YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 13

13
बाबेलविरुद्ध केलेली भविष्यवाणी
1आमोजाचा पुत्र यशायाहने बाबेलच्या विरोधात पाहिलेला दृष्टान्त:
2उघड्या टेकडीच्या शिखरावर ध्वज उंच करा,
मान्यवर लोकांच्या फाटकांमधून प्रवेश करण्यासाठी
त्यांना ओरडून सांगा;
खुणा करून त्यांना बोलवा.
3ज्यांना मी युद्धासाठी सुसज्ज केले आहे, त्यांना मी आज्ञा दिली आहे.
जे माझ्या विजयाचा आनंद करीत आहेत—
मी माझा क्रोध अंमलात आणण्यासाठी त्या माझ्या योद्ध्यांना पाचारण केले आहे.
4ऐका, डोंगरावरील एक आवाज,
मोठ्या लोकसमुदायासारखा आवाज!
ऐका, राज्यांमध्ये चालू असलेला गोंधळ,
राष्ट्रे एकत्र जमत असल्यासारखा आवाज!
सर्वसमर्थ याहवेह,
युद्धासाठी सैन्य जमा करीत आहेत.
5ते फार दूर देशातून येतात,
आकाशाच्या शेवटच्या टोकापासून—
याहवेह आणि त्यांच्या क्रोधाची शस्त्रे
संपूर्ण देशाचा नाश करण्यासाठी येतात.
6आक्रोश करा, कारण याहवेहचा दिवस जवळ आला आहे;
तो दिवस सर्वसमर्थ यांच्याकडून नाशाप्रमाणे येईल.
7या कारणामुळे सर्वांचे हात शक्तिहीन होतील,
प्रत्येकाचे हृदय भीतीने वितळून जाईल.
8दहशत त्यांच्यावर झडप घालेल,
वेदना आणि मनस्ताप त्यांना घट्ट पकडतील;
प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेदनेने गडाबडा लोळतील.
भयग्रस्त होऊन ते एकमेकांकडे पाहतील,
त्यांचे चेहरे होरपळतील.
9पाहा, याहवेहचा दिवस येत आहे
—एक कठोर दिवस, क्रोधाचा आणि घोर संतापाचा—
भूमी उजाड करण्यासाठी
आणि तेथील पापी लोकांचा नाश करण्यासाठी.
10आकाशातील तारे आणि त्यांची नक्षत्रे
त्यांचा प्रकाश देणार नाहीत.
उगवता सूर्य अंधकारमय होईल
आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही.
11मी जगाला त्याच्या दुष्टाईबद्दल
दुष्टांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करेन.
मी गर्विष्ठांचा अहंकार नाहीसा करेन
आणि निर्दयी अभिमानींना मी लीन करेन.
12मी लोकांना शुद्ध सोन्यापेक्षा दुर्मिळ करेन,
ओफीरच्या सोन्यापेक्षाही अप्राप्य करेन.
13म्हणून सर्वसमर्थ याहवेह यांच्या क्रोधाने
आणि त्यांच्या क्रोधाग्नीच्या दिवशी
मी आकाशे थरथर कापतील असे करेन;
पृथ्वी तिच्या जागेवर हादरेल.
14शिकार केलेल्या छोट्या हरिणीप्रमाणे,
जसे मेंढपाळ नसलेले मेंढरू,
सर्व त्यांच्या त्यांच्या लोकांकडे परत जातील,
ते त्यांच्या मातृभूमीत पळून जातील.
15जो कोणी पकडला जाईल, त्याला आरपार खुपसले जाईल.
जे सर्व पकडले गेले, ते तलवारीने मारले जातील.
16त्यांची बालके त्यांच्या डोळ्यासमोर आपटून, त्यांचे तुकडे केले जातील;
त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांचा विनयभंग केला जाईल.
17पाहा, ज्यांना चांदीची पर्वा नाही,
आणि जे सोन्यामध्ये आनंद मानत नाहीत
त्या मेदिया लोकांना मी त्यांच्याविरुद्ध चिथावणी देईन.
18त्यांची धनुष्ये तरुणांना मारून टाकतील;
ते तान्ह्या बालकांवर दया करणार नाहीत,
किंवा ते लहान मुलांकडे दयेने पाहणार नाहीत.
19खास्द्यांच्या राज्यांचे बहुमूल्य रत्न,
बाबेलच्या लोकांचा अभिमान आणि गौरव,
सदोम आणि गमोराप्रमाणे
परमेश्वराकडून उद्ध्वस्त केल्या जाईल.
20तिच्यात कोणी कधीही वसती करणार नाही
किंवा पिढ्यान् पिढ्या रहिवास करणार नाही;
कोणीही अरब#13:20 भटके त्यांचे तंबू तिथे ठोकणार नाहीत,
तिथे कोणीही मेंढपाळ त्यांच्या कळपांना विश्रांती देणार नाहीत.
21परंतु अरण्यातील प्राणी तिथे राहतील,
तरसानी तिची घरे भरून जातील;
तिथे घुबडे राहतील,
आणि तिथे बोकडे उड्या मारतील.
22तरस प्राणी तिच्या गडांवर वस्ती करतील,
कोल्हे तिच्या आलिशान राजवाड्यांमध्ये वस्ती करतील.
तिची वेळ फार जवळ आली आहे,
आणि तिचे दिवस लांबणार नाहीत.

सध्या निवडलेले:

यशायाह 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन