YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 12

12
यिर्मयाहची तक्रार
1हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो,
तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता.
तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या:
वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात?
सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात?
2तुम्हीच त्यांचे रोपण केले आणि ते मुळावले;
ते वाढतात व फलवंत होतात.
तुमचे नाव सतत त्यांच्या मुखात असते
परंतु त्यांच्या अंतःकरणापासून तुम्ही फार दूर असता.
3पण याहवेह, तुम्ही मला ओळखता;
मला बघता व तुमच्याबद्दल माझ्या विचारांची परीक्षा घेता.
मेंढरांना कत्तलखान्याकडे फरफटत न्यावे तसे त्यांना न्या!
कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना वेगळे करा!
4किती काळ ही भूमी कोरडी ठणठणीत राहील
आणि प्रत्येक कुरणातील गवत सुकलेले असेल?
कारण जे या ठिकाणी राहतात ते दुष्ट आहेत,
पशू व पक्षी नाहीसे झाले आहेत.
त्यावर लोक म्हणतात,
“परमेश्वर आमचा परिणाम बघणारही नाही.”
परमेश्वराचे उत्तर
5“जर माणसांबरोबर तू पायी धावतो
आणि तू थकून इतका झिजून गेलास,
तर घोड्यांबरोबर तू स्पर्धा कशी करशील?
जर सुरक्षित देशात#12:5 किंवा केवळ तिथेच तुला सुरक्षित वाटते तू अडखळतोस,
तर यार्देनेच्या जंगलात#12:5 किंवा यार्देनेच्या पुरात तू कसे करशील?
6तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य—
यांनी देखील तुझा विश्वासघात केला आहे;
ते मोठ्याने ओरडून तुझा विरोध करतात.
तुझ्याशी ते गोड गोड गोष्टी बोलले तरी
त्यांच्यावर भरवसा ठेवू नकोस.
7“मी माझ्या लोकांचा त्याग करेन,
माझ्या वारसांचा परित्याग करेन;
माझ्या अतिप्रियजनांना
मी त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.
8माझे वारस माझ्याकरिता
जणू वनातील सिंहिणीप्रमाणे झाले आहेत.
ती माझ्यावर गर्जना करते;
म्हणून मी तिचा तिरस्कार करतो.
9माझे वारसदार
एखाद्या ठिपकेदार पक्ष्यासारखे झाले नाहीत का,
त्यांच्यावर इतर हिंस्र पक्ष्यांनी चहूबाजूंनी हल्ले चढविले नाहीत का?
जा आणि त्यांना गिळंकृत करण्यासाठी
सर्व वनपशूंना एकत्र कर.
10अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील
मळा पायाखाली तुडवतील;
ते माझा रमणीय मळा
ओसाड करतील.
11माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून
तो ओसाड केला जाईल,
संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल,
कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल.
12उजाड वाळवंटाच्या टोकांवर
संहार करणारे झुंडीने येतील,
कारण याहवेहची तलवार भूमीला गिळून टाकेल,
एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत
कोणीही सुरक्षित राहणार नाही.
13माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील;
ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही.
कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे
ते लज्जेचे पीक गोळा करतील.”
14म्हणून याहवेह असे म्हणतात: “माझ्या सर्व दुष्ट शेजाऱ्यांनी, मी माझ्या इस्राएली लोकांना जो देश वतन म्हणून दिला, तो बळकावला. त्यांना मी त्यांच्या भूमीतून उखडून टाकेन आणि मी यहूदीयाच्या लोकांना त्यांच्यामधून घालवून देईन. 15परंतु त्यांना घालवून दिल्यानंतर मी पुन्हा सर्वांवर करुणा करेन आणि तुमच्यातील प्रत्येक मनुष्याला परत तुमच्या वतनात, तुमच्या देशात आणेन. 16आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील. 17परंतु माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार्‍या राष्ट्राला मी पूर्णपणे मुळासकट उपटून टाकेन व नष्ट करेन,” असे याहवेह जाहीर करतात.

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 12: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन