर्व अधिकारी अतिशय भयभीत नजरेने एकमेकांकडे बघू लागले व नेरीयाहचा पुत्र बारूखाला म्हणाले, “या सर्व वचनांचा राजाला अहवाल दिलाच पाहिजे.” 17त्यांनी नेरीयाहचा पुत्र बारूखाला विचारले, “आम्हाला सांग, हे सर्व तू कसे काय लिहिले? यिर्मयाहने सांगून तू हे लिहिले का?”
18त्यावर नेरीयाहचा पुत्र बारूखने म्हटले, “यिर्मयाहने ही वचने सांगितली व मी ती चर्मपत्रावर शाईने लिहिली.”
19अधिकारी नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाले, “तू आणि यिर्मयाह दोघेही लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळवू नका.”
20नंतर अधिकार्‍यांनी एलीशामा चिटणीसाच्या खोलीमध्ये ते चर्मपत्र ठेवले आणि राजाला भेटण्यासाठी ते राज्यसभेत गेले व ही सर्व गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. 21मग राजाने यहूदीस ते चर्मपत्र आणण्यासाठी पाठविले, व यहूदीने चिटणीस एलीशामाच्या खोलीमधून ते आणले आणि सर्व अधिकारी राजाजवळ उभे असताना, त्याने तो राजाला वाचून दाखविले. 22हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता. 23यहूदीने तीन-चार रकाने वाचून संपवली की राजा वाचलेला भाग लेखनिकाच्या चाकूने तेवढा कापून विस्तवात टाकी. असे संपूर्ण चर्मपत्र जळून नष्ट झाले. 24राजा व त्याच्या इतर सर्व सेवेकऱ्यांनी हे ऐकल्यानंतर भय वाटल्याचे दर्शविले नाही वा संतापाने आपले वस्त्र फाडले नाही. 25त्यावेळी एलनाथान, दलायाह व गमर्‍याह या तिघांनी हे चर्मपत्र जाळू नये असे राजाला परोपरीने विनविले, परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही. 26याउलट, राजाने राजपुत्र यरहमेल, अज्रीएलचा पुत्र सेरायाह व अब्देलचा पुत्र शेलेम्याह यांना हुकूम केला की त्यांनी नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूख व यिर्मयाह संदेष्टा यांना अटक करावी. परंतु याहवेहने त्यांना लपवून ठेवले.
27राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली: 28“दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ. 29याशिवाय यहूदीयाचा राजा यहोयाकीमला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू ते चर्मपत्र जाळले व म्हटले, “बाबेलचा राजा निश्चितच येईल व हा देश नष्ट करेल आणि मनुष्य व पशूंना पूर्णपणे नाहीसे करेल, असे त्या चर्मपत्रावर का लिहिले?” 30म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील. 31मी त्याला, त्याच्या लेकरांना व त्याच्या सेवेकऱ्यांना त्यांच्या सर्व दुष्टतेकरिता शिक्षा देईन; मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर, तसेच यहूदीयात राहणाऱ्या लोकांवर व यरुशलेम येथील सर्व लोकांवर घोषित केलेली अरिष्टे आणेन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.’ ”
32मग यिर्मयाहने पुन्हा दुसरे चर्मपत्र घेतले, यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळलेल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूखाला पुन्हा सांगून त्याच्याकडून लिहून घेतली. आणि त्यासारख्या आणखी पुष्कळ वचनाची त्यामध्ये भर घातली गेली.

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 36: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन