YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 33

33
पुनर्वसनाचे अभिवचन
1यिर्मयाह अद्यापही तुरुंगात असताना याहवेहचे त्याला दुसऱ्यांदा वचन आले: 2“याहवेह असे म्हणतात, आकाश व पृथ्वी ज्यांनी निर्माण केली व स्थापित केली—ज्यांचे नाव याहवेह आहे, ते म्हणतात: 3‘मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला माहीत नसलेल्या महान आणि शोधता न येणाऱ्या गोष्टी तुला सांगेन.’ 4याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, या नगरातील जी घरे आणि यहूदीयातील राजवाडे वेढा देऊन व तलवारीच्या प्रहाराचा उपयोग करून पाडून टाकण्यात आले आहेत, त्याविषयी असे म्हणतात, 5बाबेलांशी युद्ध करताना: ‘ज्या लोकांवर मी माझ्या कोपाने प्रहार करणार आहे, ते त्या लोकांच्या शवांनी भरून जातील. त्यांनी केलेल्या सर्व दुष्टतेमुळे मी या नगराला विमुख होईन.
6“ ‘तरी देखील, मी यरुशलेमला आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करेन; मी त्यांना आरोग्य देईन व विपुल शांती आणि सुरक्षितेचा आनंद उपभोगू देईन. 7मी यहूदीया आणि इस्राएलना बंदिवासातून परत आणेन व त्यांची पुनर्बांधणी करून त्यांना पूर्ववत करेन. 8त्यांनी माझ्याविरुद्ध केलेली सर्व पापे मी शुद्ध करेन, आणि माझ्याविरुद्ध बंडखोरी करून केलेल्या सर्व पापांची क्षमा करेन. 9मग पृथ्वीवरील जी सर्व राष्ट्रे मी त्यांच्यासाठी केलल्या सर्व चांगल्या गोष्टी ऐकतील, त्यांच्यापुढे हे नगर मला बहुमानास्पद, आनंददायक, प्रशंसा व आदर देणारे होईल; माझ्या लोकांना मी प्रदान केलेली विपुल समृद्धी व शांती पाहून, त्या राष्ट्रांना दरारा व आदरयुक्त भीती वाटेल.’
10“याहवेह असे म्हणतात: ‘या नगराविषयी तुम्ही म्हणता, “हे उद्ध्वस्त झालेले ठिकाण आहे, इथे ना लोक राहतात ना पशू.” तरी देखील वैराण झालेल्या यहूदीयाच्या नगरात व यरुशलेमच्या रस्त्यांवर पुन्हा ते स्वर ऐकू येतील. 11आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्‍यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील,
“याहवेहला धन्यवाद द्या,
कारण ते चांगले आहेत;
त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.”
मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात.
12“याहवेह असे म्हणतात: ‘कोणीही मनुष्य व पशू नसलेल्या या उजाड ठिकाणी—यातील सर्व नगरात कळपांना विश्रांती मिळण्यासाठी मेंढपाळांना कुरणे मिळतील. 13पश्चिमेकडील डोंगरातील गावात व तळवटीत, व नेगेवच्या गावात, बिन्यामीन प्रांतात, यरुशलेमच्या सभोवतालच्या प्रदेशात आणि यहूदीयाच्या सर्व नगरात, मोजणाऱ्यांच्या हाताखालून पुन्हा त्यांचे कळप जातील,’ असे याहवेह म्हणतात.
14“ ‘असे दिवस येतील, जेव्हा इस्राएल व यहूदीयाला दिलेले अभिवचन मी पूर्ण करेन, याहवेह जाहीर करतात.
15“ ‘त्या दिवसात व त्या समयी
मी दावीदाच्या वंशातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन;
आणि तो या राष्ट्रात न्यायाने व नीतीने कार्य करेल.
16त्या दिवसात यहूदीयाचा बचाव होईल
व यरुशलेम येथील लोक सुरक्षितपणे राहतील.
याहवेह जे आमचे नीतिमान तारणकर्ता
या नावाने संबोधित करण्यात येईल.’
17कारण याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएलाच्या सिंहासनावर बसण्यासाठी दावीदाला वारसाचा अभाव कधीही होणार नाही. 18तसेच माझ्या समक्षतेत निरंतर होमार्पणे, अन्नार्पणे व यज्ञार्पणे करण्यासाठी लेवीय याजकाचा अभाव कधीही होणार नाही.’ ”
19नंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले: 20“याहवेह असे म्हणतात, ‘मी दिवसाशी केलेला करार व रात्रीशी केलेला करार तुम्ही मोडू शकला, तर दिवस व रात्र योग्य समयी येणार नाहीत, 21मग माझा सेवक दावीद याच्या बरोबरचा माझा करार—त्याचप्रमाणे माझ्या समक्षतेत उभे राहून सेवा करणारे लेवीय याजक यांच्या बरोबरचा माझा करार—भंग पावू शकेल आणि दावीदाच्या सिंहासनावर बसून राज्य करण्यास त्याचा कोणीही वंशज असणार नाही. 22ज्याप्रमाणे आकाशातील तारे मोजता येत नाहीत व समुद्र किनार्‍यावरील वाळूचे मापन करता येत नाही, त्याचप्रमाणे माझा सेवक दावीद याचे वंशज आणि माझी सेवा करणाऱ्या लेवी वंशज यांना मी असंख्य करेन.’ ”
23याहवेहचे वचन यिर्मयाहला आले: 24“लोक काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आले आहे काय, ते म्हणतात, ‘याहवेहने निवडलेल्या यहूदीया व इस्राएल राज्यांचा#33:24 किंवा कुटुंबाचा त्याग केला’? म्हणून ते माझ्या लोकांची घृणा करतात आणि त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळखत नाहीत. 25यावर याहवेह असे म्हणतात: ‘जर मी रात्र व दिवस यांच्याशी करार केला नसता व आकाश व पृथ्वी स्थापित केले नसते, 26तर मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या या वंशजांवर राज्य करण्यास याकोबाचे व माझा सेवक दावीदाचे वंशज नाकारले असते व दावीदाच्या पुत्राला निवडले नसते. पण मी त्यांची पूर्वीची समृद्धी त्यांना परत देईन#33:26 त्यांना बंदिवासातून सोडवून व त्यांच्यावर दया करेन.’ ”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 33: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन