YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 41

41
इस्राएलचे सहायक
1“हे बेटांनो, तुम्ही माझ्यासमोर शांत राहा!
राष्ट्रांना त्यांच्या सामर्थ्याचे नूतनीकरण करू द्या!
त्यांना पुढे येऊन बोलू द्या;
न्यायनिवाड्यासाठी आपण एकत्र भेटू या.
2“पूर्वेकडून कोणी एकाला चिथविले,
नीतिमत्वात त्यांची सेवा करण्यासाठी त्याला बोलाविले#41:2 किंवा ज्याला प्रत्येक पावलावर विजय मिळतो?
राष्ट्रांना ते त्याच्या स्वाधीन करतात
आणि राजांना त्याच्या अधीन करतात.
ते त्याच्या तलवारीने त्यांची धूळधाण करतात,
त्याच्या धनुष्याने वार्‍याने उडणारा भुसा करतात.
3तो त्यांचा पाठलाग करतो व काहीही इजा न होता,
आणि आधी प्रवास न केलेल्या वाटेने सुरक्षित पुढे निघून जातो.
4पुरातन काळापासून पिढ्यांना
कोणी पाचारण केले व हे घडवून आणले?
मी, याहवेह—मी आदि आहे,
मी अंत आहे—तो मीच आहे.”
5बेटांनी हे बघितले व ते भयभीत झाले;
पृथ्वीचा दिगंतापासून थरकाप झाला.
त्यांनी प्रवेश केला व ते पुढे आले;
6ते एकमेकास साहाय्य करू लागले
व त्यांच्या सहकार्यास म्हणाले “धैर्यवान हो!”
7धातू कारागीर सोनाराला प्रोत्साहित करतो,
आणि हातोडीने धातू गुळगुळीत करणारा,
ऐरणीवर घण मारणार्‍यास उत्तेजन देतो.
धातू जोडणीबद्दल तो म्हणतो, “हे चांगले आहे.”
मग दुसरा, ती मूर्ती कलंडू नये म्हणून त्यास खिळे ठोकतो.
8“परंतु हे इस्राएल, माझे सेवक,
याकोब, माझे निवडलेले,
कारण तुम्ही माझा मित्र अब्राहामाचे वंशज आहात,
9पृथ्वीच्या दिगंतांपासून मी तुम्हाला निवडले आहे,
तिच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातून मी तुम्हाला बोलाविले आहे.
मी म्हटले, ‘तुम्ही माझे सेवक आहात’;
मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नाकारले नाही.
10भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे;
हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे.
मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन;
मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.
11“पाहा, जे तुमच्यावर चवताळले,
ते निश्चितच लज्जित व अपमानित होतील;
ज्यांनी तुम्हाला विरोध केला
ते नाहीसे होऊन नाश पावतील.
12तुम्ही तुमच्या शत्रूचा शोध कराल,
पण ते तुम्हाला सापडणार नाहीत.
जे तुमच्याविरुद्ध युद्ध करतात
त्यांचे अस्तित्वच राहणार नाही.
13कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे,
जो तुमचा उजवा हात धरतो
आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको;
मी तुला साहाय्य करेन.
14हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको,
हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस,
कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह,
तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात,
15“पाहा, मी तुम्हाला असे मळणी यंत्र करेन
ज्याचे दात नवीन व तीक्ष्ण असतील
आणि तुम्ही पर्वतांची मळणी करून त्याचा चुराडा कराल
आणि डोंगराचे भुसकट करून त्याची घट कराल.
16तुम्ही त्यांना पाखडाल व वारा त्यांना उडवून नेईल,
आणि वावटळ त्यांना विखरून टाकेल;
मग तुम्ही याहवेहमध्ये आनंद कराल
इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचा तुम्ही गौरव कराल.
17“गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात,
पण पाणी कुठेही नाही;
तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे.
पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन;
मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही.
18ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन
त्यांच्यासाठी दर्‍यात मी पाण्याचे झरे उफळवेन.
मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन,
आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील.
19मी वाळवंटात
देवदारू, बाभळी, मेंदी, जैतून लावेन.
गंधसरूची झाडे माळरानात लावेन,
चिनार व भद्रदारूची झाडे ही लावेन.
20जेणेकरून लोक हा चमत्कार पाहतील व जाणतील,
ते विचार करतील व त्यांना समजेल,
याहवेहच्या बाहूंनी हे सर्व केले आहे,
इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरानेच हे निर्माण केले आहे.
21“तुमचा वाद पुढे आणा,”
असे याहवेह म्हणतात.
“तुमचा विवाद पुढे चालवा”
असे याकोबाचा राजा म्हणतो.
22“हे मूर्तींनो, आम्हाला सांगा,
भावी काळात काय घडणार आहे.
आम्हाला सांगा, गतकाळात कोणत्या घटना घडल्या,
म्हणजे आम्ही त्याबद्दल विचार करू
आणि त्यांचा परिणाम आम्हाला कळेल.
किंवा पुढे होणाऱ्या घटना तरी सांगा,
23भविष्यात काय घडणार ते सांगा,
जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही देव आहात.
काही तरी करा, चांगले वा वाईट,
म्हणजे आम्ही भयभीत होऊ व घाबरून जाऊ.
24परंतु तुम्ही शून्यते पेक्षाही कमी आहात
आणि तुमची कामे पूर्णपणे व्यर्थ आहेत;
जो कोणी तुमची निवड करतो, तो धिक्कार-योग्य आहे.
25“मी उत्तरेकडून एकाला चिथविले आहे आणि तो येत आहे—
एक जो सूर्योदयाकडून येतो आणि माझ्या नावाचा धावा करतो.
तो राज्यकर्त्यांना तुडवेल, जणू ते बांधकामाचा चुना आहेत,
जणू तो माती तुडविणारा कुंभार आहे.
26हे घडेल असे प्रांरभापासून कोणी सांगितले होते, सांगा म्हणजे आम्हाला कळू शकेल,
किंवा आधीच सांगा, मग आम्ही म्हणू, ‘त्याचे म्हणणे न्यायी होते?’
कोणीही हे सांगितले नाही,
कोणीही हे भविष्य केले नाही,
कोणी तुमच्याकडून आलेला एकही शब्द ऐकला नाही.
27मीच सीयोनला सर्वप्रथम हे सांगितले, ‘हे पाहा, ते आले आहेत!’
मीच यरुशलेमकडे शुभ संदेश सांगणारा एक निरोप्या पाठविला.
28मी बघितले, पण तिथे कोणीही नव्हते—
तुमच्या दैवतांपैकी कोणीही सल्ला दिला नाही,
मी विचारले तेव्हा त्यांच्यातील कोणीही उत्तर दिले नाही.
29पाहा, ती सर्व खोटी आहेत!
त्यांची कामे व्यर्थ आहेत;
त्यांच्या मूर्ती केवळ वायू असून, त्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत.

सध्या निवडलेले:

यशायाह 41: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन