YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 17

17
1तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला दोष अथवा व्यंग असलेला बैल किंवा मेंढरू यांचे अर्पण कदापि करू नये; कारण त्याचा त्यांना वीट आहे.
2समजा याहवेहने तुम्हाला दिलेल्या देशातील एखाद्या नगरात तुमच्यातील कोणी पुरुष अथवा स्त्री याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराविरुद्ध त्यांच्या दृष्टीने पातक करेल, 3आणि त्यांनी माझ्या आज्ञेच्या विरुद्ध अन्य दैवतांची उपासना केली, त्यांना किंवा सूर्य किंवा चंद्र किंवा आकाशातील तारे यांना नमन केले, 4आणि हे तुमच्या कानी आले, तर ही गोष्ट खरी आहे की नाही याची तुम्ही प्रथम काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. इस्राएलात ही घृणास्पद गोष्ट घडली आहे व हे सत्य आहे असे निश्चित झाल्यावर, 5ही घृणास्पद गोष्ट करणार्‍या त्या पुरुषाला अथवा स्त्रीला नगराच्या वेशीजवळ घेऊन जावे आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार करावा. 6दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीवर एखाद्याला मृत्यू दंड द्यावे लागते, परंतु केवळ एका साक्षीदाराच्या साक्षीवर कोणालाही मृत्यू दंड देऊ नये. 7ही धोंडमार करण्यासाठी जे साक्षीदार आहेत, त्यांनी प्रथम त्या मनुष्याला दगडमार करावा आणि नंतर इतरांनी त्यात सहभागी व्हावे. अशा रीतीने तुमच्यामधून दुष्टाई घालवून तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्यावे.
न्यायालये
8तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा. 9त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील. 10ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या. 11ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा. 12याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेला, त्यावेळी पदावर असलेल्या न्यायाधीशाचा अथवा याजकांचा निर्णय न पाळण्याचे धाडस जो कोणी करेल, त्याला मृत्यूची शिक्षा दिली जावी. अशा रीतीने इस्राएलातून तुम्हाला ही दुष्टाई काढून टाकता येईल. 13हे सर्व लोक ऐकतील व भयभीत होतील आणि पुढे ते उन्मत्तपणा करणार नाहीत.
राजासंबंधी सूचना
14याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशात तुम्ही याल व तो ताब्यात घ्याल आणि स्वतःशी म्हणाल, “इतर राष्ट्रांना जसा राजा आहे तसा आपल्यालाही असावा,” 15तर ज्या माणसाची याहवेह तुमचे परमेश्वर निवड करतील, त्यालाच तुम्ही राजा म्हणून नेमावे. तो तुमच्या भाऊबंदांपैकी असावा; परदेशीयाला म्हणजे इस्राएली पैकी नसलेल्यास तुम्ही राजा म्हणून नेमू नये.
16राजाने स्वतःसाठी घोड्यांचा मोठा संग्रह करू नये किंवा त्याने आपल्यासाठी अधिक घोडे आणण्यासाठी आपली माणसे इजिप्त देशात पाठवू नये, कारण “तुम्ही त्या मार्गाने परत जाऊ नये,” असे याहवेहने तुम्हाला सांगितले आहे. 17तुमच्या राजाने अनेक स्त्रिया करू नयेत, जेणेकरून त्याचे अंतःकरण बहकून जाईल. त्याने आपल्यासाठी चांदी व सोन्याचा मोठा संग्रह करू नये.
18जेव्हा तो आपल्या राजासनावर बसेल, तेव्हा त्याने लेवी याजकांच्या जवळ असणार्‍या नियमशास्त्रामधून हे सर्व नियम व आज्ञा स्वतः लिहून काढाव्यात. 19ती प्रत नेहमीच त्याच्याजवळ असेल. त्याने त्या नियमांचे दररोज वाचन करावे म्हणजे तो याहवेह त्याच्या परमेश्वराचा आदर करण्यास शिकेल आणि या नियमाचे आणि विधीचे सर्व शब्द काळजीपूर्वक पाळेल 20व त्याने स्वतःला आपल्या इस्राएली बांधवांपेक्षा अधिक श्रेष्ठ समजू नये आणि नियमांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नये. मग तो आणि त्याचे वंशज अनेक पिढ्या इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.

सध्या निवडलेले:

अनुवाद 17: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन