YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 25

25
अम्मोनविरुद्ध भविष्यवाणी
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“हे मानवपुत्रा, अम्मोन्यांकडे आपले तोंड कर आणि त्यांच्याविषयी भविष्यवाणी कर. 3अम्मोन्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जेव्हा माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, आणि इस्राएल देश ओसाड झाला व जेव्हा यहूदीयाचे लोक बंदिवासात गेले, तेव्हा तुम्ही “आहा!” असे म्हटले, 4म्हणून तुमच्या पूर्वेस असलेल्या लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून तुम्हाला मी त्यांच्या स्वाधीन करेन. ते त्यांच्या छावण्या तुमच्यात उभारतील व त्यांचे तंबू तुमच्यात बांधतील; ते तुमची फळे खातील व तुमचे दूध पितील. 5मी राब्बाह नगराला उंटांचा तबेला व अम्मोनला मेंढरांचे विश्रामस्थान असे करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. 6कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण तुम्ही टाळ्या वाजविल्या व उड्या मारल्या आणि इस्राएल देशाप्रती आपल्या हृदयात द्वेष ठेऊन आनंद केला, 7आता मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन व तुला राष्ट्रांना लूट म्हणून देईन. राष्ट्रांतून मी तुला पुसून टाकेन आणि देशातून तुला नाहीसे करेन. मी तुझा नाश करेन आणि तू जाणशील की मीच याहवेह आहे.’ ”
मोआबविरुद्ध भविष्यवाणी
8“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘मोआब आणि सेईर म्हणाले, “पाहा, यहूदाह तर इतर राष्ट्रांसारखाच झाला आहे,” 9म्हणून मी मोआबाची हद्द, त्याच्या सीमेवरील नगरे—बेथ-यशिमोथ, बआल-मेओन व त्या देशाचे वैभव किर्याथाईम उघडे करेन. 10अम्मोनी लोकांबरोबर मोआबला सुद्धा मी पूर्वेकडील लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून स्वाधीन करेन, म्हणजे राष्ट्रांमध्ये अम्मोनी लोकांचे स्मरण केले जाणार नाही; 11आणि मोआबाला मी शिक्षा करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”
एदोमाविरुद्ध भविष्यवाणी
12“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘एदोमने यहूदाहचा सूड घेतला आणि त्यामुळे तो अतिशय दोषी ठरला, 13म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एदोमविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि मनुष्य व पशूंना मी मारून टाकीन. मी त्याला ओसाड करेन आणि तेमान पासून ददानपर्यंत ते तलवारीने पडतील. 14माझ्या इस्राएली लोकांच्या हातूनच मी एदोमवर माझा सूड घेईन, आणि माझा राग व क्रोधानुसार ते त्यांच्याशी वागतील; ते माझा सूड अनुभवतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
पलिष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी
15“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘पलिष्टी लोक प्रतिकाराने वागले व निरंतरच्या वैरभावाने यहूदाहचा नाश करण्यासाठी आपल्या हृदयात द्वेषबुद्धी ठेऊन त्यांचा सूड घेतला आहे. 16म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पलिष्ट्यांविरुद्ध मी माझा हात उगाणार आहे आणि करेथी लोकांना नाहीसे करेन आणि समुद्रकिनार्‍यावर उरलेल्यांना नष्ट करेन. 17मी त्यांच्यावर माझा सूड उगवेन आणि माझ्या क्रोधाने त्यांचा नाश करेन. जेव्हा मी त्यांचा सूड घेईन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन