त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे,
किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत?
पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे,
किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे
आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?
याहवेहचा आत्मा कोण जाणू शकेल,
किंवा याहवेहना सल्ला देऊ शकेल असा कोण सल्लागार आहे?
ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला,
आणि त्यांना योग्य मार्ग कोणी शिकवला?
असा कोण होता ज्याने त्यांना ज्ञान शिकविले,
किंवा कोणी त्यांना समंजसपणाचा मार्ग दाखविला?