YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5

5
भिंतीवरील लिखाण
1बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्‍यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला. 2बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता#5:2 किंवा पूर्वज नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील. 3म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली. 4द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले.
5एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली. 6तेव्हा राजाचा चेहरा पांढराफटक झाला आणि त्याला एवढा धसका बसला की त्याची कंबरच खचली आणि त्याचे गुडघे थरथर कापू लागले.
7मग राजाने मांत्रिक, ज्योतिषी आणि दैवप्रश्न करणार्‍यांना बोलावून घेतले. नंतर तो बाबेलच्या ज्ञानी लोकांना म्हणाला, “जो कोणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला समजावून सांगेल, त्याला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तो तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होईल.”
8नंतर राजाचे सर्व ज्ञानी लोक आत आले, पण त्यांना त्या लेखाचा उमज पडेना किंवा त्याचा अर्थही राजाला सांगता येईना. 9यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले.
10राजा आणि अधिकार्‍यांचा आवाज ऐकून राणी#5:10 किंवा राजमाता मेजवानीच्या दिवाणखान्यात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा! घाबरू नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका. 11कारण ज्याच्यामध्ये पवित्र देवांचा आत्मा आहे असा एक मनुष्य आपल्या राज्यात आहे. तुमच्या पित्याच्या कारकिर्दीत हा मनुष्य जणू काय देवच आहे अशा ज्ञानाने व शहाणपणाने परिपूर्ण असून असे आढळून आले होते. तुमचा पिता नबुखद्नेस्सर राजाच्या कारकिर्दीत त्याला बाबेलमधील सर्व जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे या सर्वांवर प्रमुख नेमण्यात आले होते. 12त्याने हे केले कारण दानीएल हा ज्याला राजा बेलटशास्सर म्हणत होता, त्याच्याकडे उत्तम मन आणि ज्ञान आणि समज होती आणि त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे, कोडे सोडविण्याचे आणि कठीण समस्या सोडविण्याची क्षमता होती. म्हणून दानीएलला बोलवा म्हणजे तो तुम्हाला त्या लिखाणाचा अर्थ सांगेल.”
13तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता? 14तुझ्यामध्ये देवांचा आत्मा आहे आणि प्रकाश, बुद्धी आणि उत्कृष्ट शहाणपण यांनी तू परिपूर्ण आहेस असे मी ऐकले आहे. 15ज्ञानी लोकांनी आणि ज्योतिषांनी भिंतीवरील हे लिखाण वाचावे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सांगावे म्हणून त्यांना माझ्यापुढे आणले पण ते अर्थ सांगू शकले नाही. 16मी तुझ्याबद्दल ऐकले आहे की तू अर्थ सांगण्यात आणि कोडी सोडविण्यात सक्षम आहेस. जर तू हे लिखाण वाचशील आणि त्याचा अर्थ मला समजावून सांगशील, तर तुला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तू तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होशील.”
17दानीएलने राजाला उत्तर दिले. “आपल्या देणग्या आपल्याजवळच ठेवा आणि तुमचे पारितोषिक दुसर्‍या कोणाला द्या. तरीही मी हे लिखाण राजासाठी वाचेन आणि त्याचा अर्थ त्यांना सांगेन.
18“महाराज, परात्पर परमेश्वराने तुमचे पिता नबुखद्नेस्सर राजाला राज्य आणि महानता वैभव आणि गौरव दिले होते. 19कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत. 20परंतु जेव्हा त्यांचे अंतःकरण गर्विष्ठ झाले व गर्वाने फुगून ताठ झाले, तेव्हा त्यांना राजासनावरून काढण्यात आले व त्यांचे वैभवही हिरावून घेण्यात आले. 21त्यांना लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि प्राण्याचे मन देण्यात आले; ते रानगाढवांमध्ये राहिले आणि बैलासारखे गवत खात असत; आणि त्यांचे शरीर आकाशाच्या दवबिंदूंनी भिजले होते, जोपर्यंत त्यांनी हे मान्य केले नाही की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांना पाहिजे त्याला ते राज्यांचा अधिपती म्हणून नियुक्त करतात.
22“परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र#5:22 किंवा वारस असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे. 23त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही. 24म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे.
25“हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला:
मने, मने तकेल, ऊ#5:25 इब्री भाषेत या शब्दाचा अर्थ आणि फारसीन.
26“या शब्दांचा अर्थ हा असा:
मने#5:26 मने अर्थात् मोजलेले किंवा मीना (पैशाचा भाग).: परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे.
27तकेल#5:27 तकेल अर्थात् वजन केलेले किंवा शेकेल.: तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात.
28फारसीन#5:28 फारसीन (पेरेसचे अनेकवचन) अर्थात् दुभागलेले किंवा अर्धा मीना किंवा अर्धा शेकेल.: आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.”
29नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले.
30त्याच रात्री खाल्डियन#5:30 किंवा खास्दी लोकांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला; 31आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला.

सध्या निवडलेले:

दानीएल 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन