अनुवाद 7
7
इतर राष्ट्रांना घालवून देणे
1जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला त्या देशात घेऊन जातील, ज्याचा ताबा मिळविण्यासाठी तुम्ही जात आहात आणि तुमच्यापुढून—हिथी, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य सात राष्ट्रांना हाकलून देतील— 2आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल, तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ नायनाट करा. त्यांच्याशी कुठलाही करार करू नका किंवा त्यांना दया दाखवू नका. 3तुम्ही त्यांच्याशी आंतरविवाह करू नका, तुमच्या कन्या त्यांच्या पुत्रांसाठी देऊ नका किंवा त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांसाठी घेऊ नका, 4कारण ते तुमच्या मुलांना माझे अनुसरण करण्यापासून परावृत्त करून इतर दैवतांची उपासना करण्यासाठी प्रवृत्त करतील आणि याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते लगेच तुमचा नाश करतील. 5तुम्ही त्यांच्या बाबतीत हे करा: त्यांच्या वेद्या मोडून टाका, त्यांच्या पवित्र पाषाणांचा चुरा करा, त्यांचे अशेराचे स्तंभ तोडून टाका आणि त्यांच्या मूर्ती अग्नीत जाळून टाका. 6कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. संपूर्ण पृथ्वीवरील सर्व लोकातून याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला अशासाठी निवडले आहे की, तुम्ही त्यांचा खूप मोलाचा ठेवा असावा.
7तुम्ही संख्येने अधिक होता म्हणून याहवेहने तुमची निवड केली नाही व तुमच्यावर प्रीती केली नाही, कारण तुम्ही तर सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने अतिशय अल्प होता. 8पण याहवेहची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे आणि त्यांनी तुमच्या पूर्वजांना दिलेली शपथ पाळावयाची होती, म्हणून त्यांनी तुम्हाला सामर्थ्यशाली हाताने बाहेर काढले आणि इजिप्तचा राजा फारोहच्या दास्यगृहातून तुम्हाला सोडविले. 9म्हणून हे जाणून घ्या की, याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत; ते विश्वासू परमेश्वर आहेत, जे त्यांच्यावर प्रीती करतात आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत ते आपल्या प्रीतीचा करार पाळतात. 10परंतु
जे त्यांचा द्वेष करतात, त्यांना ते नष्ट करण्यास संकोच करणार नाहीत;
जे त्यांची घृणा करतात, त्यांची ते परतफेड करण्यास विलंब लावणार नाही.
11यास्तव, मी आज तुम्हाला देत आहे त्या सर्व आज्ञा, विधी व नियम पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या.
12तुम्ही या आज्ञा ऐकून त्या प्रामाणिकपणे पाळल्या, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनाप्रमाणे हा प्रीतीचा करार पुढेही पाळीत राहतील. 13ते तुम्हावर प्रीती करतील, तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला बहुगुणित करतील. तुमच्या पूर्वजांना देऊ केलेल्या वचनदत्त देशात ते तुमच्या पोटच्या फळाला, तुमच्या जमिनीतील पीक—तुमच्या धान्याला, नव्या द्राक्षारसाला, जैतुनाच्या तेलाला—तुमच्या गुरांची वासरे आणि तुमच्या कळपातील कोकरे यांनाही ते आशीर्वाद देतील. 14तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक आशीर्वादित व्हाल; तुमच्यापैकी कोणीही पुरुष वा स्त्री निःसंतान राहणार नाही किंवा तुमच्या पशूंपैकी कोणीही वांझ राहणार नाही. 15याहवेह तुमच्यातील सर्व रोग दूर करतील. इजिप्तमधील तुम्हाला माहीत असलेले भयंकर रोग ते तुमच्यावर आणणार नाहीत, तर तुमचा द्वेष करणार्या सर्वांवर ते रोग आणतील. 16याहवेह तुमचे परमेश्वर जे सर्व देश तुमच्या हाती देतील, त्यांचा तुम्ही पूर्णपणे संहार करावा. त्यांना दयामाया दाखवू नका व त्यांच्या दैवतांची सेवा करू नका. कराल, तर ते तुमच्यासाठी सापळा असे होईल.
17तुम्ही स्वतःशी म्हणाल, “ही राष्ट्रे आमच्यापेक्षा कितीतरी सामर्थ्यवान आहेत. आम्ही त्यांना कसे काय घालवून देऊ?” 18परंतु त्यांना भिऊ नका; याहवेह तुमच्या परमेश्वराने फारोहचे आणि संपूर्ण इजिप्त देशाचे काय केले याचे चांगले स्मरण ठेवा. 19याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढून आणण्यासाठी सामर्थ्यशाली हाताने व पसरलेल्या भुजांनी जी भयंकर संकटे, महान चमत्कार व चिन्हे केली, ते सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिले होते. तुम्हाला ज्या लोकांचे भय वाटते त्यासर्वांच्या सोबत याहवेह तुमचे परमेश्वर हेच करतील. 20शिवाय याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना घालवून देण्यासाठी गांधीलमाशा पाठवतील, तुमच्यापासून लपून बसलेले देखील नाश पावतील. 21तुम्ही त्यांना भिऊ नका, कारण महान व भयावह असे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर आहेत. 22याहवेह तुमचे परमेश्वर त्या राष्ट्रांना हळूहळू घालवून देतील; कारण त्यांना एकदम घालवून दिल्यास हिंस्र पशूची संख्या वेगाने वाढेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला धोका निर्माण होईल. 23परंतु त्यांच्यात खूप गोंधळ निर्माण करून त्यांचा नाश होईपर्यंत याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हातात देतील. 24ते त्यांच्या राजांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांची नावे या पृथ्वीतलावरून पुसून टाकाल. मग कोणीही तुमच्याविरुद्ध उभा राहणार नाही; तुम्ही त्यांचा नाश कराल. 25त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही जाळून टाका; त्यांच्या सोन्यारुप्याच्या लोभ धरू नका आणि ते स्वतःकरिता घेऊ नका, नाहीतर तुम्ही त्याद्वारे सापळ्यात अडकाल, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराला याचा वीट आहे. 26नाशाचे कारण असलेली कोणतीही किळसवाणी वस्तू घरात आणू नका, तसे केल्यास तुमचा खात्रीने नाश होईल. ती घृणास्पद समजून तिचा अगदी वीट माना, कारण ती शापित आहे.
सध्या निवडलेले:
अनुवाद 7: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.