YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 26

26
सोरविरुद्ध भविष्यवाणी
1बाराव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, यरुशलेमविषयी सोरने म्हटले, ‘आहा! राष्ट्रांचे प्रवेशद्वार मोडले आहे आणि त्याचे दरवाजे माझ्यासाठी उघडे पडले आहेत; ती उजाड झाली आहे, तर आता माझी भरभराट होईल,’ 3यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अगे सोर, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि जशा समुद्राच्या लाटा उसळतात तसे अनेक राष्ट्र मी तुझ्याविरुद्ध आणेन. 4ते सोरचे तट पाडतील व तिच्या बुरुजांचा विध्वंस करतील; मी तिची माती खरडून काढेन व तिला एक उघडा खडक करेन. 5ती बाहेर समुद्रावर जाळे पसरण्याचे स्थान होईल, कारण मी हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह म्हणतात. ती राष्ट्रांसाठी लूट होईल, 6आणि भूप्रदेशात असलेले तिचे लोक तलवारीने पडतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
7“कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर#26:7 किंवा नबुखद्नेस्सर त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन. 8भूप्रदेशात असलेल्या तुमच्या वस्त्यांचा तलवारीने तो नाश करेल; तो तुमच्याविरुद्ध घेराबंदी करेल, तुमच्या भिंतीस चढ बांधेल आणि तुझ्याविरुद्ध त्याची ढाल उंच करेल. 9तो तुझ्या तटांसमोर युद्धाची यंत्रे लावेल व आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज नष्ट करेल. 10त्याचे घोडे इतके असतील की त्यांनी उडविलेल्या धुळीने तू झाकला जाशील. युद्धाचे घोडे, गाडे व रथासह तो जेव्हा तुझ्या द्वारातून प्रवेश करेल आणि ज्या शहराच्या भिंती कोसळल्या आहेत, त्यातून त्याचे सैन्य प्रवेश करतील तेव्हा तुझ्या भिंती त्यांच्या मोठ्या आवाजाने थरकापतील. 11त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी तुझे सर्व रस्ते तुडविले जातील; तो तुझ्या लोकांना तलवारीने मारेल आणि तुझे मजबूत स्तंभ जमिनीवर पडतील. 12ते तुझी संपत्ती व व्यापारी वस्तू लुटून घेतील; ते तुझ्या भिंती फोडतील आणि तुझ्यातील सुंदर घरांचा ते नाश करतील व तुझे धोंडे, लाकूड व माती समुद्रात फेकतील. 13तुझ्या गीतांचा आवाज मी बंद पाडेन आणि तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही. 14मी तुला उघडे खडक बनवीन आणि तू मासेमारीचे जाळे पसरविण्याचे ठिकाण बनशील. तू कधीही पुनर्स्थापित होणार नाहीस, कारण मी याहवेह हे बोललो आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
15“सोर शहरास सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी लोकांच्या कण्हण्याने आणि तुझ्यात होत असलेल्या कत्तलीमुळे समुद्रतटांचा थरकाप होणार नाही काय? 16तेव्हा सर्व समुद्रतटाचे राजकुमार आपआपल्या राजासनांवरून खाली उतरतील आणि आपले झगे काढून बाजूला ठेवतील व आपली नक्षीदार वस्त्रे काढून टाकतील. भीतीची वस्त्रे घालून, प्रत्येक क्षणी थरथर कापत, तुझ्याविषयी भयभीत होऊन ते जमिनीवर बसतील. 17मग ते तुझ्यासाठी विलाप करून तुला म्हणतील:
“ ‘हे प्रसिद्ध शहरा,
ज्या तुझ्यात खलाशी लोक वसत होते!
ज्या तुला समुद्रातही शक्ती होती,
तू व तुझे रहिवासी;
तिथे राहत असलेल्या सर्वांना आतंक होतीस
त्या तुझा नाश कसा झाला.
18आता तुझ्या पतनाच्या दिवशी
समुद्रतट कापतात;
तू कोसळून पडली म्हणून
समुद्रातील द्वीपे भयभीत झाली आहेत.’
19“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यामध्ये कोणी आणखी वस्ती करीत नाही, अशा शहरांसारखे जेव्हा मी तुला ओसाड शहर करेन आणि जेव्हा मी खोल समुद्र तुझ्यावर आणेन आणि त्याचे प्रचंड पाणी तुला झाकून टाकेल, 20आणि जे खाली गर्तेत आधी गेले आहेत त्यांच्याजवळ मी तुला खाली आणेन. पृथ्वीच्या खाली, अधोलोकाच्या खोल गर्तेत जिथे पुरातन ओसाडी आहेत, जे तिथे खाली गर्तेत आहेत आणि जे परत येणार नाहीत किंवा या जिवंतांच्या भूमीवर तुझे स्थान घेणार नाहीत#26:20 किंवा आणि मी गौरव देईन अशा ठिकाणी मी तुला वसवीन. 21मी तुझा भयंकर शेवट करेन आणि तुझे अस्तित्व मी नाहीसे करेन. तुझा शोध घेतला, तरी तू पुन्हा कधीही सापडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 26: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन