YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 22

22
यरुशलेमच्या पापांचा न्याय
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
2“मानवपुत्रा, तू तिचा न्याय करशील काय? या रक्तपाती शहराचा न्याय तू करशील काय? तर तिच्या सर्व अमंगळ कृत्यांविषयी तिचा निषेध कर 3आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे नगरी, तू रक्तपात करून व मूर्ती बनवून स्वतःला अशुद्ध करून आपला नाश ओढवून घेतला आहेस, 4जो रक्तपात तू केलास त्यामुळे तू दोषी झालीस आणि ज्या मूर्ती तू बनविल्यास त्यामुळे तू विटाळली आहेस. तुझे दिवस जवळ आणले आहेस आणि तुझ्या वर्षांचा शेवट आला आहे. म्हणून मी तुला राष्ट्राकरिता निंदा व देशांसाठी हास्य असे करेन. 5हे अपकीर्तिच्या, उपद्रवाने भरलेल्या नगरी, जे तुझ्याजवळ आहेत व जे दूर आहेत, ते सर्व तुझी थट्टा करतील.
6“ ‘पाहा, इस्राएलचे प्रत्येक राजपुत्र त्यांच्या अधिकाराचा उपयोग कसा रक्तपातासाठी करीत आहेत. 7तुझ्यातील आईवडिलांना त्यांनी तुच्छ मानले; त्यांनी तुझ्यातील विदेशीयांवर अत्याचार केला आणि अनाथ व विधवांना अयोग्य वागणूक दिली. 8तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंचा अवमान केला आणि माझे शब्बाथ अपवित्र केले आहेत. 9तुझ्यात निंदक राहतात, ज्यांचा कल रक्तपाताकडे आहे; तुझ्यात असे लोक आहेत जे डोंगरावरील पूजास्थानात प्रसाद खातात आणि अश्लील कृत्ये करतात. 10तुझ्यात असे लोक आहेत ज्यांनी आपल्या पित्याचा पलंग विटाळला आहे; जे मासिक पाळीच्या वेळी जेव्हा स्त्रिया विधीनुसार अशुद्ध असतात, तेव्हा त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतात. 11तुझ्यातील एक पुरुष त्याच्या शेजार्‍याच्या पत्नीशी निंद्यकर्म करतो, तर दुसरा त्याच्या सुनेला भ्रष्ट करतो आणि अजून दुसरा त्याच्या बहिणीला, त्याच्याच पित्याच्या मुलीला भ्रष्ट करतो. 12तुझ्यात लोक आहेत, जे रक्तपात करण्यास लाच घेतात; तू व्याज घेते आणि गरिबांकडून नफा करून घेतेस. तू आपल्या शेजार्‍याकडून जबरीने वसूल करून लाभ घेतेस. आणि तुला माझा विसर पडला आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
13“ ‘अन्यायाने तू जो लाभ करून घेतला आहे, आणि तुमच्यात जो रक्तपात तू केला आहे, त्यामुळे संतापाने मी माझे हात एकत्र चालवेन. 14मी तुझा झाडा घेईन त्या दिवशी तुझे धाडस टिकेल काय किंवा तुझे हात दृढ राहतील काय? मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच. 15राष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग आणि देशांमध्ये तुम्हाला विखरून टाकीन; आणि तुमच्या अशुद्धतेचा शेवट मी करेन. 16राष्ट्रांच्या नजरेत तू जेव्हा विटाळलेली#22:16 किंवा जेव्हा मी तुला तुझे वतन दिले असणार तेव्हा. ठरशील, तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ”
17तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 18“मानवपुत्रा, इस्राएली लोक माझ्यासाठी गाळ असे झाले आहेत; ते सर्व भट्टीत राहिलेले कास्य, कथील, लोखंड व शिसे यासारखे आहेत. ते केवळ चांदीचा गाळ आहेत. 19म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही सर्वजण गाळ असे झाला आहात, म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये एकत्र करेन. 20जसे चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील वितळण्यासाठी धगधगत्या आगीच्या भट्टीत टाकली जातात, तसेच मी तुम्हाला माझ्या रागाने व क्रोधाने एकत्र करेन आणि तुम्हाला शहरात ठेवून वितळवीन. 21मी तुम्हाला एकत्र करेन व तुमच्यावर माझा क्रोधाग्नी फुंकेन, आणि तुम्ही त्या शहरात वितळून जाल. 22जशी चांदी भट्टीत वितळली जाते, असेच तुम्ही त्या शहरात वितळून जाल आणि तुम्ही जाणाल की मी याहवेहने माझा कोप तुमच्यावर ओतला आहे.’ ”
23याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले: 24“मानवपुत्रा, या देशाला सांग, ‘तुम्ही असा एक देश आहात जो कोपाच्या दिवशी ना शुद्ध केला गेला ना ज्यावर पाऊस पडला.’ 25तिच्यातील राजपुत्रांचा#22:25 मूळ भाषेत संदेष्टे एक कट आहे, ते गर्जना करीत भक्ष फाडणार्‍या सिंहाप्रमाणे आहेत; ते लोकांना ग्रस्त करतात, ते खजिना व मोलवान वस्तू घेतात आणि त्यांच्यात पुष्कळांना विधवा बनवतात. 26तिचे याजक माझ्या नियमाचे उल्लंघन करतात व माझ्या पवित्र वस्तूंना अपवित्र करतात; पवित्र व सर्वसामान्य यात ते फरक ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध यात काही भेद नाही अशी शिकवण ते देतात आणि त्यांच्यात मी अपवित्र मानला जाईल म्हणून माझ्या शब्बाथांकडे दुर्लक्ष करतात. 27तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात. 28त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ 29या देशातील लोक फसवणूक व लुटारूपण करतात; ते गरीब व गरजवंतावर अत्याचार करतात आणि विदेशी लोकांना न्याय न देता अन्यायाने वागवितात.
30“या देशाचा मी नाश करू नये म्हणून तिच्यातील कोणी एक भिंत बांधेल आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभा राहील अशा व्यक्तीला मी त्यांच्यात शोधले, परंतु मला कोणी सापडला नाही. 31म्हणून मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि माझ्या कोपाग्नीने त्यांना भस्म करेन त्यांनी जे काही केले ते मी त्यांच्याच माथ्यावर आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 22: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन