हबक्कूक 2
2
1मी पहारा देण्यासाठी उभा राहीन
आणि टेहळणीच्या बुरुजावर चढेन;
मी बघेन व ते मला काय उत्तर देतात हे पाहेन
आणि या तक्रारीला मी काय उत्तर द्यावे ते पाहेन.#2:1 किंवा माझा निषेध झाला असता मी काय उत्तर द्यावे
याहवेहचे उत्तर
2तेव्हा याहवेहने उत्तर दिले:
“हे प्रगटीकरण लिही
आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही
म्हणजे घोषणा करणारा#2:2 किंवा जो वाचत आहे धावतांनाही वाचू शकेल.
3कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते;
ते अंत समयाबद्धल बोलते
आणि ते खोटे ठरत नाही.
जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा;
ते#2:3 किंवा त्याची वाट पाहा निश्चितच येईल
आणि त्याला उशीर होणार नाही.
4“बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे;
त्याच्या इच्छा दुष्ट आहेत—
पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल.
5खरोखर, मद्य त्यांचा घात करते;
तो उन्मत्त आहे व त्याला कधीही चैन पडत नाही.
कारण तो कबरेसारखा लोभी आहे
आणि मृत्यूप्रमाणे तो कधीही समाधानी होत नाही,
तो अनेक राष्ट्रे गोळा करीत आहे,
आणि सर्व लोकांना बंदिवान करीत आहे.
6“ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय,
“ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो
आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो!
हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’
7तुमचे कर्जदाते अचानक तुमच्यापुढे येणार नाहीत काय?
ते उठून तुमचा थरकाप करणार नाहीत काय?
मग तुम्ही त्यांचे सावज बनाल.
8कारण तुम्ही पुष्कळ राष्ट्रांची लूट केली आहे,
मग जे राहिलेले लोक आहेत, ते तुमची लूट करतील.
तुम्ही मनुष्यांचे रक्त वाहिले आहे;
तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला.
9“धिक्कार असो त्याचा, जो अन्यायाच्या कमाईने त्याचे घर बांधतो,
विनाशापासून पळ काढावा म्हणून
जो उंच ठिकाणी आपले घरटे बांधतो!
10तुम्ही अनेक लोकांच्या नाशाचे कारस्थान करून,
व घराचे दार इतरांकरिता बंद करून, स्वतःचा जीव गमाविला.
11खुद्द तुमच्या घरातील भिंतीचे दगडच आक्रोश करतील,
आणि छताच्या तुळया तो प्रतिध्वनित करतील.
12“धिक्कार असो, जो रक्तपात करून शहरे बांधतो
आणि अन्यायाने नगर वसवितो!
13लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे,
आणि देशांनी केलेले सर्व श्रम व्यर्थच जावे
असे सर्वसमर्थ याहवेहनी निर्धारित केले नाही काय?
14कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे
तशीच पृथ्वी याहवेहच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून जाईल.
15“धिक्कार असो तुला, जो शेजाऱ्यास मद्य पाजतो,
ते मद्यधुंद होईपर्यंत थेट पखालीतून ओतून पाजतो,
म्हणजे तो त्यांची विवस्त्र शरीरे पाहू शकेल!
16तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल.
आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या#2:16 किंवा झोकांड्या घ्या!
याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे,
आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल.
17लबानोनमध्ये तुम्ही केलेला हिंसाचार तुम्हाला व्याकूळ करेल,
आणि तुम्ही केलेला प्राण्यांचा नाश तुम्हाला भयभीत करेल,
कारण तुम्ही मनुष्याचे रक्त वाहिले आहे;
तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला आहे.
18“मूर्तीकाराने निर्मित केलेल्या मूर्तीची काय किंमत आहे?
किंवा प्रतिमा, जी असत्य शिकविते?
स्वतःच्या हस्तकृतीवर भरवसा ठेवणारे;
तो मूर्ती घडवितो जी बोलू शकत नाही.
19धिक्कार असो, जो लाकडाला म्हणतो, ‘जिवंत हो!’
किंवा निर्जीव दगडाला म्हणतो, ‘जागा हो!’
ते मार्गदर्शन करू शकतात काय?
त्या सोन्याने व रुप्याने मढविलेल्या आहेत;
पण त्यांच्यात श्वास नाही.”
20परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत;
सर्व पृथ्वी त्यांच्या पुढे स्तब्ध राहो.
सध्या निवडलेले:
हबक्कूक 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.