एस्तेर 8
8
यहूद्यांच्या वतीने राजाज्ञा
1त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा शत्रू हामानची मालमत्ता एस्तेर राणीला दिली. नंतर मर्दखयाला राजापुढे आणण्यात आले, कारण एस्तेरने मर्दखया कसा आपला नातेवाईक आहे राजाला सांगितले होते. 2तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले.
3आता पुन्हा एकदा एस्तेर राजाच्या पायांवर पडून व अश्रू ढाळून तिने राजाजवळ विनवणी केली. यहूद्यांच्या विरुद्ध अगागी हामानाने केलेली दुष्ट योजना स्थगित करावी, अशी तिची मागणी होती. 4राजाने पुन्हा आपली सोनेरी राजदंड एस्तेरपुढे धरला, तेव्हा ती उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली.
5ती म्हणाली, “महाराज, आपल्या मर्जीस येत असेल व मजवर आपली कृपादृष्टी असेल, व ते योग्य वाटत असेल, आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, सर्व प्रांतांतील यहूद्यांचा नायनाट करण्याविषयीचा अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा हुकूम रद्द करणारे फर्मान काढून ते सर्वत्र पाठविण्यात यावे. 6कारण माझ्या लोकांची कत्तल आणि नायनाट झालेला पाहणे, मला कसे सहन होईल? माझ्या कुटुंबाचा नाश पाहणे मी कसे सहन करेन?”
7मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहूदी मर्दखयाला म्हणाला, “कारण हामानाने यहूद्यांवर हल्ला केला, म्हणून मी हामानाची संपत्ती एस्तेरला दिली आहे आणि त्याला त्यानेच उभ्या केलेल्या फासावर लटकावले. 8आता तुम्ही राजाच्या नावाने यहूद्यांच्या वतीने तुम्हाला योग्य वाटेल तशी दुसरी राजाज्ञा लिहा आणि त्यावर राजाची मोहोर लावा—कारण राजाच्या नावाने लिहिलेले व राजाची मोहोर लावलेले पत्र कधीही रद्द होत नाही.”
9-10तेव्हा ताबडतोब राजाच्या चिटणीसांना बोलाविण्यात आले—तो तिसऱ्या, म्हणजे सिवान#8:9‑10 अंदाजे जून महिना महिन्याचा, तेविसावा दिवस होता. त्यांनी मर्दखयाने भारतापासून कूशपर्यंतच्या 127 प्रांतातील यहूद्यांना, प्रांतप्रमुखांना, राज्यपालांना, व प्रतिष्ठितांना पाठविण्यासाठी फर्मान लिहून घेतले. राज्यातील विविध लोकांच्या विविध भाषांमधून व लिप्यांमधून, तसेच यहूद्यास त्यांच्या भाषेत व लिपीत ते फर्मान लिहिण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्र लिहून, ते बंद करून त्यावर राजाच्या मुद्रेची मोहोर लावली. मग ती पत्रे राजाच्या निरोपासाठी वापरले जाणारे खास वाढविलेले वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठविली.
11या फर्मानाद्वारे सर्व नगरात राहत असलेल्या यहूद्यांना आपल्या प्राणाच्या व कुटुंबाच्या रक्षणार्थ एकजूट होण्याची व त्यांचा नाश, कत्तल व नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या, कोणत्याही राज्याच्या व प्रांताच्या सशस्त्र लोकांना, त्यांच्या स्त्रिया व लेकरांना नष्ट करून त्यांची घरेदारे घेण्याची परवानगी देण्यात आली. 12हे सर्व करण्यासाठी अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांसाठी एक दिवस म्हणजे बारावा म्हणजे अदार महिन्याचा तेरावा दिवस निवडण्यात आला. 13त्या पत्राच्या प्रतिद्वारे प्रत्येक प्रांतातील सर्व जातीच्या नागरिकांना कळविण्यात आले, हे फर्मान सर्वत्र कायदा म्हणून मान्य करण्यात यावे की आपल्या शत्रूचा सूड घेण्यासाठी या दिवशी यहूदी लोक सज्ज राहतील.
14अशा रीतीने संदेशवाहकांनी शाही वेगवान घोड्यांवर स्वार होऊन व राजाज्ञेनुसार राज्यात सर्वत्र पत्र नेले. हे फर्मान शूशन राजवाड्यात काढण्यात आले.
यहूद्यांचा विजय
15जेव्हा मर्दखया राजाच्या उपस्थितीतून बाहेर गेला, तेव्हा त्याने निळ्या व पांढर्या रंगांची राजकीय वस्त्रे परिधान केले होते व डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून आणि व जांभळ्या रंगाचा व तलम वस्त्राचा झगा घातला होता. आणि शूशन शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 16यहूद्यांकरिता हा समय उल्लास व आनंद, हर्ष व सन्मान साजरा करण्याचा होता. 17राजाचे फर्मान ज्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक प्रांतात जाऊन पोहोचले तेव्हा तेथील सर्व यहूद्यांनी मेजवान्या देऊन उत्सव साजरा करून आपला हर्ष व उल्हास प्रकट केला. इतर देशातील अनेक लोक यहूदी बनले, कारण यहूदी आपला जबरदस्तीने ताबा घेतील अशी त्यांना भीती वाटली.
सध्या निवडलेले:
एस्तेर 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.