यिर्मयाह 34
34
सिद्कीयाहला यिर्मयाहचा इशारा
1बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, त्याची संपूर्ण सेना व त्याच्या अंकित असलेल्या सर्व राज्यांच्या व लोकांच्या सेना, यरुशलेम व सभोवतालची सर्व नगरे यांच्याबरोबर युद्ध करीत असताना, यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले: 2“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याला जाऊन सांग की याहवेह म्हणतात, ‘मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हातात देईन व तो ते जाळून टाकील. 3तू त्याच्या तावडीतून सुटणार नाहीस पण तू पकडल्या जाशील व त्याच्या हातात पडशील. तू स्वतःच्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला बघशील, आणि तो तुझ्याशी समोरासमोर बोलेल व तू बाबेलला जाशील.
4“ ‘परंतु हे सिद्कीयाह, यहूदीयाच्या राजा, याहवेहचे हे वचन ऐक! याहवेह तुझ्याविषयी असे म्हणतात: तलवारीने तुझा वध होणार नाही; 5पण तू शांतीने मरण पावशील. जसा तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी लोकांनी सन्मानदर्शक मृतकाग्नी जाळला, तसा तुझ्या सन्मानार्थही जाळतील आणि ते तुझ्यासाठी विलाप करून म्हणतील, “हाय हाय! आमच्या स्वामी!” मी स्वतः हे वचन देत आहे, असे याहवेह घोषित करतात.’ ”
6त्याप्रमाणे यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा सिद्कीयाह राजाला यरुशलेममध्ये हे सर्वकाही सांगितले. 7यावेळी बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमशी युद्ध करीत होते, यहूदीया प्रांतातील इतर नगरे—लाखीश व अजेकाह—अद्यापही टिकाव धरून होती. यहूदीयात एवढीच तटबंदी असलेली शहरे बाकी होती.
गुलामांची मुक्तता
8यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले. 9प्रत्येकाने आपआपले इब्री दास व दासी यांना मुक्त करावे; कोणत्याही यहूदी मनुष्याने दुसर्या यहूदी मनुष्यास बंदी बनवून ठेऊ नये. 10सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले. 11पण नंतर त्यांनी आपले मन बदलले व मुक्त केलेल्या आपल्या सेवकांना पुन्हा गुलाम केले.
12मग यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले: 13“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले, त्यावेळी मी त्यांच्याशी एक करार केला होता. मी म्हटले, 14‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही. 15अलीकडेच तुम्ही पश्चात्ताप केला व माझ्या दृष्टीने योग्य ते केले: आपल्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा केली. आम्ही तसे करू, असे तुम्ही मला माझे नाव धारण केलेल्या मंदिरात शपथपूर्वक वचन दिले होते. 16परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली.
17“म्हणून याहवेह असे म्हणतात: तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही; तुमच्या स्वतःच्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा करीत नाही. म्हणून मी आता तुमची ‘मुक्तता’ करेन, असे याहवेह जाहीर करतात—युद्ध, दुष्काळ व मरी यांच्याद्वारे तुम्हाला मरणाची ‘मुक्तता’ मिळेल. सर्व जगातील राज्यात मी तुम्हाला घृणास्पद असे करेन. 18ज्यांनी माझा करार मोडला व माझ्या करारातील अटी पूर्ण करण्याचे नाकारले आहे, त्यांना ज्याप्रमाणे वासरू कापून त्याचे दोन भाग करून त्यामधून चालत जावे, त्याचप्रमाणे मी त्यांना वागवेन. 19यहूदीया व यरुशलेममधील अधिपती, न्यायालयीन अधिकारी, याजक व सामान्य लोक जे दोन भाग केलेल्या वासराच्या मधून चालत गेले, 20मी जे तुम्हाला ठार करू पाहतात त्या तुमच्या शत्रूंच्या हवाली करेन. त्यांची प्रेते पक्षी व हिंस्र श्वापदांचे अन्न होतील.
21“बाबेलच्या राजाचे सैन्य या शहरातून काही काळासाठी गेले असले, तरी मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे अधिकारी यांना जे त्यांना ठार करू पाहतात, त्या त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन. 22मी हा आदेश देणार आहे, असे याहवेह जाहीर करतात, मी त्यांना या शहरात परत आणेन. ते पुन्हा या नगरांविरुद्ध लढतील, ते जिंकतील व त्यास जाळून टाकतील. यहूदीयाची सर्व शहरे मी अशी ओसाड करेन जिथे कोणीही वसती करू शकणार नाही.”
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 34: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.