YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 40

40
परमेश्वराच्या लोकांचे सांत्वन
1सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा,
तुमचे परमेश्वर असे म्हणतात.
2यरुशलेम बरोबर कोमलपणे बोला,
आणि तिला असे घोषित करा की,
तिची कठोर सेवा पूर्ण झाली आहे,
तिच्या पापाची परतफेड झाली आहे,
याहवेहच्या हातातून तिला
तिच्या सर्व पापांसाठी दुप्पट मिळाले आहे.
3बोलविणार्‍याचा आवाज म्हणतो:
“अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली
याहवेहसाठी मार्ग तयार करा;
आणि आमच्या परमेश्वरासाठी वाळवंटामध्ये
महामार्ग सरळ करा,
4प्रत्येक दरी उंच केली जाईल,
प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल;
खडबडीत जमीन सपाट होईल,
खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल.
5आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल,
आणि सर्व लोक ते एकत्र पाहतील.
कारण याहवेहच्या मुखाने हे बोलले आहे.”
6एक वाणी म्हणाली, “आरोळी द्या.”
आणि मी म्हणालो, “मी काय आरोळी देऊ?”
“सर्व लोक गवतासारखे आहेत,
आणि त्यांचे विश्वासूपण वनातील फुलांसारखे आहे.
7गवत सुकते आणि फुले गळून पडतात,
कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो.
निश्चितच लोक गवत आहेत.
8गवत सुकते आणि फुले गळून पडतात,
परंतु आपल्या परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.”
9तुम्ही जे सीयोनसाठी सुवार्ता आणता,
उंच डोंगरावर जा.
यरुशलेममध्ये सुवार्ता आणणारे तुम्ही,
तुमचा आवाज उंचावून आरोळी द्या,
आवाज उंच करा, घाबरू नका;
यहूदीयाच्या नगरांना सांगा,
“तुमचे परमेश्वर येत आहेत!”
10पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत,
आणि ते बलाढ्य हाताने राज्य करतात.
पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याबरोबर आहे,
आणि ते देत असलेला मोबदला त्यांच्याबरोबर आहे.
11ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात:
ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात
आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात;
जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.
12त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे,
किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत?
पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे,
किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे
आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?
13याहवेहचा आत्मा#40:13 मन कोण जाणू शकेल,
किंवा याहवेहना सल्ला देऊ शकेल असा कोण सल्लागार आहे?
14ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला,
आणि त्यांना योग्य मार्ग कोणी शिकवला?
असा कोण होता ज्याने त्यांना ज्ञान शिकविले,
किंवा कोणी त्यांना समंजसपणाचा मार्ग दाखविला?
15राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत;
त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते;
बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.
16लबानोनांच्या विशाल वनाची लाकडे वेदीच्या अग्नीसाठी पुरेशी नाहीत,
तसेच होमार्पणासाठी तेथील असंख्य जनावरे सुद्धा पुरेशी नाहीत.
17त्यांच्यापुढे सर्व राष्ट्रे काहीच नसल्यासारखी आहेत;
ते त्यांना निरुपयोगी असे समजतात.
त्यांच्या दृष्टीने शून्यवत आहेत.
18तर मग तुम्ही परमेश्वराची तुलना कोणाबरोबर कराल?
तुम्ही कोणत्या प्रतिमेला त्यांची उपमा द्याल?
19एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो,
आणि सोनार त्याला सोन्याने मढवितो
आणि तिची चांदीच्या साखळ्यांनी सजावट करतो.
20गरीब लोक अशा प्रकारचे अर्पण करू शकत नाही
सडले जाणार नाही, असे लाकूड ते निवडतात;
ती मूर्ती पडणार नाही अशी तिची रचना करण्यासाठी
ते एका कुशल कारागिराला शोधतात.
21तुम्हाला माहीत नाही काय?
तुम्ही ते कधी ऐकले नाही काय?
तुम्हाला ते सुरुवातीपासूनच सांगितले नव्हते काय?
पृथ्वीची स्थापना होताच तुम्ही ते कधी जाणले नाही काय?
22जे पृथ्वीवरील मंडलावर विराजमान होतात,
त्यावरील लोक त्यांना टोळांप्रमाणे दिसतात.
ते आकाशे एखाद्या आच्छादनाप्रमाणे पसरवितात,
आणि तंबूप्रमाणे त्याला फैलावून आपला डेरा तयार करतात.
23ते राजपुत्रांना तुच्छतेस आणतात
आणि या जगातील राज्यकर्त्यांना शून्यवत करून टाकतात.
24लागण करताच,
पेरणी करताच,
ते जमिनीत मूळ धरू लागते तोच,
ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते,
आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो.
25“माझी तुलना तुम्ही कोणाशी कराल?
माझी बरोबरी करेल असा कोण आहे?” असे पवित्र परमेश्वर विचारतात.
26तुमची दृष्टी वर करा व आकाशाकडे पाहा:
हे सर्व कोणी निर्माण केले आहे?
एकामागून एक असे हे तारांगण कोणी अस्तित्वात आणले आहे,
आणि त्यातील प्रत्येकाला ते नावाने हाक मारतात.
त्यांच्या थोर सामर्थ्यामुळे व त्यांच्या अमर्याद शक्तीमुळे
त्यातील एकही कधी हरवत नाही.
27हे याकोबा, तू अशी तक्रार का करतो?
हे इस्राएला, असे तू कसे म्हणतोस,
“याहवेहपासून माझे मार्ग लपलेले आहेत;
माझे परमेश्वर माझ्या संकटाकडे दुर्लक्ष का करतात”?
28तुम्हाला माहीत नाही काय?
तुम्ही ते कधी ऐकले नाही काय?
याहवेहच सनातन परमेश्वर आहेत,
पृथ्वीच्या दिगंताचे उत्पन्नकर्ता तेच आहेत.
ते कधी थकणार वा कंटाळणार नाहीत,
त्यांची आकलन शक्ती अगम्य आहे.
29थकलेल्यास ते शक्ती देतात
आणि बलहीनाचे सामर्थ्य वाढवितात.
30तरुण थकतात व कंटाळतात,
तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात;
31पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.

सध्या निवडलेले:

यशायाह 40: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन