YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 18

18
याजक व लेवी यांचा वाटा
1लेवी याजकांना—अर्थात् संपूर्ण लेवी गोत्राला—इतर गोत्रांप्रमाणे इस्राएलात वाटा किंवा वतन नाही. ते याहवेहला केलेल्या होमार्पणावर जगतील, कारण हेच त्यांचे वतन आहे. 2त्यांच्या इस्राएली भाऊबंदांप्रमाणे त्यांना वतन नसेल; कारण याहवेहच त्यांचे वतन आहेत, जसे त्यांनी त्यांना अभिवचन दिले होते.
3बैलाचे किंवा मेंढराचे अर्पण करणार्‍या लोकांकडून मिळणारा याजकांचा हा वाटा आहे: खांदा, अंतर्गत अवयव आणि डोक्याचे मांस. 4याशिवाय धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यांच्या उत्पन्नाचे प्रथम भाग आणि मेंढरांची प्रथम कातरलेली लोकर त्यांना दिली जावी, 5कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आणि त्यांच्या वंशजांना सर्व गोत्रातून पिढ्यान् पिढ्या निरंतर उभे राहून आणि याहवेहच्या नावाची सेवा करण्यासाठी निवडले आहे.
6जर एखाद्या लेवीची इस्राएली राष्ट्राच्या एका नगरातून दुसर्‍या नगरात जाऊन राहण्याची कळकळीची इच्छा असल्यास आणि तो याहवेहने निवडलेल्या पवित्रस्थानी येऊन राहिल्यास, 7याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाने इस्राएली भूमीत इतर लेवी बांधवांप्रमाणे याहवेहच्या उपस्थितीत त्याने सेवा करावी. 8वारसाहक्काने मिळालेली संपत्ती विकून आलेले पैसे त्याच्याकडे असतील तरी देखील त्याला इतरांप्रमाणेच सारखा वाटा मिळावा.
अमंगळ चालीरीती
9जेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात याल, तेव्हा त्या देशात राहणार्‍या राष्ट्रांच्या अमंगळ चालीरीती शिकू नका. 10तुमच्यामध्ये आपल्या पुत्राचा किंवा कन्येचा होम करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा किंवा चेटके करणारा, दुष्ट आत्म्यांची मदत घेऊन भविष्य सांगणारा, जादूटोणा करणारा, 11अथवा वशीकरण करणारा, अथवा कोणी मध्यस्थ अथवा मृतात्म्यांना बोलावून त्यांच्याशी मसलत करणारा असू नये. 12जो कोणी अशी कृत्ये करतो त्याचा याहवेहला तिरस्कार आहे; आणि त्यांच्या या अमंगळ कृत्यांमुळेच त्या राष्ट्रांना याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढून घालवून देणार आहेत. 13तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे निर्दोषपणे चालावे.
संदेष्टा
14जी सर्व राष्ट्रे शकुनमुहूर्त पाहणार्‍यांचे व दैवज्ञांची भाकिते ऐकतात त्या राष्ट्रांचा ताबा तुम्ही घेणार आहात, त्यामधून त्यांना हुसकावून लावा. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला अशा गोष्टी करण्याची परवानगी देत नाहीत. 15याहवेह तुमचे परमेश्वर इस्राएलातून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील. तुम्ही त्याचे ऐकावे. 16कारण होरेबाच्या पर्वताजवळ हीच विनंती तुम्ही स्वतः याहवेह तुमच्या परमेश्वराजवळ केली होती, जेव्हा तुम्ही विनविले, “याहवेह आमच्या परमेश्वराचा भयावह आवाज पुन्हा ऐकण्याचा अथवा त्या पर्वतावर तो भयावह अग्नी पुनरपि पाहण्याचा प्रसंग आम्हावर येऊ नये, नाहीतर आम्हाला मृत्यू येईल.”
17तेव्हा याहवेह मला म्हणाले: “ते जे म्हणतात ते योग्य आहे. 18त्यांच्या भाऊबंदांतून मी त्यांच्यासाठी तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करेन आणि मी माझी वचने त्याच्या मुखात घालेन. मी त्याला ज्याकाही आज्ञा देईन त्या सर्व तो त्यांना सांगेल. 19तो संदेष्टा जे काही माझ्या नावाने बोलेल आणि जो कोणी माझे शब्द ऐकणार नाही, त्याची मी स्वतः झडती घेईन. 20पण जो संदेष्टा माझ्या नावाने असे काही बोलतो ज्याची मी आज्ञा दिली नाही किंवा जो संदेष्टा इतर दैवतांच्या नावाने बोलतो त्याला जिवे मारावे.”
21तुम्ही स्वतःशी म्हणू शकता, “हा संदेश याहवेह बोलले नाहीत, हे आम्ही कसे ओळखावे?” 22तर एखाद्या संदेष्ट्याने याहवेहच्या नावाने ज्या गोष्टीची घोषणा केलेली असेल, ती गोष्ट जर घडून आली नाही किंवा खरेच तसे होत नसेल तर तो संदेश याहवेहने दिलेला नाही. तो संदेष्टा उन्मत्तपणे बोलला आहे, तुम्ही त्याचे भय बाळगू नये.

सध्या निवडलेले:

अनुवाद 18: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन