YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 4

4
आज्ञापालनाविषयी बोध
1आता, अहो इस्राएली लोकहो, मी जे विधी व नियम तुम्हाला शिकवणार आहे ते ऐका. त्यांचे पालन करा म्हणजे जिवंत राहाल आणि याहवेह तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर तुम्हाला देत आहेत, तो देश ताब्यात घ्या. 2याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्यांचे तुम्ही फक्त पालन करा, त्यात काही भर घालू नका आणि काही कमी करू नका.
3बआल—पौर येथे याहवेहने काय केले हे तुम्ही आपल्या डोळ्याने पाहिले आहे. याहवेह तुमच्या परमेश्वराने बआल-पौराच्या मागे चालणार्‍या सर्वांचा नाश केला, 4पण याहवेह तुमच्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही सर्वजण आजही जिवंत आहात.
5पाहा, मी तुम्हाला याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दिलेले विधी व नियम यासाठी शिकविले की जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुमचा प्रवेश होईल, त्यावेळी ते तुम्ही पाळावे. 6तुम्ही जर ते पाळले तर तुम्ही सुज्ञ व समंजस आहात अशी तुमची किर्ती होईल. जेव्हा सभोवतालची राष्ट्रे या नियमांविषयी ऐकतील तेव्हा ती म्हणतील, “इस्राएली राष्ट्रातील लोक निश्चितच बुद्धिमान व समंजस आहेत.” 7याहवेह आपले परमेश्वर जसे आपण त्यांना प्रार्थना करतो तेव्हा ते आपल्या समीप असतात त्याप्रमाणे दुसरे कोणते महान राष्ट्र आहे ज्याचे देव त्यांच्या समीप असतात? 8आणि एवढे महान राष्ट्र कोणते आहे, ज्याचे विधी आणि नियम या नियमशास्त्रासारखे न्याय्य आहेत, जे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे?
9तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा. 10ज्या दिवशी तुम्ही होरेब पर्वताजवळ याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर उभे होता, त्या दिवसाविषयी त्यांना सांगा. त्या दिवशी याहवेहनी मला म्हणाले होते, “माझ्यासमोर सर्व लोकांना माझे शब्द ऐकण्यासाठी एकत्र कर, म्हणजे ते पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत माझा आदर करतील आणि आपल्या मुलाबाळांना माझे शब्द शिकवतील.” 11मग तुम्ही जवळ येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन उभे राहिलात आणि पर्वत अग्नीने पेटला होता, त्याची ज्वाला आकाशापर्यंत पोहोचली होती, सर्वत्र अंधार, ढग आणि घनदाट अंधकार पसरला होता. 12मग याहवेह तुमच्याशी अग्नीतून बोलले, तुम्ही त्यांचे शब्द ऐकले, परंतु त्यांची आकृती तुम्हाला दिसली नाही; फक्त वाणी ऐकली. 13त्यांनी आपला करार तुम्हाला घोषित केला, दहा आज्ञा, ज्या पालन करण्याची त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या. 14आणि त्यावेळी याहवेहने मला आज्ञा केली की तुम्ही यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेणार आहात तिथे तुम्हाला जे विधी व नियम पाळायचे आहेत ते शिकवावे.
मूर्तिपूजेस सक्त मनाई
15याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही; 16म्हणून कोणत्याही पुरुष अथवा स्त्रीच्या आकाराची कोरीव मूर्ती करून तुम्ही स्वतःला भ्रष्ट करू नये, 17किंवा पृथ्वीवरील एखाद्या पशूची किंवा आकाशात उडणार्‍या कोणत्याही पक्ष्याची, 18अथवा जमिनीवर रांगणार्‍या कोणत्याही प्राण्याची किंवा पृथ्वीच्या खाली जलामध्ये असणार्‍या कोणत्याही मत्स्याची तुम्ही प्रतिमा करू नये. 19जेव्हा तुम्ही वर आकाशाकडे बघाल आणि तुम्हाला सूर्य, चंद्र व तारे—आकाशातील सर्व नक्षत्र—दिसतील, तेव्हा त्यांची उपासना करण्याच्या आणि त्यांना दंडवत घालण्याच्या मोहात पडू नका. याहवेह तुमच्या परमेश्वराने आकाशाखाली असलेल्या पृथ्वीतलावरील इतर राष्ट्रांना ते वाटून दिले आहेत. 20परंतु याहवेहने तुम्हाला इजिप्तच्या तप्त लोखंडी भट्टीतून यासाठी सोडवून आणले की, तुम्ही त्यांचे खास निवडलेले लोक, त्यांचे वारसदार व्हावे, जसे तुम्ही आज आहात.
21पण तुमच्यामुळेच याहवेह माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला शपथपूर्वक सांगितले आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी वतनादाखल दिलेल्या त्या उत्तम देशात यार्देन ओलांडून तुला जाता येणार नाही. 22तुला याच देशात मरावे लागणार; मी यार्देन पार करू शकणार नाही; परंतु तुम्ही मात्र पार करून तो उत्तम प्रदेश वतन म्हणून ताब्यात घ्याल. 23तेव्हा सावधगिरी बाळगा, नाहीतर याहवेह तुमच्या परमेश्वराने मनाई केलेल्या वस्तूंची तुम्ही स्वतःसाठी कोरीव प्रतिमा कराल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराचे तुम्हाला विस्मरण होईल. 24कारण याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणारे अग्नी व ईर्ष्यावान असे परमेश्वर आहेत.
