यशायाह 14
14
1याहवेह याकोबवर दया करतील;
पुन्हा एकदा ते इस्राएलची निवड करतील
आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीत स्थायी करतील.
परदेशी लोक त्यांच्यात सामील होतील
आणि याकोबाच्या वंशजांसोबत एकत्र येतील.
2अनेक राष्ट्रे त्यांना सहकार्य करतील
व त्यांना त्यांच्या जागी आणतील.
आणि इस्राएल राष्ट्रांवर ताबा मिळवतील,
व याहवेहच्या भूमीत त्यांच्या स्त्रिया व पुरुषांना आपले सेवक बनवतील,
त्यांना बंदिवासात नेलेल्यांना ते बंदी करतील
त्यांना पीडलेल्यांवर ते राज्य करतील.
3त्या दिवशी याहवेह तुम्हाला तुमच्या सर्व पीडा व अस्वस्थता व कठोर परिश्रमातून मुक्तता देतील. 4तेव्हा बाबेलच्या राजाला तुच्छतेने तुम्ही म्हणाल:
पाहा, तो जुलूमशहा कसा नाश पावला आहे!
त्यांचा उन्मत्तपणा कसा नष्ट झाला आहे!
5कारण याहवेहने दुष्टांची काठी,
व तुझा दुष्टाईचा राजदंड मोडला आहे,
6ज्या लोकांना तू क्रोधाने मारले,
सतत ठोसा मारत राहिलास,
बेफाम त्वेषाने व
पाषाणहृदयी आवेशाने देशांना अधीन केले.
7सर्व देश आता समाधानी आणि शांत आहेत;
ते गाणी गात आहेत.
8लबानोनची सनोवरची झाडे आणि गंधसरूसुद्धा
आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात,
“आता तुम्हाला खाली पाडले आहे,
तेव्हापासून आम्हाला तोडण्यासाठी कोणी आलेले नाही.”
9अधोलोक तुम्हाला भेटण्यासाठी
मृतांच्या रसातळात हालचाल होत आहे;
मेलेल्यांचे आत्मे जागृत होऊन तुम्हाला अभिवादन करण्यासाठी—
जगामध्ये जे सर्व पुढारी होते;
जे सर्व राष्ट्रांवरील राजे होते,
ते त्यांच्या सिंहासनावरून उठत आहेत.
10ते सर्व प्रतिसाद देतील,
ते तुम्हाला असे म्हणतील,
“जसे आम्ही आहोत, तसे तुम्ही सुद्धा दुर्बल झाला आहात;
तुम्ही आमच्यासारखे झाला आहात.”
11तुमच्या वीणांच्या आवाजासहीत,
तुमचा सर्व डामडौल खाली थडग्यात आणण्यात आला आहे,
कृमी तुमच्या खाली पसरलेल्या आहेत
आणि कीटक तुम्हाला झाकून टाकत आहेत.
12पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा!
तू स्वर्गातून कसा पडला आहेस,
तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले,
तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस!
13तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला,
“मी स्वर्गात चढून जाईन;
मी माझे सिंहासन
परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन;
मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन,
झाफोनच्या#14:13 किंवा कनानी लोकांचा पवित्र पर्वत सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन.
14मी ढगांच्या शिखरांवर जाईन;
मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखे करेन.”
15परंतु आता तू मृतांच्या अधोलोकात,
खोल खाईत लोटला गेला आहेस.
16जे तुझ्याकडे पाहतात ते टक लावून बघत आहेत,
ते तुझ्या नशिबाविषयी विचार करतात:
“हा तोच मनुष्य आहे काय, ज्याने पृथ्वीला हादरविले होते
आणि राज्यांना कंप सुटेल असे केले होते.
17ज्या मनुष्याने जगाला अरण्य केले
ज्याने शहरे उद्ध्वस्त केली
आणि तो त्याच्या बंदिवानांना घरी जाऊ देत नसे?”
18राष्ट्रांचे सर्व राजे चिरनिद्रीत अवस्थेत आहेत,
प्रत्येकजण स्वतःच्या कबरेत आहे.
19परंतु तुला तुझ्या कबरेतून
नको असलेल्या फांदीसारखे बाहेर टाकले आहे;
ज्यांना तलवारीने भोसकून टाकले,
जे दगडांच्या खड्ड्यात टाकण्यात येतात,
ज्याप्रकारे माणसांची प्रेते पायाखाली तुडविली जातात
तसे त्यांना तुमच्यावर झाकून टाकले आहे.
20तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही,
कारण तुम्ही तुमच्या देशाचा नाश केला आहे
आणि तुमच्या लोकांना ठार मारले आहे.
दुष्ट लोकांच्या संततीचा
पुन्हा कधीही उल्लेख केला जाऊ नये.
21भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये
आणि त्यांच्या शहरांनी पृथ्वी व्यापली जाऊ नये,
म्हणून त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी
त्याच्या मुलांना मारून टाकण्यासाठी जागा तयार करा.
22सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात,
“मी त्यांच्याविरुद्ध उठेन,
बाबेलचे नाव आणि तेथील जिवंत राहिलेले,
तिची संतती आणि तिच्या वंशजांना मी नामशेष करून टाकेन,”
असे याहवेह घोषित करतात.
23“मी तिला घुबडांचे निवासस्थान
आणि दलदलीचा प्रदेश करेन;
मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकेन,”
असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.
24सर्वसमर्थ याहवेहनी शपथ घेतली आहे,
“निश्चितच, मी जी योजना केली आहे, तसेच होईल,
आणि जो माझा संकल्प आहे, त्याप्रमाणे हे घडून येईल.
25माझ्या भूमीवर मी अश्शूरांना चिरडून टाकेन;
त्यांना माझ्या डोंगरावर तुडवेन.
त्याचे जू माझ्या लोकांवरून काढून टाकेन,
आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून उतरवेन.”
26अखिल पृथ्वीसाठी ही योजना केली आहे;
सर्व देशांवर हा हात फिरविला जाईल.
27सर्वसमर्थ याहवेहचा हा संकल्प आहे, तो कोण निष्फळ करू शकतो?
त्यांचा हात उठला आहे, त्याला कोण आवर घालू शकतो?
पलिष्टी लोकांविरुद्ध भविष्यवाणी
28आहाज राजा मरण पावला त्या वर्षी हा संदेश मला प्राप्त झाला:
29अहो पलिष्टी लोकांनो, ज्या दांडक्याने तुम्हाला मारले
तो मोडला आहे म्हणून आनंद करू नका.
तरी त्या सापापासून फुरसे निपजेल
त्याचे फळ तुमचा वेध घेणारे विषारी नाग असतील.
30गरिबांतील गरिबांना कुरण सापडेल,
आणि गरजवंत सुरक्षितेत झोप घेतील.
पण तुझे मूळ दुष्काळाने नष्ट होईल;
ते तुझ्या अवशिष्टांचा तलवारीने नाश करतील.
31वेशींनो, आक्रोश करा! नगरांनो विलाप करा!
पलिष्टी लोकांनो, भयाने वितळून जा!
कारण उत्तरेकडून धुराचा लोट येत आहे,
त्यांच्या पलटणींत कोणीही रेंगाळणारे नाहीत.
32आता राष्ट्रांच्या राजदूतांना
काय उत्तर देण्यात यावे?
“याहवेहने सीयोन स्थापिले आहे,
आणि त्यांच्या पीडितांना तिच्यात आश्रय मिळेल.”
सध्या निवडलेले:
यशायाह 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.