अनुवाद 5
5
दहा आज्ञा
1मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि म्हटले:
इस्राएली लोकांनो, ज्या विधी व नियमांची आज मी घोषणा करीत आहे व तुम्हाला ऐकवीत आहे, ते शिका आणि निश्चितपणे त्याचे पालन करा. 2याहवेह आपल्या परमेश्वराने होरेब पर्वतावर तुमच्याशी एक करार केला होता. 3याहवेहने हा करार आपल्या पूर्वजांशी नव्हे तर आज येथे जिवंत असलेल्या आपल्या सर्वांशी#5:3 किंवा केवळ आमच्या पूर्वजांशी केला आहे. 4याहवेह पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी समोरासमोर बोलले. 5(त्यावेळी मी तुमच्या आणि याहवेहमध्ये उभा राहिलो आणि तुम्हाला याहवेहच्या वचनाची घोषणा केली, कारण तुम्हाला अग्नीची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही पर्वतावर चढून त्यांच्यापर्यंत गेला नाही.)
आणि ते म्हणाले:
6“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
7“माझ्यासमोर तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.
8तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका. 9तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो, 10परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.
11याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.
12याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळावा. 13सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी, 14परंतु सातवा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वराचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये. तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे बैल, गाढव, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी, तुमचा दास आणि दासी यांनी देखील तुमच्यासह त्या दिवशी विश्रांती घ्यावी. 15तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता याचे स्मरण करा. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सामर्थ्यवान व विस्तारित हातांनी तुम्हाला तिथून बाहेर काढले. यास्तव याहवेह तुमच्या परमेश्वराने शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.
16याहवेह तुमच्या परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल व तुमचे कल्याण होईल.
17तुम्ही खून करू नका.
18तुम्ही व्यभिचार करू नका.
19तुम्ही चोरी करू नका.
20तुमच्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.
21तुमच्या शेजार्याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका. त्याच्या घराचा किंवा भूमीचा, त्याच्या दासाचा किंवा दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा गाढवाचा किंवा शेजार्याच्या मालकीच्या कशाचाही लोभ करू नका.”
22याहवेहने या आज्ञा तुमच्यातील प्रत्येकाला अग्नी, मेघ व निबिड अंधकार यांनी वेष्टिलेल्या पर्वतावरून उंच आवाजात उच्चारून दिल्या; व त्यात अधिक काहीही जोडले नाही. त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याजवळ दिल्या.
23पण ज्यावेळी तुम्ही अंधारातून येणारा आवाज ऐकला आणि डोंगर माथ्यावरील त्या भयानक ज्वाला पाहिल्या, तेव्हा तुमचे सर्व गोत्रप्रमुख व वडील माझ्याकडे आले. 24आणि मला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वराने आज आम्हाला त्यांचे गौरव व थोरवी दाखविली आहे आणि अग्नीमधून येणारा त्यांचा आवाजसुद्धा आम्ही ऐकला. आम्ही आज पाहिले आहे की, परमेश्वर मानवाशी बोलले तरी मानव जिवंत राहणे शक्य आहे. 25परंतु आम्ही का मरावे? त्या भयानक ज्वाला आम्हाला भस्म करून टाकतील आणि याहवेह आमच्या परमेश्वराची वाणी आम्ही ऐकत राहू, तर खात्रीने मरून जाऊ. 26कारण जिवंत परमेश्वर अग्नीतून बोलत असताना त्यांची वाणी ऐकून जिवंत राहिला आहे, असा सर्व नश्वर मानवात आमच्याशिवाय कोण आहे? 27तेव्हा तुम्ही याहवेह आमच्या परमेश्वराजवळ जा आणि ते जे सांगतील ते सर्व ऐका. मग याहवेह आमच्या परमेश्वराने तुम्हाला जे काही सांगितले आहे ते आम्हाला सांगा. आम्ही ऐकू आणि त्याचे पालन करू.”
28तुम्हाला माझ्याशी बोलताना याहवेहनी ऐकले आणि याहवेह मला म्हणाले, “हे लोक जे काही तुझ्याशी बोलले ते मी ऐकले आहे. त्यांनी जे सर्वकाही बोलले ते चांगले आहे. 29त्यांचे अंतःकरण मजविषयी नेहमीच असे राहिले आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे भय त्यांच्याठायी नेहमीच राहिले तर किती बरे होईल! असे झाल्यास त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे सदासर्वकाळ कल्याण होईल!
30“जा आणि त्यांना त्यांच्या तंबूमध्ये परत जाण्यास सांग. 31पण तू माझ्याबरोबर इथेच थांब, म्हणजे मी तुला माझ्या सर्व आज्ञा, विधी व नियम देईन आणि ते त्यांना शिकव म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देणार आहे तिथे त्यांचे पालन करावे.”
32याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या; उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका. 33याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या मार्गावर चालण्यास आज्ञा केली आहे, त्यावर तुम्ही चला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि ज्या देशाचा तुम्ही ताबा घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल समृद्धीचे जीवन जगू शकाल.
सध्या निवडलेले:
अनुवाद 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.