YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 5

5
एस्तेरची राजाला विनंती
1मग तिसऱ्या दिवशी एस्तेरने तिची शाही वस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतील अंगणात, राजदरबाराच्या अगदी समोर, जाऊन उभी राहिली. राजा राजदरबारात आपल्या राजासनावर, प्रवेशद्वाराच्या सन्मुख बसला होता. 2जेव्हा त्याने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले, तिला बघून तो प्रसन्न झाला, तेव्हा त्याने आपला सोन्याचा राजदंड तिच्या दिशेने पुढे करून तिचे स्वागत केले, म्हणून एस्तेर जवळ गेली आणि तिने राजदंडाच्या टोकास स्पर्श केला.
3मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी, तुला काय हवे आहे? तुझी काय मागणी आहे? मी तुला सांगतो की ती मागणी अर्ध्या राज्याची असली, तरी मी ती पुरवेन!”
4त्यावर एस्तेरने उत्तर दिले, “महाराजांच्या मर्जीस आले, तर मी तयार केलेल्या मेजवानीला आपण व हामानाने आज यावे, अशी माझी इच्छा आहे.”
5“जा, हामानाला लगेच घेऊन या.” राजा म्हणाला, “म्हणजे एस्तेर जे सांगते ते करता येईल.”
मग राजा व हामान एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला गेले. 6मेजवानीत मद्य पुरविले जात असताना राजा परत एस्तेरला म्हणाला, “आता तुझी काय विनंती आहे? ते तुला देण्यात येईल. तुला काय पाहिजे? तुझी मागणी अर्ध्या राजाची असली, तर ती पूर्ण करण्यात येईल.”
7एस्तेर उत्तरली, “माझी याचना आणि माझी मागणी ही आहे: 8महाराजांची मजवर कृपा असेल आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, माझी विनंती मान्य करा, आपण उद्या पुन्हा हामानाला बरोबर घेऊन आपल्यासाठी मी तयार करणार असलेल्या मेजवानीला यावे; आणि मग उद्या मी महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर देईन.”
मर्दखयाविरुद्ध हामानाचा संताप
9मेजवानीवरून घरी परतल्यावर हामान खूपच आनंदात होता. परंतु राजवाड्याच्या दाराजवळ बसलेल्या मर्दखयास बघितले व आपल्यासमोर तो उठून उभा राहिला नाही, घाबरला नाही, हे पाहून हामान संतापाने भरून गेला. 10तरी, हामानाने स्वतःला आवरले व तो घरी गेला.
त्याने आपले मित्र व आपली पत्नी जेरेश यांना एकत्र बोलाविले. 11त्यांच्यापुढे आपल्या संपत्तीची, आपल्या अनेक मुलांची, राजाने दिलेल्या बहुमानाची आणि संपूर्ण राज्यात इतर प्रतिष्ठित व अधिकाऱ्यांपेक्षा आपण सर्वात उच्च कसे झालो या सर्वांची हामान बढाई मारू लागला. 12मग हामान पुढे म्हणाला, “आणि एवढेच नव्हे, एस्तेर राणीने आज राजाबरोबर केवळ मलाच तिने तयार केलेल्या मेजवानीला बोलाविले होते आणि उद्याही पुन्हा आम्हाला तिच्या मेजवानीचे आमंत्रण आहे!” 13परंतु मी राजद्वारासमोर बसणार्‍या व मला मुजरा करण्याचे नाकारणार्‍या यहूदी मर्दखयाला पाहतो, तेव्हा ते मला मुळीच समाधान देत नाही.
14तेव्हा त्याची पत्नी जेरेश हिने आणि त्याच्या सर्व मित्रांनी त्याला सुचविले, “पन्नास हात#5:14 अंदाजे 23 मीटर उंचीचा एक खांब तयार करून घ्या आणि सकाळीच मर्दखयाला त्या खांबावर देण्याची परवानगी राजाजवळ मागून घ्या. हे साध्य करून घेतल्यावर, राजाबरोबर खुशाल आनंदाने मेजवानीला जा.” या सूचनेने हामान प्रसन्न झाला आणि त्याने खांब तयार करून घेतला.

सध्या निवडलेले:

एस्तेर 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन