YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 7

7
हामानाला सुळावर दिले जाते
1मग राजा व हामान एस्तेर राणीच्या मेजवानीला गेले. 2दुसऱ्या दिवशी ते मद्य पीत असताना, राजाने परत एस्तेरला विचारले, “एस्तेर राणी, तुझी विनंती काय आहे? ती तुला देण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याची असली तरी, पूर्ण करण्यात येईल.”
3तेव्हा एस्तेर राणीने उत्तर दिले, “महाराज, जर मी तुमची कृपा संपादन केली असेन, आणि महाराजांच्या मर्जीला येत असेन, तर माझे प्राण वाचवा—हीच माझी विनंती आहे, आणि माझ्या लोकांचे—ही माझी मागणी आहे. 4कारण मी व माझे लोक, आमचा नाश, कत्तल व नामशेष करणार्‍यांना विकले गेलो आहोत. स्त्री व पुरुषांची केवळ गुलाम म्हणून विक्री झाली असती, तर कदाचित मी गप्प राहिले असते. त्यामुळे राजास कष्ट देण्याची गरज पडली नसती#7:4 किंवा परंतु कितीही मोठ्या रकमेने त्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.”
5तेव्हा अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “तो कोण आहे? कुठे आहे तो—जो असे काही करण्याचे धाडस करेल?”
6त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!”
तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला. 7हे ऐकताच राजा तीव्र संतापाने एकदम उठला आणि त्याचे मद्य सोडून बाहेर राजवाड्याच्या बागेत गेला. इकडे हामान, राजाने आता आपले भवितव्य ठरविले आहे, हे ओळखून आपले प्राण वाचवावे म्हणून एस्तेर राणीजवळ विनवणी करण्यासाठी तिथेच थांबला.
8एस्तेर राणी ज्या आसनावर रेलून बसली होती, त्या आसनावर हामान वाकलेला होता आणि नेमक्या त्याच क्षणी राजवाड्याच्या बागेत गेलेला राजा परतला.
तेव्हा संतापाने राजा ओरडला, “अरे, ती माझ्यासह इथे घरात असताना देखील हा राणीवर बलात्कार करू पाहतो काय?”
राजाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताक्षणी राजसेवकांनी हामानाचा चेहरा झाकून टाकला. 9मग राजाच्या खोजापैकी हरबोना नावाचा सेवक म्हणाला, “महाराज, पन्नास हात उंचीचा खांब हामानाच्या घराजवळ उभा करण्यात आला आहे. राजाला मदत करण्यासाठी ज्या मर्दखयाने सूचना दिली होती, त्याला फाशी देण्यासाठी याने तो तयार करवून घेतलेला आहे.”
तेव्हा राजा म्हणाला, “त्यावर यालाच फाशी द्या!” 10त्याप्रमाणे त्यांनी हामानाला मर्दखयासाठी तयार केलेल्या खांबावर फाशी दिले. तेव्हा राजाचा क्रोध शांत झाला.

सध्या निवडलेले:

एस्तेर 7: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन