YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 23

23
दोन व्यभिचारी बहिणी
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, दोन स्त्रिया होत्या, ज्या एकाच आईच्या मुली होत्या. 3त्या इजिप्तमध्ये वेश्या होऊन, त्यांच्या तारुण्यापासून वेश्यावृत्ती करीत होत्या. त्या देशात त्यांची स्तने हाताळली गेली आणि त्यांच्या कुमारावस्थेतील छाती कुरवाळली गेली. 4थोरलीचे नाव ओहोलाह होते आणि ओहोलीबाह तिची लहान बहीण होती. त्या माझ्या होत्या आणि त्यांनी मुलांना व मुलींना जन्म दिला. ओहोलाह ही शोमरोन आहे आणि ओहोलीबाह यरुशलेम आहे.
5“ओहोलाह माझी असतानाच वेश्यावृत्ती करू लागली; आणि तिचे प्रियकर; म्हणजेच अश्शूरी योद्ध्यांची अभिलाषा करू लागली 6ते निळी वस्त्रे घातलेले, राज्यपाल व सेनापती होते, ते सर्व सुंदर तरुण पुरुष घोडेस्वार होते. 7तिने स्वतःला या उच्चभ्रू अश्शूरी लोकांच्या स्वाधीन करून ज्या सर्वांच्या मूर्तींची आस धरली होती त्यामुळे स्वतःला विटाळवून टाकले. 8इजिप्तमध्ये सुरू केलेली वेश्यावृत्ती तिने सोडली नाही, जिथे पुरुष तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर झोपले तिच्या कुमारावस्थेतील छाती त्यांनी कुरवाळली आणि त्यांच्या वासना तिच्यावर ओतल्या.
9“म्हणून मी तिला तिचे अश्शूरी प्रियकर, ज्यांची अभिलाषा तिने बाळगली त्यांच्या हाती दिले. 10त्यांनी तिला नग्न केले, तिची मुले व मुली घेऊन तिला तलवारीने मारून टाकले. स्त्रियांमध्ये ती म्हणीप्रमाणे झाली आणि तिला दंड देण्यात आला.
11“तिची बहीण ओहोलीबाहने हे पाहिले, तरीही तिच्या वासना व वेश्यावृत्तीत ती तिच्या बहिणीपेक्षा अधिक व ती दुर्गुणी होती. 12ती अश्शूरी लोकांच्या मागे वासनेने आसक्त झाली—राज्यपाल आणि सेनापती, गणवेष घातलेले योद्धे, घोडेस्वार आणि सर्व देखणे पुरुष होते. 13मी पाहिले की तिने सुद्धा स्वतःला अपवित्र केले; त्या दोघीही एकाच मार्गाने गेल्या.
14“परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती, 15त्यांच्या कंबरेला पट्टे होते व त्यांच्या डोक्यावर सुंदर फेटे होते; ते सर्व बाबेलच्या रथ अधिकार्‍यांसारखे, खास्द्यांचे#23:15 किंवा बाबिलोनचे रहिवासी असे दिसत होते. 16ती चित्रे पाहताच त्यांची वासना तिला झाली आणि खास्द्यांच्या देशात त्यांच्याकडे दूत पाठवले. 17मग बाबेलचे लोक तिच्याकडे प्रेमाच्या पलंगावर आले, आणि त्यांच्या वासनांनी तिला भ्रष्ट केले, तेव्हा तिने तिचे मन त्यांच्यापासून घृणेने वळविले. 18जेव्हा उघडपणे तिने तिची वेश्यावृत्ती केली आणि तिचे नग्न शरीर उघडे केले, तेव्हा जसे मी तिच्या बहिणीपासून झालो तसाच तिरस्काराने मी तिच्यापासून दूर झालो. 19तरीही तारुण्याच्या दिवसांत इजिप्तमध्ये वेश्या होती त्या दिवसांची आठवण करीत ती अजूनच स्वैराचाराने वागू लागली. 20तिथे ती वेश्या तिच्या प्रियकरांची वासना करू लागली, ज्यांचे जननेंद्रिय गाढवांप्रमाणे व त्यांचा स्त्राव घोड्यांसारखा होता. 21याप्रकारे जेव्हा इजिप्तमध्ये तुझ्या छातीला कुरवाळले गेले व तुझे तरुण स्तन हाताळले गेले, त्या तुझ्या तारुण्यातील अश्लीलतेची अभिलाषा तू धरलीस.
22“म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन; 23बाबेल व खास्द्यांचे लोक, पकोड, शोआ व कोआतील पुरुष आणि त्यांच्यासह सर्व अश्शूरी, सुंदर तरुण पुरुष, त्यांचे राज्यपाल आणि सरदार, रथ अधिकारी, उच्च पदाधिकारी व घोडेस्वार. 24हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील. 25मी आपला ईर्षायुक्त क्रोध तुझ्यावर आणेन आणि संतापाने ते तुझ्याशी वागतील. ते तुझे नाक व कान कापतील आणि तुझ्यातील मागे राहिलेले ते तलवारीने पडतील आणि त्यातूनही जे वाचतील ते अग्नीने भस्म होतील. 26ते तुझी वस्त्रे काढून घेतील व तुझे दागिने हिसकावून घेतील. 27म्हणजे जी अश्लीलता व वेश्यावृत्ती तू इजिप्तमध्ये चालू केली तिचा शेवट मी करेन. या गोष्टींकडे तू पुन्हा पाहणार नाहीस आणि यापुढे इजिप्तचे स्मरण आणखी करणार नाहीस.
28“कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यांचा तू द्वेष करतेस, तिरस्काराने ज्यांच्यापासून तू दूर झालीस त्यांच्या हाती मी तुला देत आहे. 29ते तुझ्याशी द्वेषाने वागतील आणि ज्यासाठी तू काम केले त्या सर्व गोष्टी ते तुझ्यापासून हिसकावून घेतील. ते तुला अगदी नग्न करतील आणि तुझ्या वेश्यावृत्तीची लाज उघडी पडेल. 30तुझी अश्लीलता व दुराचारांनी हे सर्व तू तुझ्यावर ओढवून घेतले आहे, कारण तू राष्ट्रांची अभिलाषा धरलीस आणि त्यांच्या मूर्तींनी स्वतःला विटाळून टाकले. 31तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन.
32“सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“तू तुझ्या बहिणीचा पेला पिशील,
जो पेला मोठा व खोल आहे;
तो तुझ्यावर हास्य व थट्टा आणेल,
कारण त्यात पुष्कळ मावते.
33नशा व दुःख यांनी तू भरशील
हा पेला नाश व विध्वंसाचा आहे,
तो पेला तुझी बहीण शोमरोन हिचा आहे.
34तू तो पेला पिऊन कोरडा करशील
आणि त्याचे तुकडे चावशील;
आणि तू आपली छाती फाडशील.
हे मी बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
35“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू मला विसरलीस व माझ्याकडे पाठ फिरवलीस, म्हणून त्याचा परिणाम तू भोगलाच पाहिजे, तू तुझ्या अश्लीलतेचे व वेश्यावृत्तीचे प्रतिफळ भोगलेच पाहिजे.”
36याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ओहोलाह व ओहोलीबाहचा न्याय तू करशील काय? मग त्यांच्या अमंगळ कृत्यांबद्दल त्यांचा निषेध कर. 37कारण त्यांनी व्यभिचार केला आहे आणि रक्त त्यांच्या हातावर आहे. त्यांनी त्यांच्या मूर्तींशी व्यभिचार केला; त्या मूर्तींना अन्न म्हणून ज्या लेकरांना त्यांनी माझ्यापासून जन्म दिला त्यांचा यज्ञ त्यांनी मूर्तींना केला. 38त्यांनी मलाही असेच केले: त्याचवेळी त्यांनी माझे पवित्रस्थान अपवित्र आणि माझे शब्बाथ भ्रष्ट केले. 39त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लेकरांचे यज्ञ त्यांच्या मूर्तींना केले, ते माझ्या पवित्रस्थानात आले आणि ते अपवित्र केले. माझ्या घरात त्यांनी ही कृत्ये केली.
40“जी माणसे दुरून आली होती त्यांना देखील त्यांनी बोलाविणे पाठवले आणि जेव्हा ते आले त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यात काजळ घातले आणि आपले दागिने चढविले. 41तू एका सुंदर पलंगावर बसलीस, ज्यापुढे एक मेज ठेवलास त्यावर जे माझे होते ते धूप व जैतुनाचे तेल ठेवले.
42“चैनबाजी करणाऱ्या लोकांच्या गर्दीचा आवाज तिच्या आजूबाजूला होता; गोंधळी लोकांबरोबर दारूबाज लोक आणले गेले होते आणि त्यांनी स्त्रिया व त्यांच्या बहिणीच्या हातात बांगड्या आणि त्यांच्या डोक्यावर सुंदर मुकुट घातले. 43तेव्हा जी स्त्री व्यभिचार करून निकामी झाली होती तिच्याविषयी म्हटले, ‘वेश्या म्हणून त्यांनी तिचा उपयोग करावा, कारण ती वेश्याच तर आहे.’ 44आणि ते तिच्याबरोबर झोपले. पुरुष जसे वेश्यांबरोबर झोपतात तसेच ते त्या अश्लील स्त्रिया, ओहोलाह व ओहोलीबाह यांच्याबरोबर झोपले. 45परंतु ज्या व्यभिचार करतात आणि रक्त सांडतात, त्या स्त्रियांना नीतिमान न्यायाधीश दंड देतील, कारण त्या व्यभिचारी आहेत आणि त्यांचे हात रक्ताने भरले आहेत.
46“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्यांच्याविरुद्ध मोठा जमाव आणा आणि त्यांना आतंक व लुटेच्या स्वाधीन करा. 47लोकांचा जमाव त्यांना धोंडमार करतील आणि त्यांना तलवारीने कापतील; ते त्यांच्या मुलांना व मुलींना जिवे मारतील आणि त्यांची घरे जाळून टाकतील.
48“देशातील अश्लीलतेचा मी शेवट करेन, म्हणजे सर्व स्त्रिया सावध राहतील आणि तुमच्याप्रमाणे त्या करणार नाही. 49तुमच्या अश्लीलतेचा दंड तुम्ही भोगाल आणि तुमच्या मूर्तिपूजेच्या पापाचे परिणाम तुम्ही भोगाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन