YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हबक्कूक 1

1
1संदेष्टा हबक्कूकला प्राप्त झालेली ही भविष्यवाणी आहे:
हबक्कूकची तक्रार
2हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा?
पण तुम्ही ऐकत नाहीत?
मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!”
पण तुम्ही वाचवित नाहीत.
3तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता?
तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता?
विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे;
वाद व कलह वाढत आहेत.
4म्हणून कायदा नेभळा झाला आहे,
आणि योग्य न्याय कधीही दिला जात नाही,
दुष्टांनी नीतिमानांना वेढले आहे,
म्हणून कायदा विपरीत केला जातो.
याहवेहचे उत्तर
5“देशांकडे पाहा आणि लक्षपूर्वक बघ—
आणि अत्यंत आश्चर्यचकित हो.
कारण आता मी तुझ्या काळात जे कार्य करणार आहे
जरी ते तुला सांगितले तरी
त्यावर तुझा विश्वास बसणार नाही.
6मी बाबेलच्या#1:6 किंवा खास्दी लोकांना उभारणार आहे,
ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत,
जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत
ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.
7ते दहशत वाटेलसे व भीतिदायक लोक आहेत;
ते स्वतःचाच कायदा बनवितात
आणि स्वतःचाच मान राखतात.
8त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत,
संधिप्रकाशात फिरणार्‍या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत.
त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते;
त्यांचे स्वार दूर देशातून येतात.
भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;
9हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात,
वाळवंटातील वावटळीप्रमाणे त्यांची टोळी येते
आणि वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.
10ते राजांचा उपहास करतात
आणि अधिपतींची चेष्टा करतात.
त्यांच्या सर्व तटबंदीच्या नगरांचे हंसे करतात;
ते मातीचे ढिगारे उभे करून किल्ले काबीज करतात.
11वार्‍याप्रमाणे ते झपाट्याने येतात आणि पुढे निघून जातात—
ते अपराधी लोक, ज्यांचे सामर्थ्य त्यांच्या दैवतांपासून आहे.”
हबक्कूकची दुसरी तक्रार
12हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का?
माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही.
हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे;
आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे.
13तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही;
तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही.
मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता?
जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात,
तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता?
14तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे,
जसे काही समुद्री जीव, ज्यांचा कोणी शासक नसतो.
15दुष्ट शत्रू गळ टाकतो व त्यांना वर ओढतो,
तो त्यांना जाळ्यात पकडतो,
मग तो त्यांना त्याच्या अडणीजाळ्यात जमा करतो,
आणि तो आनंदित व उल्हासित होतो.
16म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो
व अडणीजाळ्यापुढे धूप जाळतो,
कारण त्याच्या जाळ्यामुळेच तो धनवान होतो
आणि आपल्या मनपसंद भोजनाचा आस्वाद घेतो.
17तो सर्वकाळ असेच जाळे रिकामे करीत राहणार आहे काय,
निर्दयीपणे देशांना नष्ट करीत राहणार आहे काय?

सध्या निवडलेले:

हबक्कूक 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन