YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 3

3
बाशानचा राजा ओगचा पराजय
1मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला. 2याहवेहने मला म्हटले, “त्याला भिऊ नकोस; कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता त्याचे तू जसे केले तसेच याचे कर.”
3याप्रमाणे याहवेह आमच्या परमेश्वराने बाशानचा ओग राजा त्याच्या सर्व सैन्यासह आमच्या अधीन झाला. आम्ही त्यांचा असा संहार केला की त्यांच्यातील कोणीही मागे जिवंत राहिला नाही. 4त्याची सगळी शहरे आम्ही त्यावेळी घेतली होती. अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आणि बाशानमधील ओगचे राज्य, साठ नगरातील असे एकही शहर राहिले नाही जे आम्ही त्यांच्याकडून घेतले नाही. 5या सर्व शहरांच्या तटबंदी उंच व दरवाजे लोखंडी गजांचे होते. शिवाय बरीच तटबंदी नसलेली गावेही होती. 6ज्याप्रकारे आपण सीहोन राज्याचा हेशबोन येथे नाश केला, त्याच प्रकारे आपण बाशानच्या राज्यातील संपूर्ण शहरांचा—पुरुष, स्त्रिया व मुले यासहित समूळ नायनाट केला. 7पण त्यांची सर्व गुरे व शहरातून मिळालेली लूट आपण आपल्यासाठी नेली.
8म्हणून आपल्या ताब्यात दोन्हीही राजांचे सर्व प्रदेश, म्हणजे यार्देनेच्या पूर्वेकडे आर्णोन खिंडीपर्यंत असलेला हर्मोन पर्वतापर्यंतचा अमोर्‍यांचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात आला. 9(सीदोनी लोक हर्मोन पर्वतास सिर्योन असेही म्हणत, पण अमोरी लोक त्याला सनीर म्हणत असत.) 10आतापर्यंत आपण पठारावरील सर्व शहरे, संपूर्ण गिलआद आणि बाशान, सलेकाह व एद्रेई, ओग या शहरांपर्यंतची सर्व शहरे काबीज केली. 11(रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग हा शेवटचा होता. त्याचा पलंग लोखंडाने सजविला होता आणि तो चार हात लांब आणि दोन हात रुंद होता.#3:11 अंदाजे 4 मीटर लांब, 1.8 मीटर रुंद तो अजूनही अम्मोनी लोकांच्या राब्बाहमध्ये आहे.)
देशाची वाटणी
12त्यावेळी आपण काबीज केलेला प्रदेश मी रऊबेन व गाद यांच्या वंशास दिला. रऊबेन व गादच्या वंशांना मी आर्णोन नदीवरील अरोएरापासून गिलआद पर्वताचा अर्धा भाग त्यातील शहरांसह दिला. 13गिलआद पर्वताचा उरलेला अर्धा भाग आणि ओग राजाचे पूर्वीचे राज्य म्हणजे अर्गोब विभाग हा मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रास दिला. (बाशानच्या अर्गोब प्रदेशाला रेफाईमचा देश असेही म्हणत. 14मनश्शेहच्या वंशातील याईराच्या कुळाने गशूरी व माकाथी लोकांच्या सीमेपर्यंतचा अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला; त्याच्या नावावरून त्या प्रदेशाचे नाव पडले, त्यामुळे आजपर्यंत बाशानाला हव्योथ याईर#3:14 किंवा याईराची वस्ती म्हणतात.) 15आणि मी गिलआद देश माखीरला दिला. 16रऊबेन आणि गाद यांना मात्र गिलआद देशातील यब्बोक नदीपासून ते आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या मध्यापर्यंतचा सर्व भाग मिळाला. गिलआद ही अम्मोन लोकांची सीमा होती. 17तसेच किन्नेरेथाच्या समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र) आणि पिसगाच्या उतरणी खालील अराबा व यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेशही त्यांनाच मिळाला.
18त्यावेळी मी तुम्हाला आज्ञा दिली: “याहवेह तुमच्या परमेश्वराने हा प्रदेश तुम्हाला वतन म्हणून दिलेला आहे, परंतु तुम्ही त्यात वस्ती करण्यापूर्वी तुमच्या सक्षम योद्ध्यांना शस्त्रे धारण करून यार्देन ओलांडून इतर इस्राएलाच्या पुढे पाठवावे. 19तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमची जनावरे (मला माहीत आहे तुमच्याकडे विपुल गुरे आहेत) यांना मी तुम्हाला दिलेल्या शहरात राहता येईल, 20यार्देनेच्या पश्चिमेला याहवेह देत असलेल्या देशात तुमचे इस्राएली बांधव वस्ती करेपर्यंत आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्याप्रमाणे तुम्हाला विसावा दिला आहे, त्याप्रमाणे त्यांनाही विसावा मिळेपर्यंत, तुमच्या बांधवांना मदत करा. त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हाला दिला आहे येथे तुम्ही आपल्या वतनावर परत यावे.”
मोशेला यार्देनेपलीकडे जाण्यास मनाई
21नंतर मी यहोशुआस म्हणालो: “याहवेह तुझ्या परमेश्वराने सीहोन व ओग या दोन राजांचे काय केले हे तू आपल्या डोळ्याने पाहिले आहेस. तुम्ही जिथे जात आहात तेथील सर्व राज्यांचेही याहवेह असेच करतील. 22त्यांना तू भिऊ नको; कारण याहवेह तुझे परमेश्वर स्वतः तुझ्यासाठी त्यांच्याशी लढतील.”
23त्यावेळी मी याहवेहला विनवणी केली: 24“हे सार्वभौम याहवेह, तुमची महानता आणि तुमचा बलवान हात तुमच्या दासाला दाखविण्यास तुम्ही आरंभ केला आहे. स्वर्गात किंवा पृथ्वीवर असे कोणते दैवत आहे की, ज्याला तुमच्यासारखी थोर व महान कृत्ये करता येतील? 25हे प्रभो, मला जाऊ द्या आणि यार्देनच्या पलीकडील उत्तम जमीन पाहू द्या—तो उत्तम डोंगराळ प्रदेश आणि लबानोन.”
26पण तुमच्यामुळे याहवेह माझ्यावर रागावले आणि त्यांनी त्या वचनदत्त देशात मला जाऊ दिले नाही. ते मला म्हणाले, “पुरे कर. ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नकोस. 27पिसगा पर्वताच्या शिखरावर जा आणि तिथून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना पाहा. तिथून दूरवर तुला तो देश दिसेल, कारण तुला यार्देन ओलांडून जाता येणार नाही. 28पण तुझ्या जागी यहोशुआची नेमणूक कर. त्याला उत्तेजन दे, धैर्य दे, कारण तोच आपल्या लोकांना पलीकडे घेऊन जाईल आणि जो प्रदेश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन करून देईल.” 29म्हणून आम्ही बेथ-पौरातील खोर्‍यातच मुक्काम केला.

सध्या निवडलेले:

अनुवाद 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन