YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 19

19
आश्रयाची शहरे
1याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला देणार आहेत, तेथील राष्ट्रांचा ते नाश करतील व जेव्हा तुम्ही त्यांना त्या भूमीतून घालवून द्याल आणि त्यांच्या शहरात व घरात वस्ती कराल, 2त्यावेळी याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला वतन म्हणून देत आहेत, त्यामधील तीन शहरे तुम्ही वेगळी करून ठेवावी. 3यातील अंतर निश्चित करा आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतन म्हणून देत असलेल्या भूमीचे तीन भाग करा, म्हणजे एखाद्याने कोणाची हत्या केली, तर त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी त्या नगरात पळून जाता येईल.
4जो कोणी एखाद्या व्यक्तीची हत्या करतो आणि आश्रयाच्या नगरात पळून जातो, त्याच्यासाठी हे नियम असावे: एखाद्या मनुष्याने मनात काहीही द्वेष नसताना व हेतुपुरस्सर नव्हे, पण चुकून त्याच्या शेजार्‍याचा वध केला. 5एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्‍याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्‍हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्‍याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे. 6नाही तर, अशा रक्तपाताबद्दल सूड घेणारा संतापाने त्याचा पाठलाग करेल व मार्ग लांब असल्याने त्याला वाटेत गाठून ठार मारेल. त्याला मृत व्यक्तीबद्दल द्वेष नव्हता व त्याने पूर्वनियोजित केल्याशिवाय आपल्या शेजार्‍याशी हे कृत्य केले, तो प्राणदंडाच्या शिक्षेस पात्र नव्हता. 7म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तीन शहरे निवडून ती वेगळी करून ठेवावी.
8याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तुमच्या देशाच्या सीमांचा विस्तार करून संपूर्ण देश तुम्हाला दिला, 9कारण मी आज तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन केले—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती केली व त्यांच्या मार्गात आज्ञाधारकपणे चाललात—तर तुम्ही आणखी तीन शहरे निवडावीत. 10हे करावे, अशा रीतीने याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देत असलेल्या भूमीवर निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याचा दोष तुमच्यावर येणार नाही.
11परंतु कोणी द्वेषाने दबा धरून राहील व आपल्या शेजार्‍यावर अचानक प्राणघातक हल्ला करून त्याला ठार करेल आणि मग यापैकी एखाद्या शहरात पळून जाईल, 12तर त्या गावाच्या वडील मंडळीने माणसे पाठवून त्याला धरून आणावे व त्याला वध झालेल्या माणसाच्या रक्तपाताचा सूड घेणार्‍याच्या स्वाधीन करावे. 13त्याला दया दाखवू नये. इस्राएलास निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याच्या दोषापासून शुद्ध करावे, म्हणजे तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल.
14याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला वतनात देत आहेत, तो ताब्यात घेतल्यावर, आधीच्या माणसांनी ठेवलेल्या शेजार्‍याच्या जमीन हद्दीच्या खुणा कदापि बदलू नये.
साक्षीदारासंबंधीचे नियम
15केवळ एकाच साक्षीदाराच्या साक्षीवर तुम्ही कोणालाही त्याच्या गुन्ह्याबद्दल किंवा अपराधाबद्दल कदापि दोषी ठरवू नये. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.
16एखाद्याने मत्सराने खोटी साक्ष देऊन कोणावर चुकीचा आरोप लावल्यास, 17त्या दोन्हीही इसमांना याहवेहसमोर, त्यावेळी जबाबदार असलेल्या याजकांपुढे आणि न्यायाधीशांपुढे आणावे. 18न्यायाधीशांनी त्यांची बारकाईने चौकशी करावी आणि साक्षीदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले व तो दुसर्‍या इस्राएली बांधवावर खोटा आरोप करीत असेल, 19तर त्याच्या बांधवाचे जे करण्याचे त्याने मनात योजिले होते, तेच त्याचे करण्यात यावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्टाई तुम्ही घालवून टाकावी. 20इतर लोक हे ऐकतील व भयभीत होतील आणि तुम्हामध्ये अशी दुष्टाई पुन्हा कधीही घडणार नाही. 21खोट्या साक्षीदाराला तुम्ही दया दाखवू नये: जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय.

सध्या निवडलेले:

अनुवाद 19: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन