अनुवाद 20
20
युद्ध करण्याविषयीचे नियम
1जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूशी युद्ध करण्यास जाल आणि तुमच्यासमोर घोडे व रथ आणि तुमच्या सैन्यापेक्षा फारच मोठे शत्रुसैन्य पाहाल, तेव्हा त्यांना घाबरू नका. कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशातून सुखरुपपणे बाहेर आणले, ते याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर असतील. 2तुम्ही युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी, याजकाने पुढे यावे आणि सैन्याला सांगावे. 3त्याने म्हणावे: “हे इस्राएली लोकहो, ऐका: जेव्हा आज तुम्ही लढण्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध पुढे जात आहात; मन कचरू देऊ नका वा भयभीत होऊ नका; त्यांना घाबरू वा भिऊ नका. 4कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील.”
5नंतर सेनाधिकारी आपल्या सैनिकांना म्हणतील: “तुम्हामध्ये असा कोणी आहे का, की ज्याने नुकतेच नवीन घर बांधले असून, तो अद्याप त्या घरात राहिला नाही? तर त्याने घरी जावे, कारण या युद्धात तो कदाचित मारला गेला तर दुसरा कोणीतरी त्या घरात राहू लागेल. 6तुम्हापैकी असा कोणी आहे, ज्याने द्राक्षमळा लावला, पण त्याचे फळ अद्याप खाल्लेले नाही? तर त्याने घरी जावे. कदाचित युद्धात तो मारला जाईल आणि दुसरा कोणी त्याचा आनंद घेईन. 7तुमच्यापैकी कोणाचा वाङ्निश्चय झालेला असून त्याचा अद्याप विवाह झाला नाही असा आहे का? त्याने घरी जावे आणि विवाह करावा. कदाचित युद्धात तो मारला जाईल आणि दुसरा कोणी तिच्याशी विवाह करेल.” 8मग सेनाधिकारी पुढे म्हणेल, “तुम्हापैकी कोणी भेकड वा भित्रा आहे का? जर असेल, तर इतर सैनिकांना घाबरवून टाकण्यापूर्वी त्याने घरी निघून जावे.” 9जेव्हा सेनाधिकारी आपले बोलणे संपवतील, ते सैनिकांवर सेनापती नियुक्त करतील.
10युद्ध करण्याकरिता तुम्ही एखाद्या शहरावर हल्ला करण्यास पोहोचला, तर प्रथम तेथील लोकांना शांतीचा प्रस्ताव द्या. 11जर त्यांनी तो मान्य केला आणि शहराच्या वेशी तुमच्यासाठी उघडल्या, तर त्या शहरातील सर्व रहिवासी तुमचे दास बनतील आणि तुमची सेवा करतील. 12परंतु त्यांनी तह करण्याचे नाकारले व तुमच्याशी युद्ध करण्याची तयारी केली तर त्या शहराला तुम्ही वेढा घालावा. 13जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या ताब्यात देतील, तेव्हा त्यातील सर्व पुरुषांना तुम्ही तलवारीने ठार मारावे. 14पण त्या शहरातील सर्व स्त्रिया, मुले, गुरे व सर्व संपत्ती तुम्ही स्वतःकरिता ठेवावी. ही संपत्ती जी याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूकडून तुम्हाला देतील तिचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करावा. 15तुमच्यापासून दूर असलेल्या व निकटवर्ती नसलेल्या राष्ट्राच्या सर्व शहरांच्याबाबतीत तुम्ही असेच वागावे.
16कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या वचनदत्त देशात असणार्या शहरातील कोणालाही तुम्ही जिवंत ठेऊ नये. 17हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी—यांचा समूळ नायनाट करावा—ही आज्ञा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिली आहे. 18नाहीतर ते त्यांच्या दैवतांची उपासना करताना ज्या किळसवाण्या चालीरीती करतात त्या तुम्हाला शिकवतील व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध पाप कराल.
19तुम्ही एखाद्या शहराला बरेच दिवस वेढा द्याल आणि ते हस्तगत करण्यासाठी त्याच्याविरुद्ध युद्ध कराल, तेव्हा तेथील झाडांचा कुर्हाड चालवून त्यांचा नाश करू नये. झाडांवरील पाहिजे तेवढी फळे तुम्ही खावी; पण झाडे मात्र तोडू नयेत. झाडे मनुष्य आहेत का त्यांना तुम्ही वेढा घालावा? 20परंतु जी झाडे फळे न देणारी आहेत हे तुम्ही जाणता, त्यांचा वापर तुमच्याशी युद्ध सुरू असलेले शहर पडेपर्यंत वेढा बांधण्यासाठी करू शकता.
सध्या निवडलेले:
अनुवाद 20: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.