YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 24

24
यरुशलेम एका कढईप्रमाणे
1नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“हे मानवपुत्रा, ही तारीख, हा दिवस नोंदून ठेव, कारण आजच्याच दिवशी बाबेलच्या राजाने यरुशलेमला वेढा घातला. 3या बंडखोर लोकांना एक दाखला सांग आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘एक कढई घे; आणि विस्तवावर ठेव
आणि त्यात पाणी ओत.
4त्यात मांसाचे तुकडे टाक,
सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा.
यांच्या उत्तम हाडांनी कढई भर;
5कळपातील उत्तम मेंढरू निवडून घे.
हाडांसाठी कढईच्या खाली लाकडे ठेव;
आणि ते उकळून
त्यात हाडे शिजव.
6“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो,
ज्या कढईला गंज लागला आहे,
ज्याचा थर जाणार नाही!
जसे काढता येईल
तसा एकएक मांसाचा तुकडा काढून घ्या.
7“ ‘कारण तिने सांडलेले रक्त तिच्यामध्येच आहे:
ते तिने उघड्या खडकावर ओतले;
तिने ते मातीने झाकले जाईल असे,
जमिनीवर ओतले नाही.
8कोप भडकवावा व सूड घ्यावा म्हणून
मी तिचे रक्त उघड्या खडकावर ओतेन,
म्हणजे ते झाकले जाणार नाही.
9“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो!
मी देखील लाकडाचा ढीग उंच करेन.
10तर लाकडाचा ढीग करा
आणि अग्नी पेटवा.
मसाले मिसळून;
मास चांगले शिजवून घ्या,
हाडे पूर्णपणे जळू द्या.
11मग रिकामी कढई निखार्‍यावर ठेवा
ती गरम होऊन तिचे तांबे चमकू द्या,
म्हणजे तिची अशुद्धता वितळून जाईल
आणि त्याचा थर पूर्णपणे जळून जाईल.
12परंतु सर्व प्रयत्न वाया गेले;
तिच्यावर बसलेला दाट थर निघाला नाही,
तो अग्नीने देखील निघाला नाही.
13“ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस.
14“ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
यहेज्केलच्या पत्नीचा मृत्यू
15याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 16“हे मानवपुत्रा, एका झटक्यात तुझ्या डोळ्याचा आनंद मी तुझ्यापासून काढून घेणार आहे. परंतु तू शोक करू नकोस किंवा रडू नकोस वा अश्रू गाळू नकोस. 17शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.”
18म्हणून सकाळी मी लोकांशी बोललो आणि संध्याकाळी माझी पत्नी मरण पावली. दुसर्‍या सकाळी मला आज्ञापिल्याप्रमाणे मी केले.
19तेव्हा लोकांनी मला विचारले, “या सर्व गोष्टींचे आमच्याशी काय देणे घेणे आहे? तू असे का वागत आहेस?”
20तेव्हा मी त्यांना म्हटले, “याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 21इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझे पवित्रस्थान; तो बलवान गड ज्याविषयी तुम्ही अभिमान बाळगता, तुमच्या डोळ्यांचा आनंद, ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, तो मी अपवित्र करणार आहे. तुमची मुले व मुली जे तुम्ही मागे सोडले ते तलवारीने पडतील. 22आणि जसे मी केले तसेच तुम्हीही कराल. तुम्ही आपली मिशी आणि दाढी झाकणार नाही किंवा प्रथेनुसार शोक करणार्‍यांसाठी आणलेले अन्न तुम्ही खाणार नाही. 23तुम्ही आपले पागोटे आपल्या डोक्यावर आणि तुमची पायतणे तुमच्या पायात असू द्यावीत. तुम्ही शोक करू नये किंवा रडू नये, तर तुमच्या पापांमुळे तुम्ही झुराल व आपसातच कण्हाल. 24यहेज्केल तुमच्यासाठी एक चिन्ह असा आहे; जसे त्याने केले तसेच तुम्हीही करा. हे जेव्हा घडेल, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.’
25“आणि तू, हे मानवपुत्रा, ज्या दिवशी मी त्यांचे बलवान दुर्ग, त्यांचा हर्ष आणि गौरव, त्यांच्या डोळ्यांचा आनंद, त्याच्या हृदयाची इच्छा आणि त्यांची मुले व मुली सुद्धा काढून घेईन; 26त्या दिवशी एक फरार झालेला तुम्हाला वर्तमान सांगण्यास येईल. 27त्यावेळी तुझे तोंड उघडेल; तू त्याच्याशी बोलशील, आणखी शांत बसणार नाही. याप्रकारे तू त्यांच्यासाठी एक चिन्ह असा असशील, आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 24: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन