YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 11

11
करार भंग होतो
1याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: 2“या कराराच्या ठराविक अटी ऐकून घे व यहूदीयाचे लोक व यरुशलेममध्ये राहणारे लोक, यांना त्या सांग. 3त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे— 4‘इजिप्तच्या गुलामगिरीतून, लोखंडी भट्टीतून मी त्यांना सोडवून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना हे नियम सांगितले होते.’ मी म्हटले ‘माझ्या आज्ञा व मी जे सुचविले ते पालन करा, आणि मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन. 5तेव्हा मी तुमच्या पूर्वजांना वाहलेली शपथ पूर्ण करेन, आणि दूध व मध वाहणारा देश’ ज्यात आज तुम्ही राहत आहात तो मी तुम्हाला देईन.”
मी उत्तर दिले, “याहवेह, आमेन.”
6नंतर याहवेहने मला म्हटले, “यहूदीयाच्या प्रत्येक नगरात व यरुशलेमच्या रस्त्यातून जा व हा संदेश घोषित कर: ‘कराराच्या अटी ऐकून घ्या व त्यांचे पालन करा. 7कारण तुमच्या पूर्वजांना मी इजिप्तमधून बाहेर आणले तेव्हापासून मी त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितले होत, “तुम्ही माझी आज्ञा पाळा.” 8परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ”
9नंतर याहवेह मला म्हणाले, “यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे. 10ते त्यांच्या पूर्वजांच्या पापाकडे परतले आहेत, ज्यांनी माझे वचन पाळणे नाकारले होते. त्यांनी इतर दैवतांचे अनुसरण करून सेवा केली. त्यामुळे यहूदीया व इस्राएलाच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडला आहे. 11म्हणून याहवेह असे म्हणाले: ‘मी त्यांच्यावर घोर आपत्ती घेऊन येणार त्यातून त्यांची सुटका होणार नाही. ते रडून दयेसाठी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही. 12यहूदीयातील नगर आणि यरुशलेममधील लोकांनी ज्या अन्य देवतांसमोर धूप जाळला, ते त्यांचा धावा करतील, परंतु त्यांना ते आपत्तीतून सोडवू शकणार नाही. निराशेच्या आपत्तीतून त्यांना सोडवू शकणार नाही. 13हे यहूदीया, जेवढी तुमची शहरे आहेत तेवढीच त्या दैवतांची संख्या; आणि तुमच्या या लाजिरवाण्या दैवतांच्या वेद्या, बआलापुढे धूप जाळण्याच्या वेद्या यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावर आहेत.’
14“म्हणून हे यिर्मयाह, इतःपर या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी रडू नकोस अथवा विनवण्याही करू नकोस; कारण अखेरीस निराशेने व्याकूळ होऊन ते माझ्यापुढे पदर पसरतील. परंतु मी त्यांचे ऐकणार नाही.
15“माझी प्रिया माझ्या मंदिरात काय करीत आहे?
इतरांसह मिळून ती तिच्या दुष्ट कारस्थानाची योजना करीत आहे का?
तुमच्या अर्पणाचे शुद्धीकरण करून तुमची शिक्षा परतवू शकाल का?
जेव्हा तुम्ही तुमच्या दुष्ट योजना पार पाडण्यात व्यस्त राहता,
तेव्हा तुम्ही आनंदित होता.”
16याहवेह तुम्हाला बहरलेला जैतून वृक्ष म्हणत असत
सुंदर आकाराच्या फळांनी भरलेला.
परंतु एखाद्या वादळाच्या भयंकर गर्जनेने
ते आता त्याला अग्नीने भस्म करतील,
आणि त्याच्या फांद्या मोडून जातील.
17सर्वसमर्थ याहवेह, ज्यांनी तुमचे रोपण केले, त्यांनी तुमचा सर्वनाश करण्याची आज्ञा दिली आहे, कारण इस्राएल व यहूदीया या दोन्ही लोकांनी दुष्टपणा केला आहे आणि बआलापुढे धूप जाळून माझा क्रोधाग्नी भडकविला आहे.
यिर्मयाहाविरुद्ध कट
18याहवेहने त्यांचे सर्व कारस्थान मला सांगितले, म्हणून ज्यावेळी त्यांनी ते काय करीत आहेत हे मला दाखविले, मला ते आधीच कळले होते. 19कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले,
“झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या;
याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या,
म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.”
20सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता
मन व अंतःकरणाची परीक्षा घेता,
त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या,
कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत.
21म्हणून अनाथोथच्या लोकांविषयी, जे माझा जीव घेण्याची धमकी देतात, ते म्हणतात “याहवेहच्या नावाने भविष्यवाणी करू नको, नाहीतर आमच्या हातून तुझा जीव जाईल;” 22म्हणून सर्वसमर्थ याहवेहने मला असे उत्तर दिले: “मी त्यांना शिक्षा देईन. त्यांचे पुरुष तलवारीस बळी जातील, त्यांचे पुत्र व कन्या उपासमारीने मरतील. 23त्यांच्यातील एकही जिवंत राहणार नाही. कारण त्यांच्या शिक्षेचे वर्ष येताच मी अनाथोथच्या लोकांवर अरिष्ट आणेन.”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 11: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन