YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 6

6
याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा
1यार्देन ओलांडून त्या वचनदत्त देश ताब्यात घ्यायचा आहे, त्या देशात तुम्हाला पाळावयास शिकविण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने मला सांगितलेल्या आज्ञा, विधी व नियम हे आहेत, 2यासाठी की तुम्ही, तुमचे पुत्र, पौत्रे यांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे. मी तुम्हाला दिलेले सर्व नियम व आज्ञा तुम्ही पाळत राहाल तर तुम्ही दीर्घायुष्याचा आनंद घ्याल. 3म्हणून इस्राएली लोकहो ऐका आणि काळजीपूर्वक आज्ञा पाळा म्हणजे तुमचे भले होईल आणि याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे दूध व मध वाहणार्‍या देशात तुम्ही बहुगुणित व्हाल.
4हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत. 5याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा. 6या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या. 7त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा. 8त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा. 9त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहा.
10जो देश देण्याचे वचन याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोबाला दिले होते, त्या देशात जेव्हा ते तुम्हाला घेऊन जातील व जी तुम्ही स्वतः वसविलेली नाहीत—अशी मोठी व सुंदर शहरे तुम्हाला देतील, 11तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल, 12ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या.
13तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी. 14इतर दैवतांच्या, तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या दैवतांच्या मागे लागू नका; 15कारण याहवेह तुमचे परमेश्वर, जे तुम्हामध्ये आहेत, ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत, यामुळे त्यांचा राग भडकेल व ते तुम्हाला या पृथ्वीवरून नष्ट करून टाकतील. 16मस्सा येथे पाहिली तशी तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका. 17याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाव्या आणि त्यांची बोधवचने व नियमांचेही जपून पालन करावे. 18याहवेहच्या दृष्टीने जे योग्य व चांगले आहे तेच करा, तर तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल आणि याहवेहने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात तुम्ही जाल व तो देश तुम्ही ताब्यात घ्याल. 19याहवेहने सांगितल्याप्रमाणे तुमच्या सर्व शत्रूंना तुमच्यापुढून घालवून द्या.
20भविष्यात जेव्हा तुमचा पुत्र तुम्हाला विचारेल, “याहवेह आपल्या परमेश्वराने या आज्ञा, ही बोधवचने, विधी व नियम तुम्हाला दिले आहेत, त्यांचा अर्थ काय?” 21तेव्हा तुम्ही त्यांना सांगा: “आम्ही इजिप्त देशात फारोहचे गुलाम होतो, परंतु याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. 22आमच्या नजरेसमोर याहवेहने इजिप्त देश, फारोह राजा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध—महान व भयावह—चिन्हे दाखविली व चमत्कार केले. 23त्यांनी आम्हाला इजिप्तमधून यासाठी बाहेर आणले की, आमच्या पूर्वजांना जो देश देण्याचे त्यांनी शपथपूर्वक वचन दिले होते, त्या देशात आम्हाला आणावे. 24याहवेहने आम्हाला सर्व नियम पाळण्याची आज्ञा दिली आणि याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, जेणेकरून आपले निरंतर कल्याण व्हावे आणि स्वतःस जिवंत राखावे, जसे आजवर आहोत. 25आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल.”

सध्या निवडलेले:

अनुवाद 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन