YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 6

6
सिंहाच्या गुहेमध्ये दानीएल
1दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे, 2व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्‍यांनी त्यांना हिशोब द्यावा. 3दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती. 4यामुळे अध्यक्ष आणि प्रांताधिकारी दानीएलविरुद्ध राज्य कारभारातील दोष शोधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळला नाही, कारण तो विश्वासू होता आणि तो भ्रष्ट नव्हता किंवा निष्काळजीपणाही करीत नव्हता. 5शेवटी हे लोक म्हणाले, “आम्हाला दानीएलाविरुद्ध त्याच्या परमेश्वराच्या नियमाशिवाय कोणत्याही बाबतीत आरोपाचे कारण सापडणार नाही.”
6तेव्हा अध्यक्ष आणि प्रांताधिकारी हे राजाकडे गेले आणि म्हणाले, “दारयावेश महाराज चिरायू होवोत! 7आम्ही सर्वांनी म्हणजे अध्यक्ष, राज्यपाल, मंत्री नायब यांनी एकमताने ठरविले आहे की, महाराजांनी एक फर्मान काढावे व त्याचे पालन करण्यात यावे, त्यानुसार येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. 8तर आता महाराज, या फर्मानावर शिक्कामोर्तब करा आणि ते लिखित स्वरुपात द्या म्हणजे ते बदलता येणार नाही—म्हणजे मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.” 9तेव्हा दारयावेश राजाने या फर्मानावर सही केली.
10जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले. 11नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले. 12मग ते राजाकडे गेले आणि त्याच्यासोबत त्याच्या फर्मानाबद्दल बोलले: तुम्ही फर्मान काढले नाही काय की येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे?
राजाने उत्तर दिले, “हे फर्मान कायम आहे—मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”
13नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.” 14जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.
15नंतर लोक जमावाने राजाकडे आले आणि त्यांना म्हटले, “महाराज, मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार राजा जे फर्मान काढतो त्याला ते रद्द करता येणार नाही.”
16तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”
17आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्‍यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये. 18मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती.
19राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला. 20जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?”
21तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो! 22माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.”
23तेव्हा राजा अतिशय आनंदित झाला आणि दानीएलला गुहेतून बाहेर काढण्याचा त्याने हुकूम सोडला. जेव्हा दानीएलला गुहेतून वर काढण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, कारण त्याने आपल्या परमेश्वरावर भरवसा ठेवला होता.
24नंतर राजाने आज्ञा केली त्याप्रमाणे दानीएलवर खोटे आरोप करणार्‍यांना पकडण्यात आले व त्यांच्या पत्नी व मुलांसहित त्या सर्वांना सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. आणि ते गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सिंहांनी प्रबळ होऊन झेप घातली आणि त्यांच्या सर्व हाडांचे तुकडे केले.
25नंतर दारयावेश राजाने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आणि सर्व भाषा बोलणार्‍यांना लोकांना लिहिले:
“तुमची भरपूर उन्नती होवो!
26“माझ्या राज्याच्या प्रत्येक भागातील लोकांनी दानीएलच्या परमेश्वराचे भय बाळगावे आणि आदर करावा.
“कारण ते जिवंत परमेश्वर आहे
आणि ते सर्वकाळ टिकणारे आहेत;
त्यांच्या राज्याचा कधीच नाश होणार नाही
व त्यांचे प्रभुत्व कधीही संपणारे नाही.
27ते सुटका करतात व ते वाचवितात;
ते आकाशात आणि पृथ्वीवर
चिन्ह आणि चमत्कार करतात.
त्यांनीच दानीएलला
सिंहांच्या तावडीतून सोडविले आहे.”
28याप्रमाणे दारयावेश राजाच्या आणि कोरेश पारसीच्या कारकिर्दीत दानीएल समृद्ध झाला.

सध्या निवडलेले:

दानीएल 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन