YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 13

13
तागाचा कमरबंद
1याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.” 2तेव्हा याहवेहच्या सांगण्याप्रमाणे मी एक कमरबंद विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला.
3नंतर मला दुसऱ्यांदा याहवेहचा संदेश मिळाला: 4“जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात#13:4 फरात आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.” 5मी याहवेहने सांगितल्याप्रमाणे फरात येथे गेलो व तो लपवून ठेवला.
6बर्‍याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.” 7मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता.
8तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 9“याहवेह असे म्हणतात: अशाच प्रकारे मी यहूदीयाचा गर्व व यरुशलेमचा महागर्व नष्ट करणार आहे. 10हे दुष्ट लोक, माझी वचने ऐकण्याचे नाकारतात, आणि स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टीपणाच्या मागे जातात आणि इतर दैवतांची सेवा व आराधना करतात, ते या कमरबंदाप्रमाणे होतील—पूर्णपणे निरुपयोगी! 11याहवेह म्हणतात, ‘मनुष्याचा कमरबंद त्याच्या कमरेला वेढा घातलेला असतो, त्याचप्रमाणे यहूदीयाच्या सर्व लोकांना व इस्राएलच्या सर्व लोकांना मी वेढा घातला आहे, जेणेकरून त्यांनी माझ्या गौरवाचे व प्रशंसेचे व मानाचे लोक व्हावे. पण त्यांनी ऐकले नाही.’
द्राक्षरसाच्या बुधल्या
12“त्यांना सांग: ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या.’ यावर ते जर तुला म्हणतील, ‘सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या हे आम्हाला माहीत नाही काय?’ 13मग त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: या देशातील सर्व रहिवाशांना, अगदी दावीदाच्या राजासनावर बसणारा राजा, याजक व संदेष्टे यांच्यापासून ते सर्व यरुशलेमनिवासी यांना मी मदिरेने झिंगून टाकणार आहे. 14ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ”
बंदिवासाची धमकी
15ऐका व लक्ष द्या,
उर्मट होऊ नका,
कारण असे याहवेहने म्हटले आहे.
16तुमच्या याहवेह परमेश्वराला गौरव द्या
तुमच्यावर त्यांनी निबिड अंधार पाडण्याच्या आधी,
अंधारलेल्या डोंगरावर
तुमची पावले अडखळण्याआधी,
तुम्ही प्रकाशाची आशा कराल,
पण ते त्यास गहन अंधकारात
आणि निबिड काळोखात बदलतील.
17जर तुम्ही माझे ऐकले नाही,
तर मी एकांतात अश्रू ढाळेन
तुमच्या गर्विष्ठपणामुळे;
माझे डोळे घोर रुदन करतील,
माझ्या अश्रूंचा पूर लोटेल,
कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.
18राजाला व राजमातेला सांगा,
“तुमच्या राजासनावरून खाली उतरा,
कारण तुमचे वैभवी मुकुट
तुमच्या मस्तकांवरून पडतील.”
19यहूदीयाच्या दक्षिणेकडील नेगेवप्रांतातील नगरवेशी बंद होतील,
आणि त्या उघडण्यास तिथे कोणीही नसेल.
संपूर्ण यहूदीयाला बंदिवासात नेण्यात येईल
पूर्णपणे नेण्यात येईल.
20नेत्र उंच करा व पाहा
उत्तरेकडून कूच करीत चालून येणार्‍यांना पाहा.
ज्या मेंढरांचा तुला अभिमान होता,
विश्वासाने तुझ्या सुपूर्द केलेला तुझा कळप कुठे आहे?
21ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले
त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील?
तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या
स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का?
22“हे सर्व माझ्यावर का ओढवले?”
असा प्रश्न तू जर स्वतःला विचारलास—
तर तुझ्या घोर पापांमुळे हे घडत आहे
तुझी वस्त्रे फाडण्यात आली
तुझ्या शरीरास दुष्टतेने वागविले आहे.
23कूशी मनुष्याला आपल्या त्वचेचा रंग बदलता येईल का
चित्त्याला आपल्या शरीरावरील ठिपके बदलता येतील का?
त्याचप्रमाणे तुला सत्कर्मे करता येत नाहीत
दुष्कर्मे करण्याची तुला चटक लागली आहे.
24“वार्‍यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन
जणू वाळवंटी वाऱ्याने उडणारी.
25हाच तुझा वाटा आहे,
तुला माझ्याकडून मिळावयाचा वतनभाग हाच होय,”
असे याहवेह जाहीर करतात,
“कारण तू मला विसरला आहेस
आणि खोट्या दैवतांवर विश्वास ठेवलास.
26म्हणून मी तुझी वस्त्रे वर ओढून तुझ्या चेहऱ्यावर टाकेन
जेणेकरून तुझी लाज उघडी पडेल—
27तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे,
व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती!
डोंगरावर आणि शेतात चाललेली
तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत.
हे यरुशलेम, तुला धिक्कार असो!
तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन