YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 4

4
मदतीसाठी मर्दखयाची एस्तेरला विनंती
1जेव्हा मर्दखयाला समजले, ज्या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून, गोणपाट नेसून, अंगाला राख फासून व बाहेर शहरात जाऊन मोठमोठ्याने व अतिशय दुःखाने विलाप केला. 2तो राजद्वारापर्यंतच जाऊ शकला, कारण गोणपाट पांघरूण राजवाड्यात प्रवेश करण्याची कोणाला परवानगी नसे. 3साम्राज्यातील सर्व प्रांतांत जिथेही राजाज्ञा जाहीर झाली, तेथील यहूदी लोक उपवास व अत्यंत विलाप करीत, रडून आक्रोश करू लागले. अनेकजण गोणपाट नेसून राखेत पडून राहिले.
4एस्तेरच्या दासींनी आणि खोजांनी येऊन तिला मर्दखयाबद्दल सांगितले, तेव्हा ती अतिशय खिन्न झाली. मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्रे घालावी म्हणून तिने त्याच्याकडे वस्त्रे पाठविली, परंतु त्याने ते घेण्याचे नाकारले. 5मग एस्तेरने राजांच्या खोजांपैकी जो एस्तेरच्या तैनातीला असे, त्या हथाकाला बोलाविणे पाठविले. मर्दखयावर कोणते संकट गुदरले होते व तो असा का वागत होता, या गोष्टीची चौकशी करण्यासाठी तिने त्याला बाहेर मर्दखयाकडे पाठविले.
6तेव्हा हथाक मर्दखयाला भेटण्यास राजद्वारासमोरील शहराच्या चौकात गेला. 7मर्दखयाने त्याला त्याच्या बाबत घडलेले सर्वकाही सांगितले. यहूदी लोकांचा नाश करण्यासाठी जी धनराशी शाही खजिन्यात देण्याचे वचन हामानाने दिले होते त्यासंबंधीही सांगितले. 8मर्दखयाने त्याला शूशनमध्ये जाहीर करण्यात आलेली, सर्व यहूद्यांचा नायनाट करण्याच्या राजाज्ञेची एक प्रतही दिली आणि ती प्रत एस्तेरला दाखवून त्यासंबंधी सर्वकाही सविस्तर कळविण्यासही सांगितले. तसेच एस्तेरला तिने राजाकडे जावे आणि तिच्या लोकांसाठी तिने राजाजवळ दयेसाठी रदबदली करावी आणि त्याला विनवणी करावी, अशा सूचनेचा निरोपही त्याने त्याच्याजवळ दिला.
9मग हथाक परत आला व त्याने एस्तेरला मर्दखयाने सांगितलेला अहवाल दिला. 10एस्तेरने हथाकाला मर्दखयाकडे पुढील निरोप देऊन पाठविले, 11“राजाच्या सर्व अधिकाऱ्यांना व शाही प्रांतातील लोकांना माहीत आहे की एखादी व्यक्ती, मग ती पुरुष असो वा स्त्री, राजाच्या आतील चौकात बोलाविल्यावाचून गेली, तर त्यांच्यासाठी एकच कायदा आहे: त्यांना प्राणदंड देण्यात यावा. पण जर राजाने आपला सोन्याचा राजदंड त्यांच्यापुढे केला तरच त्यांना जीवदान मिळते. आता तीस दिवस होऊन गेले आहे, पण राजाने मला आपल्याकडे बोलावलेले नाही.”
12तेव्हा एस्तेरचा हा निरोप मर्दखयाच्या कानी घालण्यात आला. 13मर्दखयाने हे प्रत्युतर एस्तेरला पाठविले: “असा विचार करू नको की तिथे राजवाड्यात आहेस म्हणून इतर सर्व यहूदी मारले जात असताना तू एकटी वाचशील. 14अशा प्रसंगी तू जर शांत राहशील, तर दुसर्‍या मार्गाने यहूदी लोकांकरिता मुक्ती व उद्धार येईल, परंतु तू आणि तुझ्या वडिलाचे कुटुंब नाश पावेल. पण कोणजाणे कदाचित अशाच प्रसंगासाठी तुला हे शाही पद मिळाले असेल का?”
15तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठविले: 16“जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.”
17तेव्हा मर्दखया तिथून गेला व एस्तेरच्या सूचनेप्रमाणे सर्व त्याने केले.

सध्या निवडलेले:

एस्तेर 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन