YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 21

21
बाबेल: परमेश्वराच्या न्यायाची तलवार
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, यरुशलेमविरुद्ध आपले तोंड कर आणि पवित्रस्थानाविरुद्ध संदेश दे. इस्राएल देशाविरुद्ध भविष्यवाणी कर. 3आणि इस्राएलाच्या भूमीला सांग: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध आहे. माझ्या म्यानातून मी माझी तलवार उपसून नीतिमान आणि दुष्ट अशा दोघांनाही तुझ्यातून छेदून टाकेन. 4कारण मी नीतिमानास व दुष्टास छेदून टाकणार आहे, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येकाविरुद्ध माझी तलवार म्यानातून उपसली जाईल. 5तेव्हा सर्व लोक जाणतील मी याहवेहने आपल्या म्यानातून तलवार उपसली आहे; ती परत त्यात जाणार नाही.’
6“म्हणून मानवपुत्रा, आक्रोश कर! भग्न हृदयाने व कष्टाने त्यांच्यासमोर उसासे टाक. 7आणि जेव्हा ते तुला विचारतील, ‘तू उसासे का टाकतोस?’ तू सांग की, ‘जी वार्ता येणार आहे म्हणून प्रत्येक हृदय भीतीने विरघळेल आणि प्रत्येक हात लुळा पडेल; प्रत्येक आत्मा अशक्त होईल आणि प्रत्येक पाय मुत्राने भिजेल.’ ते येत आहे! ते नक्कीच घडणार, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
8याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 9“मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘प्रभू असे म्हणतात:
“ ‘एक तलवार, एक तलवार,
धार लावलेली आणि चमकविलेली;
10कत्तल करण्यास धार लावलेली,
विजेप्रमाणे चमकणारी अशी केलेली!
“ ‘माझ्या राजपुत्राच्या राजदंडामुळे आम्ही आनंद करावा काय? तलवार अशा प्रत्येक काठीला तुच्छ लेखते.
11“ ‘हातात धरता यावी म्हणून,
तलवार चमकण्यास नेमली आहे;
ती धारदार व चमकविली गेली आहे,
आणि कत्तल करणार्‍याच्या हातासाठी ती तयार केली गेली आहे.
12हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर,
कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे;
ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे.
माझ्या लोकांसहित
त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे.
म्हणून तू आपले ऊर बडव.
13“ ‘कसोटी खचितच होणार आणि तलवारीने तुच्छ लेखलेला राजदंड पुढे चालला नाही तर काय होईल? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’
14“तर हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर
आणि तुझ्या हात हातावर मार.
तलवार दोन वेळा वार करो,
किंवा तीन वेळाही चालेल.
ही तलवार कत्तल करण्यासाठी;
तलवार जी मोठ्या वधासाठी आहे,
जिने त्यांना चहूकडून घेरले आहे.
15म्हणजे त्यांची हृदये भीतीने पाणी पाणी होतील
आणि पुष्कळ पडतील,
कत्तल करण्यासाठीच ही तलवार
त्यांच्या सर्व फाटकांवर मी नेमली आहे.
पाहा! विजेसारखा वार करण्यास ती बनविली गेली आहे,
हत्येसाठी ती उपसली गेली आहे.
16अगे तलवारी, उजवीकडे वार कर,
मग डावीकडे वार कर,
जिथे तुझे पाते फिरेल तिथे वार कर.
17मी सुद्धा माझा हात हातावर मारीन,
आणि माझा क्रोध शांत होईल.
मी याहवेह हे बोललो आहे.”
18याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 19“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाच्या तलवारीसाठी दोन रस्ते आखून घे, दोन्ही एकाच देशातून निघतील. शहराकडे जाताना जिथे दुहेरी वाटा निघतात तिथे चिन्हस्तंभ लाव. 20अम्मोन्यांच्या राब्बाहविरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी एक वाट आणि यहूदाह व तटबंदीच्या यरुशलेमच्या विरुद्ध येणार्‍या तलवारीसाठी दुसरी वाट आखून ठेव. 21कारण बाबेलचा राजा शकुन पाहण्यासाठी दुहेरी वाटेच्या मधोमध, त्या दोन वाटांच्या चौकात थांबेल: तो बाणांनी चिठ्ठ्या टाकेल, तो मूर्तींचा सल्ला घेईल आणि काळजाची परीक्षा करून शकुन पाहील. 22त्याच्या उजव्या हातात यरुशलेमची चिठ्ठी निघेल, जिथे तो युद्धाची यंत्रे लावेल, यासाठी की वध करण्याची आज्ञा द्यावी, युद्धाची घोषणा करावी, द्वारांना युद्धाची यंत्रे लावावी, मोर्चे बांधावे व तट उभारावे. 23ज्यांनी त्याच्याशी निष्ठेने शपथ वाहिली त्यांना तो शकुन खोटा वाटेल, परंतु तो त्यांना त्यांच्या दोषाची आठवण करून देईल व त्यांना कैद करून नेईल.
24“यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही लोकांनी उघड बंड करून आणि तुम्ही जे काही करता त्याद्वारे तुमचे अपराध उघड करून, तुमच्या मनात दोष आणला आहे; आणि तुम्ही असे केले आहे म्हणून तुम्ही बंदिवासात नेले जाल.
25“ ‘हे इस्राएलाच्या अपवित्र व दुष्ट राजपुत्रा, ज्याचा दिवस आला आहे, ज्याला दंड द्यायचा शेवटचा समय आला आहे, 26त्या तुला सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझा टोप उतरव, मुकुट काढून टाक. तो जसा होता तसा आता नसेल: जे नम्र ते उंच केले जातील व जे उंच ते नम्र केले जातील. 27नाश! नाश! मी याचा नाश करेन! ज्याच्याकडे त्या मुकुटाचा खरा अधिकार आहे तो येईपर्यंत हा मुकुट पुनर्स्थापित होणार नाही; त्यालाच मी तो देईन.’
28“आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘एक तलवार, एक तलवार,
कत्तल करण्यास उपसलेली,
नाश करण्यास व विजेप्रमाणे;
ती चमकविलेली व चमकणारी आहे!
29जरी तुमच्याविषयीचे खोटे दृष्टान्त
व तुमच्याबद्दलचे लबाड शकुन केले,
तरीही ज्या दुष्टांचा नाश झाला पाहिजे
म्हणून त्यांच्या मानेवर तलवार ठेवली जाईल,
त्यांचा दिवस आला आहे,
त्यांना दंड द्यायचा शेवटचा समय येऊन ठेपला आहे.
30“ ‘तलवार परत तिच्या म्यानात जाऊ द्या.
ज्या ठिकाणी तू निर्माण केली गेली,
तुझ्या पूर्वजांच्या भूमीत,
मी तुझा न्याय करेन.
31मी माझा क्रोध तुझ्यावर ओतेन
आणि माझ्या कोपाचा अग्नी तुझ्यावर फुंकेन;
क्रूर लोक जे नाश करण्यात निपुण आहेत,
त्यांच्या हाती मी तुला सोपवेन.
32तू अग्नीला इंधन अशी होशील,
तुझे रक्त तुझ्याच देशात सांडेल,
तुझी आठवण आणखी केली जाणार नाही;
कारण मी याहवेह हे बोललो आहे.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 21: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन