हबक्कूक 3
3
हबक्कूकची प्रार्थना
1ही हबक्कूक संदेष्ट्याची प्रार्थना. शिगयोनोथच्या शैलीत.
2हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे;
मी तुमच्या कृत्यामुळे भयप्रद झालो आहे.
आमच्या दिवसातही त्या कार्याची पुनरावृत्ती करा,
आमच्या काळात त्या प्रसिद्ध होऊ द्या;
क्रोधित असतानाही कृपेची आठवण असू द्या.
3परमेश्वर तेमान वरून आले,
परमपवित्र पारान पर्वतावरून आले. सेला#3:3 सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे
त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे
व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे.
4त्यांचे तेज सूर्योदयेसारखे होते;
किरणे त्यांच्या हातांतून चकाकत बाहेर निघत होती,
जिथे त्यांचे सामर्थ्य लपलेले होते.
5महामारी त्यांच्या पुढे चालते;
घातकी रोग त्यांच्यामागे चालतात.
6ते थांबले व त्यांनी पृथ्वीस हालवून टाकले;
त्यांनी बघितले व देशास थरकाप आणला.
पुरातन पर्वतांचा चुराडा झाला
प्राचीन डोंगर ढासळले—
परंतु ते सर्वकाळ मार्गस्थ आहेत.
7कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले,
व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले.
8हे याहवेह, तुम्ही नद्यांवर संतापला होता काय?
झऱ्यांविरुद्ध तुमचा कोप होता काय?
जेव्हा जय मिळविण्यासाठी तुम्ही अश्वारूढ झालात
व तुमच्या रथात स्वार झालात,
तेव्हा तुम्ही समुद्राविरुद्ध क्रोधित झाला होता काय?
9तुम्ही तुमचे धनुष्य बाहेर काढले,
व अनेक बाण मागविले. सेला
नद्यांनी भूमी विभागली;
10पर्वतांनी हे पाहिले आणि ते कंपित झाले.
पाण्याचा प्रखर प्रवाह झपाट्याने आला;
खोल समुद्र गरजला
आणि त्याने आपल्या लाटा उंच उफाळल्या.
11तुमच्या झेप घेणाऱ्या बाणांच्या तेजाने
विजेप्रमाणे चकाकणार्या तुमच्या भाल्याच्या प्रकाशाने
सूर्य व चंद्र आकाशात स्तब्ध उभे राहिले.
12क्रोधित होऊन तुम्ही पृथ्वीवर चालत गेला
आणि संतापाने तुम्ही राष्ट्रांना पायदळी तुडविले.
13तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व
अभिषिक्तांना वाचविण्यासाठी बाहेर पडलात.
तुम्ही दुष्ट भूमीच्या पुढाऱ्यांचा चुराडा केला
आणि त्यांना डोक्यापासून पायांपर्यंत विवस्त्र केले. सेला
14आमची दाणादाण करण्यासाठी त्यांचे योद्धे धावून आले,
तेव्हा त्याने स्वतःच्याच भाल्याने आपले मस्तक छेदून घेतले,
लपलेल्या दुष्टास जणू तो गिळंकृत करेल
अशा हावरटपणाने तो आला.
15तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले,
की महाजलाशय घुसळले.
16मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली,
भीतीने माझे ओठ कापू लागले;
माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला,
आणि माझे पाय थरथरू लागले.
तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर
येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन.
17अंजिरांची झाडे ना बहरली
आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत,
जैतुनाचे सर्व पीक बुडाले
आणि शेते नापीक झाली,
जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत,
गोठ्यात गुरे नाहीत,
18तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन;
मला तारण देणार्या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.
19सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत;
मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास
ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील.
गायकवर्गाच्या संचालकास सूचना: हे कवन गाताना तंतुवाद्यांची साथ असावी.
सध्या निवडलेले:
हबक्कूक 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.