25तुम्हाला जेव्हा मुले आणि नातवंडे होतील आणि त्या देशात तुम्ही बराच काळ वास्तव्य केल्यावर तुम्ही मूर्तिपूजा करून स्वतःला भ्रष्ट केले, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यावर अतिशय कोपायमान होतील, 26तर मी सांगतो की तुमच्याविरुद्ध स्वर्ग व पृथ्वी ही दोन्हीही साक्षी असतील, मग तुम्ही यार्देन पार करून जो देश ताब्यात घ्याल, त्या देशात तुमचा लवकरच नाश होईल. तुमचे तेथील वास्तव्य अगदी अल्पकाळ असेल व तुमचा संपूर्णपणे नायनाट होईल. 27याहवेह, तुमची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग करतील आणि ज्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला घेऊन जातील त्यांच्यापैकी फक्त काही लोकच मागे उरतील. 28तिथे तुम्ही लाकूड आणि दगडाच्या मानवनिर्मित दैवतांची सेवा कराल, जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत किंवा वासही घेऊ शकत नाहीत. 29परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील. 30तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल. 31कारण याहवेह तुमचे परमेश्वर हे कनवाळू आहेत. ते तुम्हाला सोडणार वा टाकणार नाहीत किंवा त्यांनी तुमच्या पूर्वजांशी केलेला शपथपूर्वक करार ते विसरणार नाहीत.
याहवेहच परमेश्वर आहेत
32परमेश्वराने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले त्या दिवसापासून आतापर्यंत तुमच्या आधी होऊन गेलेल्या दिवसांना विचारा आणि आकाशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत विचारा की, अशा प्रकारची महान गोष्ट पूर्वी कधी घडली होती का किंवा अशी गोष्ट कुठे घडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का? 33अग्नीमधून बोलताना परमेश्वराची वाणी कोणी कधी ऐकली, ज्याप्रकारे तुम्ही ऐकली आणि जिवंत राहिले आहेत काय? 34कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?
35त्यांनी या गोष्टी अशासाठी केल्या की, याहवेहच परमेश्वर आहेत हे तुम्हाला कळून यावे; त्यांच्यासारखा अन्य कोणीही नाही हे देखील समजावे. 36तुम्हाला बोध करण्यासाठी स्वर्गातून आज्ञा देण्यास त्यांनी तुम्हाला आपली वाणी ऐकविली, तसेच त्यांचा महान अग्निस्तंभही तुम्हाला या पृथ्वीतलावर दाखविला; आणि तुम्ही त्या अग्नीमधून येणारे त्यांचे शब्दही ऐकले. 37तुमच्या पूर्वजांवर त्यांची प्रीती होती आणि त्यांनी त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी निवडले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला आपल्या उपस्थितीने आणि महान सामर्थ्याने इजिप्त देशामधून बाहेर आणले, 38त्यांनी तुमच्यापेक्षाही महान आणि सामर्थ्यवान राष्ट्रांना घालवून दिले व त्यांची भूमी तुम्हाला वतनादाखल दिली, ती आजही तशीच आहे.
39वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर याहवेहच परमेश्वर आहेत, हे आजच स्वीकारा आणि तुमच्या अंतःकरणात ठेवा. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही. 40आज जे विधी व आज्ञा मी तुम्हाला सांगणार आहे, यांचे तुम्ही पालन केले, तर तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या या देशामध्ये तुम्ही चिरकाल वस्ती कराल.
आश्रयाची शहरे
41नंतर मोशेने यार्देनेच्या पूर्वेस तीन शहरे नेमली; 42ती यासाठी की, जर कोणी चुकून एखाद्या व्यक्तीची हत्या केली, त्याने पूर्व कल्पना नसताना एखाद्या शेजार्‍याला अनावधानाने मारले तर त्याला सुरक्षिततेसाठी त्या शहरात पळून जाता येईल. तो यापैकी एका शहरात पळून जाऊन आपला जीव वाचवू शकतो. 43ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान.
नियमशास्त्राची ओळख
44मोशेने इस्राएली लोकांना दिलेले नियमशास्त्र हे आहे. 45ज्यावेळी इस्राएली लोकांनी इजिप्त देश सोडला, त्यांना मोशेने या अटी, विधी व नियम दिले 46आणि तेव्हा ते यार्देनेच्या पूर्वेकडे बेथ-पौर शहराजवळ तळ देऊन राहिलेले होते, हीच भूमी पूर्वी अमोर्‍यांनी आपला राजा सीहोनच्या अधिपत्याखाली व्यापली होती आणि त्याची राजधानी हेशबोन होती; मोशे व इस्राएली लोकांनी इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर सीहोन राजा आणि त्याच्या लोकांचा पराभव केला. 47इस्राएली लोकांनी त्यांची भूमी आणि बाशानचा राजा ओगचीही भूमी जिंकून ताब्यात घेतली. यार्देनेच्या पूर्वेस असणारे हेच दोघे अमोरी राजे होते. 48आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या टोकाशी वसलेल्या अरोएर शहरापासून सिर्योन#4:48 काही हस्तलेखात सीयोन पर्वतापर्यंत, ज्याला हर्मोन पर्वत असेही म्हणतात, 49आणि तसेच यार्देनच्या पूर्वेस असलेल्या अराबाच्या संपूर्ण प्रदेशापासून पिसगा पर्वताच्या उताराखाली असलेल्या खार्‍या समुद्रापर्यंतचा सर्व भूभाग इस्राएली लोकांनी जिंकून घेतला.

सध्या निवडलेले:

अनुवाद 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन