अनुवाद 16
16
वल्हांडण सण
1अवीव हा महिना पाळावा आणि याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी वल्हांडण सण साजरा करावा, कारण त्यांनी अवीव महिन्यात तुम्हाला इजिप्त देशामधून रात्रीच्या वेळी बाहेर काढले. 2याहवेह तुमच्या परमेश्वराला तुमचे वल्हांडण सणाचे अर्पण म्हणजे शेरडेमेंढरे किंवा गाईबैल असावे आणि याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथे त्याचे अर्पण करावे. 3ते खमीर असलेल्या भाकरीबरोबर खाऊ नये, परंतु सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी, ही तुमच्या क्लेशाची भाकर होय, कारण इजिप्त देश घाईघाईने सोडताना तुम्हाला खावी लागली होती—इजिप्तमधून तुमची सुटका झाली त्या वेळेची आठवण तुम्हाला आयुष्यभर राहील. 4सात दिवसापर्यंत तुमच्या संपूर्ण देशात खमीर अजिबात दृष्टीस पडू नये. बली देण्यात आलेले मांस दुसर्या दिवसाच्या सकाळपर्यंत राहू देऊ नये.
5याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या शहरांपैकी कोणत्याही शहरात तुम्ही वल्हांडणाच्या यज्ञपशूचे अर्पण करावयाचे नाही, 6तर ते आपल्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथेच वल्हांडणाचा यज्ञपशू तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी अर्पावा, कारण त्याच वेळेला#16:6 काही मूळ प्रतीमध्ये वर्धापनदिनी तुम्ही इजिप्त देशामधून बाहेर पडला होता. 7याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या स्थानी ते भाजावे आणि खावे. मग दुसर्या दिवशी सकाळी आपल्या तंबूत परतावे. 8तुम्ही सहा दिवस बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी सभा भरवावी आणि कोणतेही काम करू नये.
सप्ताहाचा सण
9उभ्या पिकाला विळा लावल्यापासून तुम्ही सात आठवडे मोजावे. 10मग याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही सप्ताहांचा उत्सव साजरा करावा. यावेळी तुम्ही तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांच्या प्रमाणात याहवेह तुमच्या परमेश्वराला स्वेच्छार्पणे वाहावीत. 11याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांनी आपल्या नावासाठी निवडलेल्या पवित्रस्थानी—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी आणि परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे. 12तुम्ही इजिप्त देशामध्ये गुलाम होता, याचे तुम्हाला स्मरण राहावे आणि म्हणून या विधीचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे.
मंडपांचा सण
13तुमच्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पादन तुम्ही गोळा केल्यानंतर सात दिवस मंडपाचा सण साजरा करा. 14आनंदोत्सव साजरा करण्यास—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी, परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे. 15हा सण सात दिवस याहवेह तुमचे परमेश्वर जे स्थान निवडतील तिथे साजरा करावा. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला तुमच्या सर्व उत्पन्नात आणि हाती घेतलेल्या तुमच्या कामात आशीर्वादित केले यास्तव तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
16वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर हजर व्हावे: बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण व मंडपांचा सण. या प्रत्येक प्रसंगी याहवेहसमोर रिक्तहस्ते येऊ नये: 17याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला ज्याप्रकारे आशीर्वादित केले आहे, त्या प्रमाणात तुम्ही प्रत्येकाने भेटवस्तू आणावी.
न्यायाधीश
18याहवेह तुमचे परमेश्वर जी सर्व शहरे तुमच्या प्रत्येक गोत्राला देणार आहेत, त्या सर्व शहरांमध्ये न्यायाधीश आणि शास्ते यांची तुम्ही नेमणूक करावी व त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा. 19भेदभाव किंवा विपरीत असा न्याय कधीही करू नये. लाच घेऊ नये, कारण लाच ही शहाण्या माणसांना आंधळे करते आणि निरपराध्याचे शब्द विपरीत करते. 20न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.
अन्य दैवतांची पूजा
21याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीशेजारी तुम्ही अशेरा मूर्तीचे लाकडी स्तंभ उभारू नका, 22आणि पूजास्तंभ उभारू नयेत, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराला त्यांचा अत्यंत तिटकारा आहे.
सध्या निवडलेले:
अनुवाद 16: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.