एस्तेर 3
3
यहूद्यांचा नाश करण्यासाठी हामानाचा कट
1त्यानंतर अहश्वेरोश राजाने अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा बहुमान करून त्याची इतर प्रतिष्ठितांपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणून नेमणूक केली. 2आता राजाज्ञेप्रमाणे राजद्वारावरील सर्व अधिकारी हामानाला अतिशय आदराने गुडघे टेकवून मुजरा करू लागले. परंतु मर्दखयाने गुडघे टेकवून मुजरा करण्याचे नाकारले.
3मग राजद्वारावरील सर्व अधिकारी मर्दखयाला विचारू लागले, “तू राजाची आज्ञा का पाळीत नाहीस?” 4दररोज लोक त्याला सांगत असत, परंतु तरीही त्याने ते करण्याचे नाकारले. शेवटी त्याला या राजाज्ञेपासून सूट मिळू शकते की काय हे पाहण्यासाठी ते हामानाशी बोलले, कारण आपण यहूदी असल्याचे मर्दखयाने त्यांना सांगितले होते.
5जेव्हा हामानाने पाहिले की मर्दखया गुडघे टेकवित नाही व मुजराही करीत नाही, तेव्हा त्याला अतिशय संताप आला. 6परंतु मर्दखया कोणत्या समाजातून आला आहे हे कळल्यावर, एकट्या मर्दखयावर हात टाकण्याचा विचार त्याला कमीपणाचा वाटला. याउलट अहश्वेरोश राजाच्या संपूर्ण साम्राज्यातील मर्दखयाच्या समाजाच्या सर्व लोकांचा म्हणजे यहूद्यांचा नायनाट करण्याचा हामान मार्ग शोधू लागला.
7अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षाच्या निसान#3:7 अंदाजे एप्रिल महिना महिन्यात, हामानाच्या समक्षतेत, योग्य दिवस व महिना कोणता हे ठरविण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकण्यात आल्या. चिठ्ठ्यांद्वारे या कामासाठी बारावा, अदार#3:7 अंदाजे मार्च महिना महिना निवडण्यात आला.
8आता हामान अहश्वेरोश राजास म्हणाला, “सर्व प्रांतात एका विशिष्ट जातीचे लोक विखुरलेले आहेत, जे स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात. त्यांचे रीतिरिवाज इतर लोकांपासून भिन्न आहेत, हे लोक राजाचे कायदे पाळत नाहीत; म्हणून या लोकांचे असे वागणे सहन करणे राजाच्या हिताचे नाही. 9जर हे राजास योग्य वाटले तर, या लोकांचा नाश करण्याची राजाज्ञा देण्यात यावी, म्हणजे दहा हजार तालांत#3:9 अंदाजे 340 मेट्रिक टन चांदी मी स्वतः राजाच्या खजिन्यात भरेन.”
10तेव्हा राजाने आपल्या बोटातील मुद्रा काढून ती यहूद्यांचा शत्रू, अगागी लोकातील हम्मदाथाचा पुत्र हामानाच्या स्वाधीन केली. 11राजा हामानाला म्हणाला, “पैसे तुझ्याजवळच ठेव व या लोकांचे तुला योग्य वाटेल तसे कर.”
12नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली. 13मग ती पत्रे साम्राज्याच्या सर्व प्रांतांकडे संदेशवाहकांच्या हस्ते पाठविण्यात आली. त्या पत्रांमध्ये अशी राजाज्ञा होती की, तरुण व वृद्ध, स्त्रिया व मुले अशा सर्व यहूदी लोकांना—एकाच दिवशी, बारावा महिना, अदार महिन्याच्या तेरा तारखेस ठार करण्यात यावे आणि त्यांच्या मालमत्तेची लूट करणार्यात यावी. 14या राजाज्ञेचा उतारा प्रत्येक प्रांतात कायदा म्हणून जाहीर केला जावा आणि प्रत्येक राज्यातील रहिवाशास त्याची माहिती दिली जावी, म्हणजे नेमलेल्या दिवशी आपले कर्तव्य करण्यास ते तयार राहतील.
15राजाज्ञा प्रथम शूशन शहरात जाहीर करण्यात आली, मग ती घेऊन संदेशवाहक निघाले. राजा आणि हामान मद्याची मौज लुटण्यास बसले, पण शूशन शहरात गोंधळ पसरून गेला.
सध्या निवडलेले:
एस्तेर 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.