यिर्मयाह 10
10
परमेश्वर आणि मूर्ती
1हे इस्राएलच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका. 2याहवेह असे म्हणतात:
“इतर राष्ट्रांचे मार्ग शिकू नका
जरी त्यांच्यामुळे इतर राष्ट्रे भयभीत होतात,
तरी आकाशाच्या चिन्हांनी तुम्ही भयभीत होऊ नका.
3कारण लोकांच्या प्रथा व्यर्थ आहेत;
ते जंगलातील एक लाकूड कापून आणतात,
आणि एक कारागीर हातातील छेनीने त्यास आकार देतो.
4ते त्याला सोने आणि चांदीने सजवितात;
ती एका जागी स्थिर रहावी,
पडू नये म्हणून खिळे व हातोडा यांनी ती ठोकून घट्ट बसवितात.
5ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच,
या मूर्तीला बोलता येत नाही;
तिला तर उचलून न्यावे लागते
कारण तिला चालता येत नाही.
त्यांना घाबरू नकोस;
त्या काहीही इजा करू शकत नाही
तुमचे काही भले सुद्धा करत नाही.”
6हे याहवेह, तुमच्यासारखे कोणीही नाही.
कारण तुम्ही महान आहात,
आणि तुमचे नाव अति सामर्थ्यशाली आहे.
7हे राष्ट्रांच्या राजा,
तुमचे भय नाही असा कोण आहे?
अशा श्रद्धेच्या योग्य केवळ तुम्हीच आहात,
सर्व राष्ट्रातील सुज्ञ पुढाऱ्यांमध्ये
आणि जगातील सर्व राज्यांमध्ये
तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही.
8लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते,
ते सर्व निर्बुद्ध व मूर्ख आहेत;
9ते तार्शीशहून चांदीचे पत्रे
आणि उफाजहून सोन्याचे पत्रे आणून
कुशल कारागीर व सोनारांकडून मूर्ती घडवून घेतात.
मग त्यावर ते निळी व जांभळी वस्त्रे चढवितात—
हे सर्व निष्णात कारागिरांनी तयार केलेले असते.
10परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत;
ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत.
जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते;
त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.
11“त्यांना हे सांग: ‘ही दैवते, ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, ती या पृथ्वीवरून आणि आकाशाच्या खालून नष्ट होतील.’ ”
12परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली;
संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली
आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.
13जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघगर्जना करतात;
ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात.
ते विजा आणि पाऊस पाठवितात
आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.
14प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे;
प्रत्येक सोनार त्याच्या मूर्तींनी लज्जित झाला आहे.
त्याने घडविलेल्या प्रतिमा खोट्या आहेत.
त्यांच्यामध्ये श्वास नाही.
15त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत;
जेव्हा त्यांचा न्याय होईल, तेव्हा त्यांचा नाश होईल.
16परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही.
कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत,
इस्राएलसहित, ते लोक त्यांचे वारस आहेत;
सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.
आगामी विनाश
17तुम्ही, जे वेढ्यात राहत आहात,
उठा, ही भूमी सोडण्यासाठी तुमच्या सामानाची बांधाबांध करा.
18कारण याहवेह असे म्हणतात:
“जे या देशाचे रहिवासी आहेत त्यांना
यावेळी मी तुम्हाला या देशातून बाहेर भिरकावून देईन;
त्यांच्यावर महासंकटे आणेन
म्हणजे ते सहजगत्या पकडल्या जातील.”
19मला धिक्कार असो! कारण मला जखम झाली आहे!
ती असाध्य आहे!
तरी देखील मी स्वतःला म्हटले,
“हा माझा आजार आहे आणि तो मला सहन केलाच पाहिजे.”
20माझा तंबू धुळीला मिळाला आहे;
त्याच्या सर्व दोऱ्या तुटल्या आहेत.
माझी मुले माझ्यापासून दूर गेली आहेत आणि नाहीशी झाली आहेत;
माझा तंबू उभारण्यासाठी कोणीही राहिले नाही,
माझे निवासस्थान पुन्हा बांधण्यास कोणीही नाही.
21माझे मेंढपाळ असमंजस आहेत
कारण ते याहवेहचे मार्गदर्शन घेत नाहीत;
म्हणून ते समृद्ध होत नाहीत
आणि त्यांच्या सर्व कळपांची पांगापांग होते.
22ऐका! तो अहवाल येत आहे—
उत्तरेकडून एक महाभयंकर ध्वनी ऐकू येत आहे!
तो यहूदीयाची नगरे निर्जन करेल,
तिथे कोल्हे भटकतील.
यिर्मयाहची प्रार्थना
23याहवेह, मला माहीत आहे की मानवाचे जीवन त्यांच्या हातात नाही;
ते स्वतःचे मार्गदर्शन करू शकत नाहीत.
24हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा—
रागाने करू नका,
नाहीतर मी नाहीसा होईन.
25या राष्ट्रांवर आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करा
जे तुमचा अधिकार मान्य करीत नाहीत,
जे लोक तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत.
त्यांनी याकोबाला गिळले आहे;
त्याला संपूर्णपणे गिळंकृत केले आहे
आणि त्यांच्या मातृभूमीचा नायनाट केला आहे.
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 10: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.