YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 6

6
मर्दखयाचा सन्मान
1त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले. 2ग्रंथाचे वाचन चालू असताना, राजवाड्याचे दोन खोजे, द्वाररक्षक बिग्थाना व तेरेश यांनी अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा कट मर्दखय याने कसा उघडकीस आणला होता, ही संपूर्ण हकिकत नोंदविण्यात आल्याचे कळले.
3तेव्हा राजाने विचारले, “याबद्दल मर्दखयाचा सन्मान करण्यात आला होता का?”
“त्याच्यासाठी काही करण्यात आले नाही,” सेवकांनी उत्तर दिले.
4राजाने विचारले, “राजदरबारात कोण आहे?” त्याचवेळी हामानाने नुकताच राजदरबाराच्या बाहेरच्या चौकात प्रवेश केला. आपण उभ्या केलेल्या सुळावर मर्दखयाला फाशी देण्याची परवानगी राजापाशी मागण्यासाठी तो आलेला होता.
5तेव्हा राजदरबारी उत्तरले, “हामान राजदरबारात उभा आहे.”
“त्याला आत आणा,” राजाने फर्माविले.
6मग हामान आत आल्यावर, राजाने त्याला विचारले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास काय करावयाला हवे?”
आता हामानाने स्वतःबद्दल विचार केला, “राजाच्या मर्जीत सन्मानास योग्य असणारा माझ्याशिवाय दुसरा कोण असेल?” 7म्हणून हामानाने राजाला उत्तर दिले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास, 8राजाने स्वतः परिधान केलेला पोशाख व राजाने स्वारी केलेला घोडा मागवावा आणि राजमुकुट त्याच्या मस्तकावर ठेवावा. 9आणि राजाच्या अत्यंत थोर सरदाराला तो पोशाख व घोडा द्यावा. आणि राजा ज्याचा सन्मान करू इच्छितो त्याच्या अंगावर ते कपडे चढवावे, आणि त्याच्यापुढे हे जाहीर करीत जावे, ‘राजाला जे प्रसन्न करतात, त्यांचा सन्मान राजा अशा रीतीने करतो!’ ”
10राजाने हामानाला फर्माविले, “आता त्वरा कर आणि माझा पोशाख आणि माझा घोडा घे आणि तू सांगितलेस अगदी त्याप्रमाणे राजद्वारी बसणारा यहूदी मर्दखयाच्या बाबतीत कर. तू सुचवलेल्या कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष करू नको.”
11मग हामानाने राजाचा पोशाख व घोडा घेतला व तो पोशाख मर्दखयाला घातला, राजाच्या घोड्यावर बसवून, शहराच्या रस्त्यांमधून त्याला मिरवणुकीने नेले आणि त्यावेळी त्याच्यापुढे तो ललकारत होता, “जे राजाला प्रसन्न करतात, त्यांचा अशा रीतीने सन्मान केला जातो.”
12नंतर मर्दखय राजद्वारी परत आला, परंतु हामान घाईघाईने, आपले मस्तक अत्यंत शोकाने झाकून घरी परतला.
13मग हामानाने घडलेल्या गोष्टीची संपूर्ण हकिकत त्याची पत्नी जेरेश व त्याच्या सर्व मित्रांना सांगितली. त्याचे सल्लागार व पत्नी जेरेश त्याला म्हणाले, “मर्दखय यहूदी असेल, तर तुमचे अधःपतन सुरू झाले आहे. तुम्ही त्याच्याविरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही—आता तुमचा निश्चितच नाश होणार!” 14ते त्याच्याबरोबर ही चर्चा करीत असतानाच, राजाचे खोजा आले व एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीस हामानाला घाईघाईने घेऊन गेले.

सध्या निवडलेले:

एस्तेर 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन